-
Bangarwadi ( बनगरवाडी )
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये. प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.
-
Upara ( उपरा )
जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते-ते तसंच लिहित गेलो. पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो. कुणावर दोषारोप ठेवावा हा हेतू कधीच नव्हता. अनेकदा मोह होऊनही स्वत:ला सावरत गेलो. काही ठिकाणी काही व्यक्तींची नावे बदलली ती नाइलाज म्हणूनच. या पलीकडे माझ्या पदरचं काही नाही. या पुस्तकानं भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नावर सामाजिक मंथन सुरू झालं, भटक्यांचे प्रश्न सामाजिक चर्चेचा विषय झाला आणि त्यांच्यासाठी काम करणार्या मंडळींच्या कामाला चालना मिळाली तर पुस्तक लिहिण्याचे श्रम सार्थकी लागले असे मी समजीन. पिढ्यान्पिढ्या बिर्हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणार्या मंडळींच्या वेदना समाज समजावून घेऊ शकला तरी खुप झालं.
-
Matikhalchi Mati ( मातीखालची माती )
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिर्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनशील मनाने टिपली आहेत. यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही 'माणूसपण’ त्याच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते !
-
Vaishakh ( वैशाख )
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणार्या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
-
Prapaat ( प्रपात )
देसाईंच्या कथा खर्या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अस्सल ग्रामीण ढंगात, परंतु सूक्ष्म निरिक्षणशक्ती आणि अत्यंत संवेदनशील मन यामुळं त्यांना शहरी जीवनातील मर्मभेदी सत्य दर्शनानं अस्वस्थ केलं. यातूनच "प्रपात’ च्या कथांचा जन्म झाला. देसाईंच्या नेहमीच्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या आहेत. जीवनातील विशिष्ट क्षणांविषयी, नाट्याविषयी, शहरीजीवनात हरघडी अनुभवायला येणार्या कठोर, रूक्ष क्षणांविषयी विचार करायला लावणार्या आहेत. या कथा अभिजात, संतुलित रूपात्मक जाणिवेच्या आहेत. "स्पर्श’ या कथेत नोकरी करणार्या शहरातील स्त्रीला ज्या बिभित्स नजरा, ओंगळवाणे स्पर्श व त्याच त्या किळसवाण्या भावनांच्या प्रवाहातून दररोज जावे लागते, यामुळं तिच्या मनावर उठणार्या ओरखड्यांचे चित्रण आहे. तर "मृद्गंध’ मध्ये एका वारांगनेच्या मनाची हळूवार ओळख आहे. कथा जसजशी वाचत जावी तसतसा वाचक त्यात गुंतत जातो आणि कथेचा शेवट त्या विचारांना चालना देतो.