-
Cyber Attack(सायबर ॲटॅक)
बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग - सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे - सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे
-
-
Audumbaravat Eka Shoor Yoddhyachi Vilupt Kahani
आज तो सम्राट आहे पण जन्मापासून तो मेळघाटच्या जंगलात राहणारा एक शिकारी योद्धा होता. आपल्या मातेला मिळालेल्या यातनांचा आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी तो आपल्या जंगलाच्या कायद्याविरुद्ध गेला आणि औदुंबरावतचा सम्राट झाला. त्याचा संघर्ष त्याला पराक्रमी वीर बनवून गेला. त्याने आपल्या ताकदीने भारतवर्षांतील अनेक बलशाली मल्लांना चित केल तो त्या युगाचा नायक ठरला, तो औदुंबरावतच्या जनतेचा रक्षक ठरला. "औदुंबरावत" ही त्याच्या पराक्रमाचीच गोष्ट नाही तर त्याची एक निरागस प्रेम कहाणी देखील आहे. अमरावतीच्या मातीत दडलेली एक विलक्षण गाथा.
-
Jyacha Tyacha Everest (ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट )
ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट हिमालय अनेकांना वेड लावतो . का? कसं ? एव्हरेस्ट सारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुनःपुन्हा हिमालयाकडे का वळतात ? सत्य घटनेवर आधारित कादंबरी!
-
Savashna(सवाष्ण)
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंबऱ्यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची? अंधाऱ्या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर? का? काय घडलं असं? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे?
-
Made In China(मेड इन चायना)
आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं
-
Marathi Bhasha : Lekhan-Margadarshan (मराठी भाषा :
श्री. सलील वाघमारे हे शासनमान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासकच नाहीत, त्या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. हे या लेखांच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतकेच नव्हे तर, मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्यांना, शासकीय लेखन करणाऱ्यांना अशा सर्वांना निर्दोष लेखन करता यावे, या उद्देशाने सोप्या शब्दांत केलेले विवेचन हे ह्या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखांतून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्यासंदर्भात येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकाला अपरिचित शब्द, यांचे स्पष्टीकरण श्री. वाघमारे यांनी इतक्या सोप्या, सुलभ पद्धतीने केले आहे, की त्यामुळे सर्वसामान्य मराठी भाषकांना हे पुस्तक अतिशय आवडेल, ते संग्राह्य वाटेल, इतकेच नव्हे, तर त्या पुस्तकाचे वारंवार वाचन करून मराठीच्या विविध शब्दांचे अनुकरण करावे, असे वाटेल. यास्मिन शेख (ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ)
-
Lavnaya Nakshatra (लावण्य नक्षत्र...)
लावणी आणि तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आजवर तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र ही कादंबरीदेखील प्रत्येकाप्रमाणेच वेगळी आहे हे निश्चित. यात एक नायक, एक नायिका आणि त्यांचं प्रेम आहे. तसंच दोन बहिणींचं घट्ट नातं कसं असतं हे देखील यात दाखवलं आहे. मात्र तरीही ही केवळ एक प्रेमकहाणी आहे असं मी म्हणणार नाही. अर्थात असं का, ते वाचकांच्या ही कादंबरी वाचल्यानंतरच लक्षात येईल. या कहाणीमध्ये फक्त प्रेम नाहीये. तर विरहही आहे, दुःख आहे, वेदना आहेत, ताटातूट आहे. त्याच जोडीला लावणीची साधना आहे, त्याग आहे, घुंगरांचा नाद आहे, ढोलकीचा आवाज आहे, गरिबी आहे, प्रसिद्धी आहे, अन्याय आहे, विद्रोह आहे, समर्पण आहे आणि समाधानसुद्धा. म्हणूनच ही फक्त प्रेमकहाणी नसून जीवनकहाणी आहे.