-
Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)
ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. त्या साध्यासुध्या मळक्या कपड्यांतल्या, धुळीने भरलेल्या लोकांनी ओढलेच मला त्यांच्यात. त्यांच्या कामातली मग्नता खूप आवडली. आणि एकमेकांशी असलेली संलग्नताही. नंतर कुतूहलाने भरलेले डोळे पुण्याच्या आणखीही काही भागांवरून फिरले. या सगळ्या जागा होत्या; तशी त्यातली माणसेही होती. आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे.
-
Not Only Potels (नॉट ओन्ली पोटेल्स)
गुजराथी माणूस बिझनेसमध्ये हमखास यशस्वी होतो. इथे आणि परदेशातही! ह्याचं कारण काय? शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा!
-
Tuesday's With Morry
ALS नावाचा दुर्धर आजार जडल्यानंतर प्रा. मॉरी अतिशय शांतपणे आणि धैर्याने वास्तवाला सामोरे जातात. मृत्यूची चाहूल लागल्यानंतर त्यांच्यातला शिक्षक जास्त सजग होतो आणि स्वानुभवाच्या आधारे आयुष्याचं तत्त्वज्ञान ते आपल्या विद्यार्थ्याला सांगतात. प्रा. मॉरी श्वार्टझ् आणि त्यांचा विद्यार्थी मिच अल्बम यांच्यातील सुंदर, निर्लेप नात्याचा प्रत्यय देणारी कादंबरी.
-
K Five
कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या, भाबड्या, लाजर्या सुंदर फुलराणीची – जुईलीची. हिंदुस्तान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या ‘राकट, दणकट, विकृत, प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची.भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी, भावनाहीन, मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची.... दंगलीच्या पार्श्वभूमीवरील मन गोठवून टाकणार्या थरारनाट्याचा पुन:प्रत्यय तितक्याच दाहकतेने देणारी, संवेदना गोठविणारी विलक्षण कादंबरी....
-
Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.
-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.
-
America
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथं. फक्त जरा श्रीमंती थाटाचं. पण तसं ते नव्हतं. ते वेगळंच होतं आणि ते पाहणं फार आवश्यक होतं. कारण ते आपल्याकडे येऊ घातलंय आणि तेही अधिक विकृत स्वरूपात. उद्या आपल्याकडे काय प्रश्र्न असणार आहेत, याचा अंदाज आजची अमेरिका पाहून लावता येतो.
-
Mahimchi Khadi
तत्कालीन मध्यमवर्गीय वाचकाला अपरिचित जगाचं दर्शन घडविणारी ‘माहीमची खाडी’ प्रसिद्ध झाली आणि साहित्यजगतात या कादंबरीच्या रूपाने एक वादळ घोंगावत आलं. झोपडपट्टीतील जीवनाचे आणि त्यातील समस्यांचे वास्तववादी चित्रण ‘माहीमची खाडी’ मधून घडते. झोपडपट्टीतलं सर्व थरावरचं दारिद्र्य, हातावर पोट घेऊन आला दिवस ढकलणारे लोक, काळे धंदे, बेकारी, दारू, मटका यांची व्यसनं, भविष्याचा विचार न करता काहीही करून जगण्याची धडपड, जुन्या पिढीतील नष्ट होत जाणारी ऊब, कौटुंबिक जीवनातील जीवघेणी विदारकता, जन्म घेणाऱ्या बालकांच्या आणि त्यांच्या आयांच्या असह्य यातना, मृत्यू, तरुणांच्या गॅंगचं असंस्कृत वागणं आणि जगणं. स्त्री-पुरुषांचे शारीर पातळीवरचे संबंध या सर्वांचे समूहचित्रण प्रत्ययकारीपणे या कादंबरीत घडते.
-
Veena's World-Popuar Southeast Asia(वीणा ज् वर्ल्ड
बौद्ध संस्कृती व परंपरांचं जतन करणारा पॅगोडांचा देश म्यानमार (बर्मा), कोणत्याही युरोपियन राजवटीपासून स्वतंत्र राहिलेला आणि आज मनोरंजनाचा खजिना ठरलेला थायलंड, रेनफॉरेस्टस्पासून ते आधुनिक शॉपिंग मॉल्सपर[...]
-
Manogati
मनोगती… म्हणजे मनाची गती… क्षणामध्ये आठवणींचे खंड पार करणारी… भविष्यातल्या भरार्या मारणारी… कधी वर्तमानाच्या आडोशाला बसणारी… वर कधी स्वतःमध्येच गिरक्या घेणारी. मनोगत म्हणजे मनातले विचार… आपल्या भावना आणि वर्तनाला आकार देणारे विचार. कधी विवेकाने वागणारे, तर कधी विनाशाकडे धावणारे… मनोगती म्हणजे मनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध! विकाराकडून विकासाकडे नेणारा… आधुनिक मानसशास्त्र, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, तसेच महाराष्ट्राचा भागवत्धर्म ह्यांचा समन्वय साधणारा वैयक्तिक आणि सामाजिक मनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख. अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचे आणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन… मनोगती।
-
Antaryami Sur Gavasala
दत्ता मारुलकर यांनी श्रीनिवास खळे यांच्या अनेक मुलाखती घेऊन त्यांची चरित्रविषयक माहिती संकलित केली आहे. ही माहिती आपल्या चरित्रलेखनासाठी संकलित करताना सतत नवी नवी स्वरनिर्मिती करणार्या संगीतकाराचे चरित्र आपण लिहितो आहोत, हे भान त्यांनी जागे ठेवले आहे. त्यामुळे आपण संकलित करीत असलेली चरित्रविषयक माहिती सामान्य माणसाच्या प्रसिद्ध माणसाविषयीच्या कुतूहलाला चवदार खाद्य पुरवणारी, या मर्यादेत अडकून पडता कामा नये, याची जाणीव चरित्रकार दत्ता मारुलकर यांना आहे. पण असे असले तरी एक व्यक्ती म्हणून मोठ्या कलावंताच्या राहण्याचे, वागण्याविषयीचे कुतूहल सर्वसामान्य रसिकाला असते, हेही दत्ता मारुलकर यांना ठाऊक आहे आणि म्हणूनच, खळे यांची पत्नी, तीन कन्या आणि जावई यांच्या मनोगतांचा समावेश त्यांनी हे चरित्र सिद्ध करताना केला आहे.
-
Chakra Te Chrkha
कृष्ण म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि गांधीजी म्हणजे साक्षात साकारलेलं अद्भुत प्रेम! गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. कृष्णाचे जीवन म्हणजे सत्यप्राप्ती- नंतरचे आचरण आहे. धर्माची स्थापना हे कृष्णाचे जीवितध्येय होते; तर सत्याची प्राप्ती हे गांधीजींचे. ह्या दोघां असामान्य व्यक्तींच्या जीवनाचे अवलोकन करून झाल्यावर त्यांच्या कर्मांची मीमांसा केल्यानंतर ह्या दोघांचे उद्देश साध्य झाले, असे आपण म्हणू शकू का? ह्या प्रश्र्नाचे छातीठोकपणे होकारार्थी उत्तर देणे अवघड आहे. … आणि तरीही कृष्णाविना आणि गांधींविना आपल्या देशाचेच काय, सगळ्या जगाचेही; किंबहुना समग्र मानवजातीचेही चालले नाही! चालणार नाही. कृष्ण आणि गांधी ही अशी दोन प्रतीके आहेत की त्यांच्या स्पर्शाविना मानवजातीचा उद्धार होणे शक्य नाही. काळ पुढे जात राहिला आणि मधून मधून अशी प्रतीके मानवजातीला लाभत राहिली हे मानवजातीचे भाग्य होय! ज्या क्षणी मानवजात अशी प्रतीके निर्माण करण्याची क्षमता हरवून बसेल तो क्षण इतिहासाचा अंतिम क्षण असेल!