-
Vedgal (वेडगळ)
वेडी माणसे आपण खूप पाहतो रस्तोरस्ती. पण वेडगळ कोण? अधूनमधून परिस्थितीचे भानसुटले, तोल ढळला, सारासारचा विवेक सुटला, की - आपण सगळेच वेडगळ ठरतो का? मग सगळेच 'शहाणे' वेडगळ दिसतात का?
-
Gentleman Chor (जंटलमन चोर)
दामोदर मावजो यांच्या 'जंटलमन चोर' या संग्रहातल्या कथांचा सामाजिक आणि प्रादेशिक पैस विस्तीर्ण आहे. गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक घडणीमुळे की काय, कोंकणी भाषेत लेखन करणाऱ्या दामोदर मावजो यांच्या लेखनाचा पोतही बहुपदरी झाला आहे. लेखक म्हणून त्यांच्या सहानुभूतीचा पैसही विस्तारला आहे. या कथांमधली माणसं गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, बंगाल, अमेरिका अशा विविध प्रदेशांमध्ये वावरतात. रस्त्यावर राहणाऱ्या, गरीब मजुरापासून कॉर्पोरेट अधिकारी, डॉक्टर, बिल्डर असे व्यवसाय करणाऱ्यांच्या भौतिक जीवनाचा आणि आंतरिक विश्वाचा वेध मावजो या कथांमधून घेतात. या कथांना सध्याच्या आपल्या समाजातल्या पुरुषवादी, धर्मवादी, सांस्कृतिक अस्मितावादी धारणा आणि त्यामुळे जीवनात निर्माण होणारे पेच यांचे संदर्भ आहेत. कथानकाच्या पातळीवर हे संदर्भ पात्रांच्या जीवनातल्या घटना-प्रसंगांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. या कथांमध्ये नाट्यमय आणि योगायोगप्रधान प्रसंगरचना प्राधान्याने दिसत असल्या, तरी असे प्रसंग पात्रांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या अनुभवांच्या रूपाने येत असल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि त्या पात्रांशी वाचकाचा सहानुभाव प्रस्थापित होतो. एका प्रगाढ मानवतावादी लेखकाच्या सहवासात आपण आहोत, अशी या कथा वाचताना वाचकाची भावना होते. - नीतीन रिढे
-
Sanvad Legendsashi (संवाद लिजंड्सशी)
या पुस्तकात भारतीय चित्रपटसृष्टी आणि जागतिक क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या रोचक मुलाखती आणि त्यांच्याशी केलेले मनमोकळे संवाद (संवाद) वाचायला मिळतात. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सर गारफिल्ड सोबर्स, गुंडप्पा विश्वनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.
-
Lal Gulag (लाल गुलाग)
रशिया व चीनच्या राज्यकर्त्यांनी त्यांचं देश श्रमछावणी बनवला होता. याविषयी वास्तव परिस्थिती जाणून घ्यायची होती, त्यांच्यासाठी अनेक ग्रंथ अनेक वर्षे उपलब्ध होते. त्यातील काही ग्रंथासंबंधी गोविंद तळवलकर यांनी लिहिले होते, अशाच काही लेखांचा संग्रह.
-
Adhaantari (अधांतरी)
नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...! माणसाला भावना अससात, तशी सारासार विचाराची शक्तीही असते. वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात क्षणिक सुखांच्या परिणामांचा माणसानं विचार केला, तर... भावनेपोटी काही वाटणं आणि वाटतं, तसं प्रत्यक्ष करणं यांतला फरक त्याला कळू शकतो ! तसं झालं नाही, तर अधान्तरी लोंबकळणं अटळ आहे ! अर्थात हे असं सोपं करून सांगणं सोपं आहे ! तसं नसतं, तर या कादंबरीतली पात्रं हृदयाला भिडता भिडता माथं का फिरवून टाकती ? वाचून झाल्यावर दीर्घकाळ पदोपदी आठवत राहील, अशी एक धुंद कादंबरी ... ‘चक्र’, ... ‘स्वगत’ ‘अथांग’... ‘धर्मानंद’ यांच्या परंपरेतली.....!
-
Sahvas Pratibhavantancha (सहवास प्रतिभावंतांचा)
'सहवास प्रतिभावंतांचा' या अशोक कोठावळे यांच्या पुस्तकात हृद्य व्यक्तिचित्रे आहेत, साहित्यसंस्थांचा आणि प्रकल्पांचा अनौपचारिक इतिहास आहे आणि वेगवेगळ्या गुणी माणसांवर प्रेम करण्याची क्षमता असणाऱ्या एका नम्र, सर्वसंग्राह व संवेदनशील लेखकाचे आत्मचित्रही आहे. त्यांच्या साहित्यिक वर्तुळाचा व संकल्पांचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहावा आणि अनेक व्यक्तींना जवळ आणण्याच्या प्रक्रियेमुळे ते आयुष्यभर एक चांगले विद्यार्थी राहावेत अशी आशा करतो.
-
Athavaninchi Sathavan (आठवणींची साठवण)
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांचा गोफ... गिरणगावातील बालपणापासून ते गिरगावातील तरुणपणापर्यंतचा प्रवास... लॉटरीची तिकिटे विकण्यापासून ते ग्रंथ प्रकाशनापर्यंतची व्यावसायिक कारकीर्द... बदललेल्या मुद्रणकलेपासून ते जुळलेल्या न जुळलेल्या पत्रिकेपर्यंतचे किस्से... सोसायटीतल्या सख्खे शेजारींपासून ते दुकानात येणाऱ्या ग्राहकांपर्यंतचे विविध नमुने... आस्तिक-नास्तिकतेपासून ते माणसातल्या हरवलेल्या माणुसकीपर्यंतची निरीक्षणे जगताना आलेले बहुरंगी अनुभव तटस्थ रसाळपणे मांडणाऱ्या ललित लेखांचं जाळीदार पिंपळपान म्हणजे आठवणींची साठवण. गेली चारं दशकं ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ विक्री, संपादन आणि विविध साहित्यिक उपक्रमांचं सातत्यपूर्ण आयोजन यात अग्रेसर असलेल्या 'मॅजेस्टिक' अशोक केशवराव कोठावळे यांची ही 'आठवणींची साठवण' त्यांची एक वेगळी ओळख वाचकांना करून देईल. हे पुस्तक वाचताना तुमच्या मनातला आठवणींचा गोफही अलगद उलगडेल....
-
Bibliophile (बिब्लिओफाइल)
एकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की "सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात." "बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो. गणेश मतकरी हे समकालीन मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव आहे. 'बिब्लिओफाइल' या पुस्तकात त्याचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतो. हे लेखन म्हणजे वाचनसंस्कृतीबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचं एक अचंबित करणारं कोलाज आहे. आजवर आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींची देवाणघेवाण गणेश या लेखांमधून करतो ती अगदी सहजपणे, गप्पा मारल्यासारख्या शैलीत, पण त्यामागे असणारी त्याची साहित्याकडे पाहण्याची अभ्यासू वृत्ती आपल्याला सतत जाणवत राहते. असंख्य वाचनीय पुस्तकांशी आपली ओळख करून देणाऱ्या पुस्तकाच्या निर्मितीचं मूळ या वृत्तीमध्येच आहे. 'बिब्लिओफाइल' ही एका प्रचंड ग्रंथसंग्रहातून फिरवून आणणारी राइड आहे, एकाच वेळी आनंद देणारी आणि विचारही करायला लावणारी.
-
Nile Aakash Hiravi Dharati (निळे आकाश हिरवी धरती )
मंगोलिया ! हिमालयापलीकडचा अलांघ्य, अपरिचित प्रदेश. अथांग, हिरवीगार कुरणे. निळेभोर आकाश. गवताळ रानांवर स्वच्छंदपणे चरत असणारे प्राणी. कठोर हवामान. अवघड भूगोल. तरीही अद्भुत इतिहास. तिथल्या पशुपालक-समाजांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ - लेखकाने केलेली भटकंती
-
Mahanagar (महानगर)
'महानगर' ह्या संग्रहातील कथा आहेत शहरी-औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या. मानवी जीवनाचा भाग बनलेली यंत्रे इथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी भावनांचं जग संस्कारित करतात. मग ते शस्त्रक्रियेत मदत करणारं जीवनदायी यंत्र असो वा स्मशानातील विद्युतदाहिनी; मोटारींचं इंजिन असो की लैंगिकतेचा बाजारू कल्लोळ टिपणारा निर्विकार कॅमेरा. महानगरी जीवनव्यवस्थेतून काही प्रश्न निर्माण होतात. माणसं यंत्रांशी खेळतात की यंत्र माणताना खेळवतात ? यंत्राप्रमाणे माणसांनाही गृहीत धरलं जातं का? शहरी व्यवस्थेत माणूसपणा वाढतो की कमी होतो? मिलिंद बोकील यांच्या या कथांमध्ये मनातील अंतर्द्धद्ध हे अंघार-प्रकाश, दिवस-रात्र, यांत्रिक-भावनिक अशा द्वैती ताणातून व्यक्त होतं. हा ताण शोघणं हे या कथांचं सूत्र. प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन ह्यांची चित्रे ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला लाभलेली आहेत. माणूस, कुटुंब आणि प्रवास ही त्रिसूत्री पटवर्धनांच्या चित्रांमधूनही व्यक्त होते. मुखपृष्ठावरील चित्रातून दिसणारी रेल्वे ब्रिजवरील अस्वस्थ लगबग आणि मलपृष्ठावर व्यक्त होणारी नागरी विषमता ह्या प्रतिमा संवाद साधतात बोकीलांच्या अव्यक्त आशयाशी !
-
Solitear (सॉलिटेअर)
एरवी एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहणारे मोहरे सॉलिटेअरच्या पटावर उतरले की स्वत:च्या चौकटीत अलिप्त जगतात. स्वत:ची चौकट स्वत: पुरती राखताना सोबत्याला पटाबाहेर बिनदिक्कत भिरकावून भोवतालच्या चौकटी रिकाम्या करतात. सर्वाधिक सोबत्यांना ठार करणारा सर्वाधिक कुटिल मोहरा अखेरीस अख्खा पट बळकावतो, तरीही स्वत:च्या चौकटीपुरताच उरतो. एकाकी. त्याला खेळवणारा खेळीयाही मोह-याएवढाच एकाकी असतो. त्याला ना भिडू असतो, ना प्रतिस्पर्धी. तो हरवतोही स्वत:लाच आणि जिंकतोही स्वत:बरोबरचीच लढाई. जगाच्या पटावर हा एकच खेळ सतत खेळला जातोय. परत परत, द गेम ऑफ सॉलिटेअर ! आणि आता तर खेळच खेळीयाला खेळवू लागलाय त्या खेळाच्या या पाच कथा !
-
Free Fall (फ्री फॉल)
Free Fall - फ्री फॉल गणेशची कथा वास्तववादी, आधुनिकोत्तर, महानगरी अशा कोणत्याही एका डब्यात बंद करता येत नाही, हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. या कथेत आशयाच्या अनुषंगाने काही सामाजिक मुद्दे येत असले तरी ही कथा हल्ली प्रतिष्ठित असलेल्या सामाजिक वास्तववादापासून दूर आहे. तिला कल्पनाशीलतेचं वावडं नाही. पण मानवी आयुष्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे विविध घटक या कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथांचे ताणेबाणे अशा घटकांच्या ताणातून आणि सैलावण्यातून विणले गेले आहेत.
-
Kanvinde Harawale (कानविंदे हरवले)
“कानविंदे हरवलेत.'' मिसेस कानविद्यांच्या या वाक्यावर मी क्षणभर काहीच न कळल्यागत त्यांच्याकडे पाहात बसलो. “आठ दिवस झाले कानविद्यांचा काही पत्ता नाही.'' मिसेस कानविंदे पुढे म्हणाल्या आणि मी हातातला चहाचा कप समोरच्या टीपॉयवर ठेवला. मिसेस कानविद्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ लागल्यावर माझ्या मनात अनेक विचार फास्ट फॉरवर्ड केलेल्या चित्रमालिकेप्रमाणे भरभर सरकून गेले.. कानविंदे हरवले म्हणजे नेमकं काय झालं? ते कसे आणि कुठे हरवले? आणि मुख्य म्हणजे कानविंदे हरवले याच्याशी माझा काय संबंध? मग क्षणार्धात वासुदेव कानविंदे या माणसाशी काही दिवसांपूर्वीच झालेल्या माझ्या पहिल्यावाहिल्या संवादाचा क्षण मनात चमकून गेला...