-
Warren Buffett (वॉरन बफे)
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं… ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन… जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
-
Doctors Form Hell (डॉक्टर्स फ्रॉम हेल)
दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीने मानवतेवर केलेले भीषण अत्याचार सांगणारी ही अधिकृत सत्यावर आधारलेली कहाणी आहे. न्यूरेम्बर्ग येथे नाझी डॉक्टरांवर युद्धगुन्ह्यांसाठी जो खटला चालवला गेला त्याचे अमेरिकी लष्करातर्फे वार्तांकन करणाऱ्या स्त्रीने ही डोळ्याने पाहिलेली कहाणी सांगितलेली आहे. शास्त्रीय संशोधन अन् देशभक्ती यांच्या बुरख्याखाली निरपराध व्यक्तींचा छळ आणि खून करण्यात आले. डॉक्टर्स फ्रॉम हेल यामध्ये काही आम जनतेला उपलब्ध नसलेली खटल्याची कागदपत्रेही समाविष्ट केलेली आहेत; तसेच या खटल्यात पुरावा म्हणून सादर झालेले, आजवर प्रकाशात न आलेले फोटोही दिलेले आहेत. यात लेखिकेने बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, धोकादायक असलेल्या युद्धानंतरच्या न्यूरेम्बर्ग शहरात राहतानाचे अनुभव सांगितलेत. खटल्यावर काम करताना तिचे तिथे अठरा महिने वास्तव्य होते. एकदा एका नाझी माथेफिरूने ती राहत असलेल्या हॉटेलवर बॉम्ब टाकला. काही क्षणातच ती तिथे जेवण्यासाठी पोहोचणार होती. या पुस्तकात ती आपल्याला प्रत्यक्ष खटले चालू असलेल्या न्यायालयाच्या सभागृहात नेते, साक्षीदारांनी दिलेले जबाब ऐकवते, बळींच्या प्रतिक्रिया, त्यांचे राग-लोभ आदी भावना शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचवते. तिथे नरसंहारातून वाचलेले कैदी आपल्यावर केलेल्या प्रयोगांच्या कहाण्या सांगतात, त्यांना प्राणवायूपासून वंचित केले गेले, बर्फात ठेवले गेले, त्यांना मलेरिया, टायफस, कावीळ आदी रोगांचे जंतू टोचले गेले, त्यांचे निरोगी हातपाय कापले गेले. त्यांना सक्तीने दिवसेंदिवस फक्त समुद्री पाण्यावर ठेवले गेले. असे अनेक अत्याचार केले गेले. या ऐतिहासिक खटल्याची परिणती म्हणून नंतर न्यूरेम्बर्ग कोड लिखितस्वरूपात अस्तित्वात आले. मानवावर वैद्यकीय संशोधन करताना कोणती नीतिमूल्ये पाळावित याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात ठरवलेली आहेत. ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावरील साहित्यात महत्त्वाची भर घालते; तसेच नरसंहार, मानवी हक्क, वैद्यकीय नीतिमूल्ये आणि एकूणच मानव किती पशुत्वाच्या पातळीवर घसरू शकतो याबद्दलही सांगते.
-
You Are The Best Wife (यू आर द बेस्ट वाइफ)
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं 'प्रेम करण्याचं' वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला. अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.
-
Chanakyaniti (चाणक्यनीती)
मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ, आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. प्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत. वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील ३२५ सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.
-
Mosad (मोसाद)
जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने 'जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था' असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.