-
Kalpit Akalpit
विस्मय, अद्भुतता, अनाकलनीय गूढ या गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण असते. विज्ञान यातील ब-याच गोष्टींवर सत्याचा प्रकाश टाकते. पण जसजसे विज्ञान पुढे जाते, तसतसे ते स्वत:बरोबरही काही प्रश्नही निर्माण करते. शास्त्रज्ञ त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतत जातात. आणि आपण सगळेच विज्ञान आणि विज्ञानाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या भोव-यात रमून जातो. आणि पुन्हा पुन्हा अनुत्तरित प्रश्नांच्या आणि कल्पनांच्या वलयात गुंगून जातो. ह्या कथा अशाच सहज सुचलेल्या वैज्ञानिक कल्पनांमधून साकारल्या आहेत. ह्या कथांमधील कल्पना ख-या का खोट्या यांचे मोजमाप न करता, केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात. त्यामधून वैज्ञानिक सिद्धांत इ. शोधण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ह्या सर्व कथांमधील पात्रे, प्रसंग, विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. कथा काय किंवा कविता काय शेवटी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असे म्हणतात ना... "जे न देखे रवी, ते देखे कवी" त्यामुळे कुणी सांगावे, की आज ज्या निव्वळ कल्पना वाटत आहेत त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे, भविष्यकाळी प्रत्यक्षातही येतील कदाचित.
-
Sadanamast
नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसरं अनुभवकथन. १९९९ पासून फ़क्त नर्मदा परिक्रमा करत राहिलेल्या या साधकानं ’माईच्या आज्ञेनं’ चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी.
-
Shala
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.
-
Panipat (पानिपत)
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.
-
Pravas Janmojanmicha - Many Lives Many Masters (प्रवास जन्मोजन्मीचा-मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स )
ही कथा आहे, एका विख्यात मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्या पेशंटची! कॅथरीन या रुग्णावर अठरा महिने उपचार करणार्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वीज़ यांना म्हणावं तसं यश येत नव्हतं. कॅथरीनला सतत भयानक स्वप्नं पडत, अतिचिंतेचे अॅटॅक्स येत. जेव्हा पारंपरिक उपचारपद्धती तिच्याबाबतीत अयशस्वी ठरल्या, तेव्हा डॉ. वीज़ यांनी संमोहन उपचार पद्धती वापरायची ठरवली आणि त्या उपचारपद्धतीने कॅथरीनला तिचे पूर्वजन्म दिसू लागले. डॉ. वीज़ थक्क झाले, कॅथरीनच्या सद्य जन्मातल्या सर्व आजारांची, प्रश्नांची उत्तरं तिच्या पूर्वजन्मात दडली आहेत, हे समजल्यावर! त्यांना आश्चर्य वाटलंच, पण मनात साशंकताही होती. आणि पुढचं सुखद आश्चर्य म्हणजे दोन जन्मांमधल्या अवकाशातून अनेक संदेश कॅथरीन त्यांच्यापर्यंत आणू लागली. या संदेशातून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे त्यांना झाले, तशी त्यांच्या मनातली साशंकता मावळली. अतिशय ज्ञानी अशा आत्म्यांकडून (मास्टर्स) जीवन आणि मृत्यूविषयीच्या अनेक गूढ गोष्टींची माहिती डॉ. वीज़ यांना देण्याचं माध्यम ती बनली. अविस्मरणीय अशा या ‘केस’ ने कॅथरीन आणि डॉ. वीज़ यांचं सारं आयुष्यच बदलून टाकलं. मनाच्या गूढ रुपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मृत्यूनंतरही अविरत सुरु असणारं जीवन आणि सद्य जीवनातील आपल्या वर्तणूकीवर असणारा पूर्व जन्मातील अनुभवांचा प्रभाव या गोष्टींबद्दलही सांगितलं. डॉ. ब्रायन वीज़ फ्लोरिडातील मियामी येथे राहणारे प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूल येथून त्यांनी पदवी संपादन केली आहे. मियामी येथील माउंटी सिनई मेडिकल सेंटर येथील मानसोपचार विभागाचे ते माजी अध्यक्ष आहेत. "Through Time in to Healing, Only Love is Real and Messages from The Masters' या अंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्टसेलर’ पुस्तकांचे ते लेखक आहेत.
-
Meena
१९५५ नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला. यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची. या बलाढ्य षड्यंत्राविरुद्ध उभी राहिली विशीतली तरुणी - ’मीना’! तिनं या बलाढ्य सत्तांविरुद्ध जागृतीचं भूमिगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी ’मीना’चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा - जिवाला चटका लावणारी!
-
Barbala
मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का ? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं ? काय घडायचं राहिलं होतं ? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते ? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते ?