-
Rang Roop Abhangache (रंगरूप अभंगाचे)
‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात संत तुकाराम यांच्या अभंगगाथेतील निवडक अभंगांमधून स्फुरलेल्या चित्रांवरील लेखनाचा ऊहापोह आला आहे. तुकारामांच्या गाथेतील अभंगांची वैशिष्ट्ये, जसे की मनुष्यस्वभावातील बारकावे, वैश्विक जाणीव, निसर्गादि घटकांची मांडणी अशा बाबी ह्या पुस्तकातून जशाच्या तशाच साकारल्या गेल्या आहेत. विशिष्ट अभंग आणि त्यावर स्फुरलेले चित्र यांचा गद्यात्मक स्वरूपाचा लेखाजोखा इथे मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘तुझे रूप माझे नयनी’ जणू असाच शब्दप्रपंच आहे. तुकारामांच्या अभंगगाथेला अर्पण केलेली आदरांजली आहे
-
Gagan Jeevan Tejomay (गगन जीवन तेजोमय)
छाया महाजन यांनी लिहिलेल्या अनेक ललितलेखांचे संकलन या पुस्तकात आहे. एखादा विषय आणि त्याभोवती गुंफले गेलेले मुक्त चिंतनाचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे, इथपासून ते अगदी कुमारगंधवार्र्ंचे गाणे अशा विविधांगी विषयांनुषंगाने मनात सहजगत्या स्फुरलेल्या विचारांचा हा लेखसंग्रह आहे. आकलनाच्या दृष्टीने अत्यंत सहज, ओघवती भाषा आणि त्यातून आलेली विषय मांडणी हा या पुस्तकाचा विशेष होय. लेखिकेची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणार असल्याने वाचकांचा लेखिकेसोबतचा हा विचारप्रवास निखळ आनंद देणारा ठरतो.
-
Choukat Vatoli (चौकट वाटोळी)
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते. या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.