-
Gharjavai ( घरजावई)
सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत असतो. पुष्कळ वेळा ही धडपड केविलवाणी होते; आणि ती पाहण्यार्याला हसू येते. अनेकदा माणूस आपल्या भोवतालच्या परिस्थितीत जगण्याच्या हेतूने सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या नकळत विसंगती निर्माण होऊन बसते. त्यामुळेही तो हास्यास्पद ठरतो. अशा विनोदाला कारुण्याची एक झाक असते. पुष्कळ वेळा बेरकी माणसे स्वार्थासाठी इतरांना अनपेक्षितपणे चकवतात, हास्यास्पद बनवतात. तटस्थपणे पाहणार्याला त्यांच्या गावरान चलाखपणाचे कौतुक वाटते. तो बेरकीपणा पाहून मन चकित होते. क्षणभर ओठांवर हसू फुटते. अतिशयोक्ती हा तर विनोदाचा आत्माच असतो. आनंद यादवांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांतून जो विनोद निर्माण होतो, तो या स्वरूपाचा आहे. तो भाषानिष्ठ किंवा कोटिक्रमनिष्ठ नसून, प्रामुख्याने जीवननिष्ठ आहे. या कथांचा आशयच त्यामुळे विनोदयुक्त आहे. भेटणार्या व्यक्ती, घडणार्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.
-
Kundha (कुंधा )
आपण नुसते हामाल हे. हामालावून बी निफ्तर! कशे म्हना. जमिनी लय हाये आपल्याजो, पण नुसत्या नावाले. खरे मालक दुसरेस हे तिचे. शेठ, सावकार, बँका, पतपेढ्या, राजकीय नेते हे मालक हे तिचे. त्येंच्ह्या तालावर नाचतो आपू. ते, नाचवता आन् रंघत शोषून घेता आपलं. कसा वाचीन शेतकरी मंग?' दगा मास्तरानं सांगितलेलं खानदेशी 'तावडी' भाषेतलं हे -हाससूत्र 'कुंधा' या अशोक कौतिक कोळी यांच्या या कादंबरीचा अर्थबिंदू आहे. गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा कादंबरीतून लेखकाने अशी काही वाजवली की, राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला कसा सज्ज झाला; यासंबंधीचा थरार उभा करण्यात ही कादंबरी पुष्कळ विजयी झाली आहे. लेखकाकडे मोठे भाषादव्य आहे, अनुभव सोलून मांडण्याची ऊर्जा त्याच्याकडे आढळून येते. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर कसा नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. कुंधा प्रतीकरूपाने सिद्ध झाला असला तरी शेतीच्या कर्माधर्माशीच तो जखडलेला नाही. गावातील झगड्याच्या मूळाशी हा कुंध्याचा राक्षस आहे. राजकारणानिमित्त बखेडा उत्पन्न करणारा कुंधा तर कादंबरीत खलनायकासारखा वधिर्त झालेला आहे. कादंबरी वतनदार वाडा आणि आसामी वाडा या दोन संघर्षपीठांचा पीळ प्रगट करते. ही दोन्ही संघर्षपीठं क्षीण मतलबांसाठी जीवांवर उठतात. आणि एका अर्थानं दोघंही रक्तबंबाळ होतात.
-
Hasanaval (हसणावळ)
सुमारे तीसपस्तीस वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिज्या निघतात तेवढ्या वाटा असू शकतात, हे एका मिरासदारांनी ओळखले आणि स्वत:चीच अशी एक वाट पाडली. हरभयाची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते; पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहामत अशी की, त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट! उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.
-
Virangula (विरंगुळा)
धकाधकीच्या आयुष्यात ‘विरंगुळा’ शोधणारे तात्या.... ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा ‘पाऊस’.... आयुष्याच्या शेवटापर्यंत भिकुची पाठ न सोडणारे त्याचे ‘भोग’.... लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील ‘धोंड्याचा महिना’.... औषधांचा खुराक खाण्यासाठी मधूचा ‘आजारी पडण्याचा प्रयोग’.... एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं ‘गवत’.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शोधणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशैलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला ‘विरंगुळ्या’चा क्षण देऊन जातात.
-
Kathepathcha Samudra (काचेपाठचा समुद्र)
काऊन्सेलिंगची गरज हे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांच अपत्य ! ती गरज असणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी 'जाऊ की नको,' ही अवस्था ओलांडण्यात वेळ वाया जातो. तरी बिचकत का होईना, आता लोक काऊन्सेलरकडे जातात. तसे माझ्याकडेही येत. या कादंबरीची नायिका माझ्याकडे आली नव्हती. पण... नायिकेची अस्वस्थ शेजारीण मला भेटायला आली. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दांपत्याबद्दल तिनं मला खूप काही सांगितलं. ती निंदा नव्हती. सामाजिक कर्तव्याचं भान असलेली ती शेजारणीला तीन-चार आठवड्यात पाहिलं नाही, वा तिचं बोलणं ऐकलं नाही,असं सांगून अस्वस्थ स्वरात म्हणाली, "नवरा तिला दटावत असल्याचं कानी येतं. तिचे दबले हुंदके ऐकू येतात, म्हणजे ती बाहेरगावी गेलेली नाही. एवढ्या माहितीच्या आधारे मीच त्या 'नायिके' कडे गेले आणि मग... लेखिकेसमोर एका भग्न आयुष्याचा मोठा पट उभा राहिला. लेखीकेमधील काऊन्सेलरने तो उध्वस्त झालेला संसार सावरला. त्याचीच ही कथा...
-
Bhokarwadichya Goshti (भोकरवाडीच्या गोष्टी)
"विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ वंÂपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणा-या बापूची झालेली त-हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणा-या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणा-या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणा-या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!"
-
Sarjya (सर्ज्या)
आपण सभोवताली बैलं पाहतो पण त्या मुक्या प्राण्याचं दुख: शब्दात मांडलं पाहिजे असं कुणाला वाटत नाही आणि ते तेवढं सोपंही नाही. पण प्रत्यक्ष काम केल्यामुळेच, वेदनामय जीवनाचा अनुभव घेतल्यामुळेच सुरेश शिंदे ही कादंबरी लिहू शकले. मुक्या जितराबाला खरोखर वाचा असती तर त्यानेच स्वत:ची आत्मकथा जगाला सांगितली नसती का ?
-
Pahili laat (पहिली लाट)
श्री. वि. स. खांडेकरांचा हा चौदावा कथासंग्रह आहे. लघुकथा या साहित्यप्रकाराविषयी प्रसिद्ध पाश्चात्त्य कथाकार बेट्स याने एका ठिकाणी म्हटले आहे : "उत्तम आणि अधम यासंदर्भातील एखादे अप्रकट प्रवचन वाचकांपुढे करावे, एखादे तात्पर्य त्यांच्या मनांवर बिंबवावे, एखादा वेगळा दृष्टीकोन त्यांच्यापुढे ठेवावा किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाचा शर्करावगुंठित डोस त्यांना पाजावा, या हेतून कधीही कथा लिहिल्या जाऊ नयेत. मानवी जीवनाबद्दलच्या उत्कट कुतूहलापोटी, आनंदसंवर्धनासाठी आणि त्या ज्या मनोऽवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्या वाचल्या जायला हव्यात. असे सामर्थ्य जीमधे आहे, तीच उत्तम कथा !’" या मानदण्डाच्या आधारे सुजाण वाचकांना श्री. खांडेकरांच्या या कथासंग्रहातील कथांचा आस्वाद अधिक उत्कटपणे घेता येईल.
-
Dharmashree (धर्मश्री)
तत्त्वज्ञान हे वेगवेगळ्या विचारशक्तीच्या माणसांमध्ये कशा वेगवेगळ्या प्रेरणा निर्माण करते आणि त्या प्रेरणा व्यक्तीच्या जीवनधारा कशा संपूर्ण बदलून टाकतात याचे दर्शन 'धर्मश्री' कादंबरीत स्पष्टपणे होते. जीवनाबद्दल प्रत्येकाला असलेली श्रद्धा व जीवनाची मूल्ये यांच्यातला संघर्ष व शेवटी निघणारे सत्य यांचा संगम 'धर्मश्री' मध्ये दिसून येतो. हा संगम तत्त्वज्ञानाच्या रुपाने वाहतो, पण कादंबरीची सुबोधता व सौंदर्य बिघडवून टाकत नाही. - विजयालक्ष्मी रेवणकर
-
The Magic Of Thinking Big (द मॅजिक ऑफ थिंकींग बिग)
द मॅजिक ऑफ थिंकींग बिग' हे पुस्तक वाचून जगभरातल्या लक्षावधी लोकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणलेली आहे. प्रेरणा (motivation) या विषयावरचे एक आघाडीचे तज्ज्ञ म्हणून मान्यता असलेले डॉ. श्वार्त्झ, तुम्हाला अधिक चांगली विक्री करण्यासाठी, अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यात, अधिक पैसा मिळवण्यात आणि सर्वांत महत्वाचं म्हणाजे अधिक समाधान आणि मन:शांती मिळवण्यामध्ये, या पुस्तकाद्वारे मदत करतात. 'द मॅजिक ऑफ थिंकींग बिग' या पुस्तकात तुम्हाला निव्वळ पोकळ आश्वासनं नाही, तर व्यवहार्य, प्रत्यक्ष करून पाहण्याजोग्या पद्धती सापडतात. यातल्या कल्पना आणि तंत्रं इतकी स्वतंत्र प्रत्तेची आहेत, की त्या समजावून सांगण्याकरता लेखकाला एक संपूर्णपणे नवा शब्दसंग्रहच निर्माण करण्याची गरज पडलेली आहे. नोकरी वा उद्योग, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच बाबतीत भव्य प्रमाणात जगण्याचा एक सुनियोजित कार्यक्रमच डॉ. श्वार्त्झ आपल्यासमोर सादर करतात. आपल्या आसपासच्या इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुमच्याजवळ अफाट बुद्धिमत्ता किंवा महान प्रतिभा असण्याची गरज नाही. गरज आहे ती यश मिळवून देणार्या पद्धतीनं विचार आणि आचार करण्याची, हे ते सिद्ध करून दाखवतात. आणि हे कसं साध्य करायचं, याची गुपितं हे पुस्तक तुम्हाला पुरवतं !
-
Mazya Baapachi Pend (माझ्या बापाची पेंड)
शेंगदाण्याची पेंड... माझ्या बापाची पेंड बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ.... अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेली भावकीतली तेढ.... स्वत:च्या अन् दुसर्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची नव्याण्णवबादची एक सफर.... आई-बापाविना वाढलेल्या सोन्या बामणाची अधोगती.... मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा रानमाणूस... शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी व्यंकूची शिकवणी... हरवल्याचा शोध; पण...? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
-
Ghartyabaher (घरट्याबाहेर)
पंख न फुटलेल्या चिमुकल्या पाखरांचे घरटे रक्षण करते; पण पंख फुटलेल्या पाखरांना तेच घरटे पिंजर्यासारखे होते. कुटुंब, घर, देव, धर्म, प्रेम, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, इत्यादिकांविषयीच्या आपल्या आजच्या कल्पनांची हुबेहुब हीच स्थिती आहे. मानवजातीच्या बाल्यात या सर्व कल्पना सुंदर होत्या; इतकेच नव्हे, तर समाजाचे संरक्षण करण्याचे आणि सामर्थ्य वाढविण्याचेच काम त्यांनी केले आहे. पण आजच्या यंत्रप्रधान संस्कृतीत या जुन्या कल्पनांचा काडीमात्र तरी उपयोग आहे का ? मध्यम वर्गातल्या बुद्धिवान व कर्तृत्ववान तरूणत्तरुणींची बुद्धी पिंजर्यात अडकून पडली आहे. त्यांचे कर्तृत्व कुटुंबाच्या तुरुंगापलीकडे सहसा जाऊच शकत नाही. मध्यम वर्गाचे हे प्रतिनिधी राजकीय व सामाजिक सुधारणेच्या गोष्टी तोंडाने बोलत असले, तरी वस्तुस्थितीकडे ते डोळेझाक करीत आहेत. शिक्षण, कुटुंबव्यवस्था, संपत्तीची वाटणी, स्त्रीपुरुषांचे संबंध, इ. बाबतींतल्या जुना मार्ग खाचखळग्यांनी भरलेला असून, समाजाच्या गाड्याला त्यामुळे पदोपदी भयंकर धक्के बसत आहेत, हे जाणूनही नव्या पाउलवाटेकडे त्यांचे पाय वळत नाहीत. याचे मुख्य कारण आहे : घरट्याबाहेर न पडण्याची वृत्ती ! वैयक्तिक जीवनाची आसक्ती आणि सामाजिक जीवनाविषयीची उदासीनता.
-
Sukhacha Shodh (सुखाचा शोध)
मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ॠण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. व्यक्तिगत ॠण आणि समाजॠण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी 'सुखाचा शोध' या कादंबरीतून मांडले आहेत. "त्यागातच सुख असते" ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा 'आनंद', एकावरच संसाराचे ओझे लादणारी 'अप्पा आणि भय्या' ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित 'माणिक' आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली 'उषा'. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, "परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये." १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.
-
Bandhara (बंधारा)
"मग कोन कोन हैत घरात?'" "घरात शेतीबिती असंल ?" "तुमचा देवाधर्मावर इस्वास हाय का न्हाई ?" "बगा ही अंगडी टोपडी. अहो, नवसासायासायनं झालाय मग हौस नको करायला ?" "घ्या, डिंकाचा लाडू घ्या. आईनं मुद्दाम सुनंसाठी दिल्यात." "थांबा हं, तुमाला एक वस्तू अशी दावतो कशी, अगदी बगण्यालायक!'" एक मोठं गोल फिरणारं प्लॅस्टिकचे हत्ती, घोडे असलेलं खेळणं काढलं. खेळणं फिरत होतं, आणि ते फिरवून दाखवणा-याच्या डोळ्यांत वात्सल्याचा आनंद उसळत होता. तो पाहून त्या सहप्रवाशाचे डोळे तरारले. आपल्या खिशातला रुमाल काढून तो आपले डोळे टिपत म्हणाला, "किती हौशी आहात हो ?" ..... अडीच तीन तासांचा त्याचा सोबती हे सारं थक्क होऊन बघत होता. इतका वेळ बाड बाड करणारी त्याची जीभ लुळी झाली. हातातलं ओझं पेलवेना झालं. गेलं माणूस कुणाचं कोण, पण त्याचा गळा दाटून आला. हुंदके अनावर होऊन आवर कसा घालावा हे कळेना झालं. तो तिथंच थोडा वेळ उभा राहिला. कढ जाऊ दिला आणि जड पावलं उचलत पुढे निघाला. बंधारा फुटावा तसं घडलं.
-
Tajmahalamadhye Sarpanch (ताजमहालमध्ये सरपंच)
ताजमहालमध्ये सरपंच' हा कायम टवटवीत राहतील अशा कथांचा संग्रह. या कथा म्हणजे खुसखुशीत विनोदाआडून घडवलेलं वास्तवदर्शनच ! शंकर पाटील यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी ग्रामीण कथाकार म्हणूनच ते अधिक लोकप्रिय झाले. या संग्रहातील कथांमधून ग्रामीण राजकारण, जीवनौली तसंच समाजातील काही नमुनेदार नगांचं चित्रण आढळतं. प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि चुरचुरीत विनोद ल्यालेली दिसते. ती ठरवून लिहिलेली नाही तर उलगडत गेलेली आहे. सहजता आणि सोपेपणा या वैशिष्ठयांमुळे या कथा वाचकाच्या मनाला भिडतात.
-
Dhind (धिंड )
"म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका." राऊ खोतानं साफ झिडकारलं, तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला. "हसून दावू नका. खरं सांगतो, मी घेतल्याली न्हाई." रामभाऊ हसून म्हणाले, "गड्या, तुझं डोळं सांगत्यात की रं !" "अण्णा, डोळं काय सांगत्यात ? गप, उगच गप्प बसा." "उतरंस्तवर गप बसावं म्हणतोस व्हय राऊ ?" "अहो, काय चढलीय का मला ?" "अजून चढली न्हाई म्हणतोस ?" "अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नग. शिवल्याला न्हाई म्या त्याला !" एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, "शिवल्यालं न्हाईस तर मग दडून का बसला होतास ?" "शेबास ! म्या काय दडून बसलो होतो काय ?" "दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास ?" "माळ्यावर काय करतोय ! गडद झोपलो होतो ?" "मग खाली जागा नव्हती काय ?" "ते तुम्हाला काय करायचं ? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू !" राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली. शंकर पाटलांच्या मराठी मनांवर अधिराज्य करणार्या ढंगदार कथा.