-
Moulin Rouge (मुलाँ रूज)
"मुलॉं रूज' ही हेन्री या फ्रान्समधल्या एका चित्रकाराची कहाणी आहे. फ्रान्समधील तुलूझ लोत्रेक या प्रख्यात घराण्यात जन्मलेला हेन्री ऐन शैशवाच्या उंबरठ्यावर एका विचित्र आजाराची शिकार होतो. त्यामुळे त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटते. आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेल्या मुलाचे हेंगाडे रूप पाहून वडील तोंड फिरवून निघून जातात, तर आई एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने अश्रू ढाळीत बसते. अशा अवस्थेतील हेन्रीची चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली, तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो पॅरिसच्या गावकुसाबाहेरील मोंमार्त्र या वस्तीत राहायला जातो. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्याच्या जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टाचे, मोलमजुरीचे काम करणारे सामान्य लोक, सर्कस व नाटकातील कलाकार या विश्वात तो समरसून रममाण होतो. आपल्या सभोवतीच्या रंगिल्या नशाजीवनाची त्याने केलेली पेंटिंग्ज आणि पोस्टर्स यांनी तुलूझ लोत्रेकला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वतःचे स्थान मिळवून दिले.
-
Dakin - Ek Amanavi Pratha (डाकीण एक अमानवी प्रथा)
‘डाकीण- एक अमानवी प्रथा’ या संध्या नरे-पवार लिखित पुस्तकात नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड या महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्ये आजही आदिवासी समाजात ठाण मांडून असलेल्या डाकीण प्रथेचा आणि त्यानिमित्ताने मानवसमाजाच्या इतिहासात ही अघोरी प्रथा कशी जन्माला आली, तिची पाळंमुळं, तिचा सर्वदूर प्रसार, त्यातून पुरुषप्रधान व्यवस्थेद्वारे स्त्रीजातीचं होणारं दमन, शोषण याचा सर्वागीण वेध घेण्यात आलेला आहे.
-
Shivaji Kon Hota ? (शिवाजी कोण होता ? )
इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे. छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे