-
Majha London (माझं लंडन )
या पुस्तकामध्ये मीना प्रभू यांनी लंडनचा इतिहास आणि संस्कृती यांवर मार्मिक टिपण्णी केली आहे.
-
Ladies Kupe
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणार्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते ? सुखाने, आनंदाने जगू शकते ? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी ?"
-
Seizure( सीजर)
पेशींचे क्लोनिंग करून मानवजातीला ग्रासणार्या पार्किन्सन्ससारख्या आनुवंशिक विकारांवर उपचार करण्याचे तंत्र विकसित करणारा विलक्षण बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॅनियल लॉवेल आणि लोकांच्या भावनांशी खेळून स्वत:चा राजकीय मतलब साधणारा एक महत्त्वाकांक्षी सिनेटर, एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. पेचातून सुटका व्हावी म्हणून डॅनियल सिनेटर बटलरचा अनौतिक प्रस्ताव मान्य करून कोणी कधी न केलेले जनुक उपचार करायला तयार होतो. उपचारासाठी लागणारे जनुक थेट ख्रिस्ताच्या रक्तापासून मिळवण्याची विलक्षण अट बटलर घालतो आणि त्यातून सुरूहोते ती पेच-डावपेचांची जीवघेणी मालिका...
-
The Pelican Brief
वॉशिंग्टनमध्ये, एका अंधार्या पोर्नो चित्रपटगृहात एका प्रेक्षकाचा गळा घोटून रहस्यमय खून होतो. सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश जगातून नाहीसे होतात. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने डार्वी शॉ या घटनांच्या खोलाशी जाऊन, गुन्ह्यांची संभाव्य उकल आपल्या संशोधनपर निबंधात करते. तिच्या दृष्टीने तो अंधारात मारलेला एक वकिली तीरच- परंतु वॉशिंग्टनच्या राज्यव्यस्थेत त्यामुळे सुरुंग लागण्याचा धोका निर्माण होतो. अनपेक्षितपणे ती एका हत्त्येची साक्षीदार होते. एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने ती त्या भीषण रहस्याचा शोध घेतो- सत्य जगापुढे आणण्याचा जो जीवघेणा खेळ खेळते त्याबद्दलचे तितकेच जीवघेणे लेखन म्हणजेच ही कादंबरी. ती लिहिणारे जॉन ग्रिशॅम आपली वकिली सोडूनच पूर्ण वेळ लेखनाकडे वळलेली आहेत आणि त्यांच्या पहिल्या चार पुस्तकांची विक्रीच तीन कोटी प्रतींच्यावर गेलेली आहे- ह्यातच ह्या लेखनाच्या सकसतेचे रहस्य दडलेले आहे.
-
The Golden Rondevu (द गोल्डन रॉन्देव्हू )
ते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. ...अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला... पण त्याच्या हाताखालचा एक अधिकारी सावध होता. शेवटी ते जहाज दुसर्या एका मालवाहू जहाजाच्या मार्गाला भिडु पाहत होते. त्या जहाजावर खजिना होता... ...एक शास्त्रज्ञ आपणच बनवलेल्या एका अणुबॉम्बसहीत क्षेपणास्त्राला घेऊन पळून गेला... या सर्वांचा एकमेकांशी संबंध येत होता. एक फार मोठा कट राबवला जात होता. फक्त एक अधिकारी तो कट उधळून टाकण्याच्या दिशेने पावले टाकू लागला आणि अचानक... त्या समुद्राच्या पाण्यावर एक नाट्य घडत होते. त्या नाट्यात एक प्रेमप्रकरणही फुलत होते. बोटीवरील जीवनाचे दर्शन घडवणार्या रहस्यमय, उत्कंठावर्धक, कादंबरीचा खिळवून ठेवणारा अनुवाद.
-
Nitya Niranjan
प्रपंचात राहून साधना करता येते.. अगदी सहजतेने.. हे कसं साध्य करायचं, याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणारं हे कथन.. जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची, त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ, वेधक आणि मार्गदर्शक कहाणी.
-
The Namesake
तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनेच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून... गोगोल हे नावही अपघातानेच त्याला मिळालं त्याच्या पणजीने निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात, त्यातून ज्याच्या पुस्तकामुळे ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावाने त्याचं नाम:करण झालं. त्या विचित्र नावाने त्याला खूप छळलं होतं. मोठा झाल्यावर त्याने ती चूक दुरुस्त केली तरीही 'गोगोल' नावाने त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्याचा विवाह हा देखील एक अपघातच ... भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.
-
Narmade Har Har
शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.
-
Kalindi
’नर्मदे हर हर’ ,’साधनामस्त’ आणि ’नित्य निरंजन’, या मालिकेतील श्री. जगन्नाथ कुंटे यांचा चौथा अनुभूती ग्रंथ. ’स्वामी’ आणि पूर्वाश्रमीची त्याची पत्नी ’कालिंदी’ आणि त्या अनुशंगानं अनेक साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी..
-
Majet Jagawe Kase
सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात आणि जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणात आपल्याला जीवनातला आनंद मनापासून अनुभवता यावा, तो टिकवता यावा आणि इतर आप्तेष्टांनाही मुक्तहस्ताने वाटता यावा म्हणून काय करावे, कसे वागावे, याबाबत मित्रत्वाच्या नात्याने केलेले हितगूज म्हणजे हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक. तत्त्वज्ञान सांगण्याचा मार्गदर्शकी आव न आणता, व्यावहारिक युक्त्याप्रयुक्त्या सुचवीत आणि आशयसंपन्न किश्शांची पखरण करीत जीवनातील मजेचे रहस्य उलगडून सांगणारे हे खुमासदार पुस्तक अशा प्रकारच्या वाङ्मयातील मानदंड ठरले आहे.
-
Business Legends (बिझनेस लेजंड्स)
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."