-
Gavthan (गावठाण)
"गावठाण" हि कृष्णात खोत यांची पहिलीच कादंबरी." दुसःह दारिद्र्यात जन्मलेल्या,संकटांना सतत सामोऱ्या जाणाऱ्या,उपजत शहाणपण असलेल्या आनंदी नावाच्या दुखी मुलीची-तिच्या उलघाल करणाऱ्या जीवनानुभवाची हि कहाणी. विषण्ण करणारी. आनंदीसामावेत तिचे कष्टकरी आई-वडील, धाकटा भाऊ, मैत्रिणी, सगेसोयरे,दुरावलेलं सासर यांचं-भोवतीच्या गावगाड्याच-हृदयस्पर्शी ह्या कहाणीत येतं. पिकं,गुराढोरं,पशुपक्षी,झाडझूड,डोंगरदऱ्या,वाऱ्याचा भरार,निर्मल नदी,कौल देणारी तांबुजाई आदीचं विलक्षण दर्शन घडतं. मानवी नात्यातील भावबंधांचा भीषण आणि कोमलही रूप प्रकट होतं. आणि एक अख्खं अनोळखी खेडं ओळखीचं होऊ लागतं... कृष्णात खोत यांचं बालपण,पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यात गेलेलं. आजही त्यांचं त्या भूमीशी अतूट नातं आहे. त्या आसमंताचा गंध 'गावठाण' मध्ये सर्वत्र भरून राहिला आहे. कुठल्याही पारंपारिक संस्कारांचा स्पर्श नसलेली,सहजपणे उलगडत आलेली हि स्वयंभू कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याचा नवा टप्पा गाठत असल्याचं जाणवतो.
-
Vyakti Ani Valli (व्यक्ती आणि वल्ली)
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही! अशा या व्यक्ती अणि वल्ली!
-
Itihasacha Anabhidnya Yatri (इतिहासाचा अनभिज्ञ यात
आतिश तशीर या तरुणाची हि एक विलक्षण कहाणी आहे. एक भावनिक आणि वैचारिक शोधासाठी केलेल्या एक रोमांचक प्रवासाचे वर्णन. प्रत्येक तरुणाने ज्यात स्वतःला शोधावे आणि भोवतालच्या समाजमनाला उमजून घ्यावे असे हे पुस्तक आहे. मनात काय आहे आणि वास्तवात काय आहे याची जोड संधू पाहणाऱ्या मनाची हि तगमग अहे. एकीकडे भविष्यात उड्डाण करायला मुभा देणारी स्वतंत्र मानसिकता आणि दुसरीकडे भूतकाळात खेचणारी संकुचित वृत्ती; या दुचाकीवर हि भ्रमणगाथा आपल्याला इस्लामिक जगाचा आधुनिक प्रवास घडवून आणते आतिशला घडलेला इतिहासाचा प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक वाटचालीत त्याच्या अनुभवाला आलेले सत्य त्याच्या लिखाण्यात पानोपानी व्यक्त होते. ते सत्य म्हणजे, संस्कृती हि धर्मापेक्षा मोठी आहे; धर्म हा संस्कृतीचा केवळ एक भाग आहे. संस्कृती आपले जीवनविश्व दर्शविते.; धर्म फक्त श्रद्धास्थाने. हे साधे सत्य शोधण्यासाठी आतिशने एक अजब प्रवास केला आहे. त्याची आई एक टोक तर वडील हे दुसरे. या दोन टोकांवर बांधलेल्या धारदार दोरीवर चालणे ही एक दिव्य होते. तसे चालताना आतिशने केलेला हा मन हलवून टाकणारा अनुभव.