-
Jeevan Tyana Kalale Ho! (जीवन त्यांना कळले हो !)
पुलंच्या सहवासातील काही मान्यवर व्यक्तींनी लिहिलेल्या काही भावपूर्ण आणि रंजक प्रसंगांच्या आठवणी "जीवन त्यांना कळले हो' या पुस्तकात समाविष्ट आहेत.
-
Bhavgandh (भावगंध)
"पुलं'नी 1945 च्या सुमारास सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या काही कथा लिहिल्या. मात्र, त्या पुस्तकरूपाने आजवर प्रकाशित झाल्या नाहीत. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने परचुरे प्रकाशनाच्या "भावगंध' या पुस्तकातून त्या प्रकाशित केल्या आहेत. कथांबरोबरच पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा आणि श्रद्धांजलीपर लेखाचाही त्यात समावेश आहे. "पुलप्रेमी' भाऊ मराठे यांनी त्याचे संकलन केले आहे. "सात-आठ वर्षे "पुलं'वर संशोधन करत आहे. त्यादरम्यान मला त्यांचे अप्रकाशित साहित्य सापडले. विनोदी लिहिणारे पुलं किती गंभीर लिहू शकतात, हे "भावगंध'मध्ये दिसेल. ते वाचताना अक्षरशः वाचकाला रडू येते.'' - भाऊ मराठे "या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून "रडवणारे पुलं' वाचकांसमोर येतील. रोहिणी भाटे, जितेंद्र अभिषेकी, माडगूळकर, भाऊसाहेब बांदोडकर अशा अनेक दिग्गजांवरील त्यांची व्यक्तिचित्रेही यात आहेत.''- प्रकाशक अप्पा परचुरे
-
Jeevan Tyana Kalale Ho ! (जीवन त्यांना कळले हो)
जन्मतःच किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या अतुलनीय मनोधैर्याच्या कथांचे हे पुस्तक आहे. नियतीने लादलेले अपूर्णत्व झुगारून जीवनाला सकारात्मक भावनेने सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती अभिमान वाटावी अशीच नव्हे; तर प्रेरणादायक आहे. आपल्याला आपल्या पूर्णत्वाबद्दल विचार करायला लावणारी आहे.
-
Ruchira Part 2 (रुचिरा भाग २ )
रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २ सिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय पेहराव चढवून रुचिराच्या पद्धतीनुसार वाटीचमच्याच्या प्रमाणात सिद्ध केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. पहिल्या भागाप्रमाणेच परंतू स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत रुचिरा - भाग २ नेही यशाच्या पायर्या वेगाने चढल्या आहेत.
-
Ruchira Part 1 (रुचिरा भाग 1)
३० वर्षात अडीच लाख प्रतींच्या विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारा पाकशास्त्रावरील एकमेव अजोड ग्रंथ रुचिरा ! पाककलेचे जणू दुसरे नाव. रुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घ्यावा म्हणजे जो हमखास चांगलाच होणार ! याचे रहस्य काय ? तर रुचिरामध्ये पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता खुद्द स्वयंपाकघरत प्रचलित असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे आणि स्वत: कमलाबाईंनी हेच वाटी चमच्याचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हातचे काहीही राखून न ठेवता पदार्थाची साद्यन्त आणि सविस्तर कृती दिली आहे. काही विशेष कल्पना व वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून कमलाबाईनी 'रूचिरा'चे लेखन केले आहे. शाळाकॉलेजमध्ये शिकणार्या व नव्याने संसारात पडलेल्या मुलींना स्वयंपाकाची सवय नसते. त्यासाठी रोजच्या जेवणातले तसेच इतरही साधे व सुलभ असे पुष्कळ पदार्थ रुचिरामध्ये दिले आहेत. तसेच निरनिराळ्या पाककृतींचे व इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून व त्या त्या प्रमाणे पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच 'स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी' असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे. भरपूर रेखाचित्रे, साधी व रंगीत छायाचित्रे व अकारविल्हे अनुक्रमणिका याने हा ग्रंथ सजला आहे. प्रत्येक गृहिणीच्या , क्वचित पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा ग्रंथ.
-
Pasang (पासंग)
"पासंगालाही पुरत नाही" या अर्थाची म्हण मराठीत आहे. 'क्षुल्लक' या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल रहावीत, म्हणून जे छोटेसे वजन लावले जाते, ते म्हणजे 'पासंग'. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून ऐकत आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थ असा की, समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक 'पासंगात' जातीधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरात ज्या घटना किंवा व्यक्ती 'फूटनोट' म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
-
Tarphula (टारफुला)
...टारफुला ही या प्रवृत्तीची आणखी एक अप्रतिम कादंबरी आहे. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देणारे होते. त्यातल्या एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य आहे. हे खरे तर 1964 च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नौतिक तपशील ह्या कादंबरीत भरपूर होते. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजीवन सांभाळता येत नाही हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते 1964 साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशौलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपपर्यंत चिरेबंद रूप मांडते...
-
Zadvata (झाडवाटा)
कथा ही विविध रूपांनी जशी अवरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वर्ज्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या 'झाडवाटा’मध्ये याचा प्रत्यय येतो. ते 'झाडवाटा’ धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. 'झाडवाटा’ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.
-
Tattvamasi (तत्वमसि)
"नद्यांमध्ये नर्मदा मला सर्वाधिक प्रिय आहे. ही कथा ज्या गोष्टींवर आधारीत आहे त्यात परिक्रमावासी, नर्मदातीरी राहणार्या किंवा पूर्वी कधी राहिलेल्या व्यक्ती, नर्मदाकाठच्या मंदिरांमधील आणि आश्रमांतील रहिवासी या सर्वांकडून ऐकलेल्या गोष्टी, माझ्या नर्मदाकाठच्या भ्रमंतीमध्ये मला समजलेल्या हकीकती आणि थोड्या माझ्या कल्पना यांचा समावेश आहे." असे ह्या कादंबरीच्या लेखकानेच सांगून ठेवले आहे. गुजराती लेखक ध्रुव भट ह्यांचा हा कादंबरी नायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने, प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याचय प्रयत्नात आदिवासी प्रदेशात त्याला अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याला अनेक प्रश्न पिंगा घालू लागतात. त्याचे प्रगत ज्ञान आणि ह्या तथाकथित अशिक्षितांचे ज्ञान ह्यांची 'टक्कर ’ सुरू होते - तीच ह्या कादंबरीची 'ठिणगी’ आहे.
-
Navi Stree ( नवी स्त्री)
नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण स्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, 144 कलम तिला माहीत असायला हव; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां/पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना 1950 मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षानंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते.