-
Chhanda Majha Vegala (छंद माझे वेगळे )
जन्मभर नाना छन्दांमागं धांवत राहिलों. पायांखालीं काय तेंही पाहिलं नाहीं. आतां शेवटपर्यंत हे छन्द सुटतीलसं वाटत नाहीं. एक मात्र झालं. आयुष्य बहुशः कधींच उबगवाणं वाटल नाहीं. हा छन्द, तो छन्द, असं स्वतःचं कौतुक पुरवीत राहिलों. त्या छंदांसवें वाटचाल करीत असतांनाचे हे कांहीं मोहरलेले क्षण!
-
Mogara Phulala (मोगरा फुलला)
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान-मुक्ताईची आणि प्रात:स्मरणीय अशा त्यांच्या माता-पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ-लौकीक अनुभविले, ते तर ‘शब्देंविण’ संवादिण्यासारखे! अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी ‘अमृतातेंहि पैजा’ जिंकणारी असावी लागते. ‘भावार्थदीपिके’च्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दाण्डेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला. आजच्या कळाहीन जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी या आधीच आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे. पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायिल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते. आता ‘मोगरा फुलला’ आहे, फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे; कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे. ह्या नवलगंधाने दाण्डेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत, आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.
-
Tuka Akashaevadha (तुका आकाशाएवढा)
तुका झालासे कळस तुकारामबावांचे जीवन, म्हणजे मन आणि जनलोक या उभयतांसवें रात्रंदिवस चालणारा समरप्रसंग. त्यांची अभंगगाथा हा या समराचा त्यांनीं काढलेला आलेखच आहे. त्या अभंगांचे सूत्र कुठेंही सुटू न देतां, त्यांतील अन्त:प्रवाहांची नोंद घेत चितारलेलें बावांचे जीवनचित्र म्हणजे ‘तुका आकाशाएवढा’. त्यांचे नि:स्पृहपण, त्यांचा नि:संग स्वभाव, श्रीहरिदर्शनांचे त्यांचे आर्त, त्यांची उत्कटता, विठ्ठलप्रेमाच्या प्रवाहामध्ये त्यांचे स्वत:स झोकून देणें, त्यांची सामाजिक जाणीव हें सारेंच इथें चितारलें गेलें आहे.
-
Mrunmayi (मृण्मयी)
'मृण्मयी' मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई. त्याला इच्छाभोजन मिळे. एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून नी म्हणाली, ‘‘बस? हेच मागितलंत? ते माझं उरलंच आहे कुठं? ते तर हरिनिर्माल्य आहे. हे माझं सखेसहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्ष घ्या ते. विस्कटून टाका. इथंच अंथरुण मागवत्ये!’’ मनूनंही जोश्याला हेच म्हटलं- ‘‘-- हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर. तेव्हा हे घ्या. विस्कटा. टाका फाडून-’’ ‘‘मात्र जे कराल, ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत. रातांब्याची पालवी हालत असो. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या.-’’ हे ज्याला कळलें, त्याला ‘मृण्मयी’ कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे.
-
Vadalatil Deepstambha (वादळांतील दीपस्तंभ)
जो भगवी वस्त्रें त्याला नाहीं, तरी पण जो जन्मभर संन्याशाचें जीवन जगला – समाजाच्या कल्याणासाठीं जो चंदनासारखा झिजत राहिला, अशा एका योद्धयाची ही जीवनगाथा— पू. सरसंघचालकांच्या शब्दांत सांगायचे, तर `संघनिर्मात्याविषयीं लिहिलेली ही कादंबरी हें मराठी ललित साहित्यामध्यें एक वैशिष्ट्यच म्हणावें लागेल.’
-
Taksalatil Nani (टाकसाळीतील नाणी)
क गोष्ट मात्र निर्विवाद – मुकुंद टाकसाळे जे काही लिहितात, त्यावर विशिष्ट दर्जाचा ठसा असतो. काही वस्तूंच्या, पदार्थांच्या बाटल्यांवर त्यांच्या दर्जाची हमी देणारा ‘एगमार्क’ किंवा ‘इन्डियन स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूट’ चा ‘आय्.एस्. आय्.’ हे शिक्के असतात. टाकसाळे यांच्या विनोदी कथांवर ‘टाकसाळे’ हा दर्जाचा शिक्का असतो. अजून तरी तो उच्च दर्जाचा शिक्का आहे. तो दीर्घकाळ तसाच राहो ! ... मुकुंद टाकसाळे यांच्या कथा वाचल्यानंतर आणि त्या कथांतल्या निर्व्याज (इनोसंट) विनोद लुटल्यावर मला सतत असे वाटू लागले, की टाकसाळे हे चिं. वि. जोशी यांचे वारसदार होऊ शकतील. या संग्रहातील ‘सा रम्या आदिवासीनगरी’ किंवा ‘नावात काय नाही?’ या कथा मुद्दाम पाहाव्या. हे त्या कुळातलेच वाटू लागतात. – माझी ही भविष्यवाणी खरी ठरो ! जयवंत दळवी यांच्या प्रस्तावनेमधून
-
Hasnbadhh (हसंबद्ध )
जत्रेतल्या अंतर्गोल-बहिर्गोल आरशापुढं उभं राहिलं की आपलीच प्रतिबिंब आपल्याला हसायला लावतात. मुकुंद टाकसाळे यांनी ‘हसंबद्ध’मधील कथांच्या रूपानं आपल्या समाजासमोर असाच आरसा धरला आहे. आपल्या अवतीभोवती वावरणार्या व्यक्तिरेखांच्या या आरशात उमटणार्या प्रतिमा आपल्याला मनमुराद हसवतात. चित्रमय निवेदनशैलीमुळे टाकसाळ्यांच्या या कथा विनोदी लघुपट बनून गेले आहेत. साध्यासुध्या शब्दातून, लहानसहान प्रसंगातून टाकसाळे विनोदाला अनुकूल वातावरण निर्माण करतात. सामान्य व्यक्तिरेखांतला सामान्यपणा दाखवत किरकोळ घटनांतून फार मोठ्या आकाराचा फार्स ते आकारला आणतात. दत्तू बांदेकर, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली दर्जेदार विनोदी वाङ्मयाची परंपरा पुढं चालवणारा हा कथासंग्रह आहे.
-
Radhene Odhala Paay ... (राधेने ओढला पाय ... )
जागतिकीकरणानंतरचा मराठी मध्यमवर्ग हा अगदी वेगळाच मध्यमवर्ग आहे. व्हीआरेस, पोरांचे फुगीरतम पगार, परदेशवार्या, ऑरकुट-फेसबुचं मायाजाल, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पूर्णपणे व्यापलेलं जीवन आणि त्यामुळे वाचनसंस्कृतीची लागलेली वाट… अशा वाटेनं चाललेल्या या बदलत्या मध्यमवर्गाला मुकुंद टाकसाळे यांनी आपल्या ‘राधेने ओढला पाय…’ या कथासंग्रहात बरोब्बर चिमटीत पकडलं आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतल्या या कथा वाचताना अनेकांना आपण आपलंच प्रतिबिंब आरशात पाहतो आहोत असं वाटेल. आजची मध्यमवर्गीय कचकडी संस्कृती आणि तिचं हलकांडेपण पाहून वाचकाला हसूही येईल आणि काहीसं अंतर्मुखही व्हायला होईल. ‘चिं. वि. जोशी यांचा वारसदार’ असं सर्टिफिकेट जयवंत दळवी यांनी ज्यांना दिलेलं आहे, त्या मुकुंद टाकसाळे यांच्या आजवरच्या विनोदी लेखन-प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल असा, हा एक पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा – ‘राधेने ओढला पाय…’
-
Sakkali Sakkali (सक्काळी सक्काळी)
`सक्काळी सक्काळी’ सारखं चौफेर हातपाय पसरणारं मोकळंढाकळं सदर आणि तेही रोजच्या रोज सादर करणं हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. मुकुंद टाकसाळे यांचा विनोद सदैव ताजातवाना, सहज, निर्मळ आणि निकोप असतो. तो सवंग नसतो. म्हणून सर्वांनाच तो लोभावतो. त्यांच्या लोकमान्य लिखाणामागे एक संवेदनाक्षम, धीरगंभीर, प्रागतिक, चिकित्सक दृष्टी आहे हे नि:संशय. मुळात त्यांची वृत्ती आशावादी आहे. हा आशावादी सूर या ना त्या रुपात पुढच्या त्यांच्या सार्या लेखांमध्ये झिरपत राहतो. मला भावलेला त्यांचा आणखी एक वृत्तिविशेष म्हणजे जे जे नित्यनूतन त्याचे स्वागत करण्याचा त्यांचा भाव. त्यांच्या आशावादी वृत्तीला त्यांच्या कुशल, चित्रमय आणि साहित्यिक शैलीची जोड मिळालेली आहे. रोजच्या रोज सदर सादर करण्याच्या खटाटोपात त्यांच्या लेखनाची प्रसन्नता ढळत नाही. (प्रा. राम बापट यांच्या प्रस्तावनेतून) समाजकारण, राजकारण, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात `सक्काळी सक्काळी’ फिरवून आणणारे वाचनीय लेखन.
-
Aankhin Gamatigamatit (आणखी गमतीगमतीत)
मुकुंद टाकसाळे हे आजच्या विनोदी लेखकांपैकी एक लोकप्रिय लेखक. त्यांचा विनोद आजच्या पिढीला अधिक जवळचा वाटतो. कारण तो निर्मळ तर आहेच, परंतु तो या पिढीच्या दैनंदिन जीवनातला आहे. `रविवारच्या लोकसत्ते’मधील `गमतीगमतीत’ या गाजलेल्या सदरातल्या निवडक लेखांचा हा संग्रह `आणखी गमतीगमतीत’ या नावाने दुसर्या भागात प्रसिद्ध होत आहे. सरत्या शतकाच्या किंवा सहस्रकाच्या अखेरीस सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक महाराष्ट्र कसा होता याची विनोदी अंगांनी लिहिलेली ही बखरच म्हणता येईल.
-
Undaravlokan (उंदरावलोकन)
2004 साली दर रविवारी `रविवार सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांतून - `सण्डे का फण्डा’ हे सदर प्रसिद्ध होत होतं. त्या सदरातील निवडक लेखांचा हा संग्रह - `उंदरावलोकन’. `सदर’हू काळात `शायनिंग इंडिया’ ही कॅम्पेन जोरात होती. `रालोआ’ सणकून आपटली आणि सोनिया गांधी यांना `तुम्ही पंतप्रधान व्हा’ असं कॉंग्रेसजन म्हणू लागले, तोच हा काळ. सुषमा स्वराज रागानं बेभान होऊन मुंडण करायला निघाल्या होत्या आणि पंतप्रधानपद न स्वीकारून सोनिया गांधींनी भाजपच्या मुखंडांना धोबीपछाड घातली, तोच हा काळ. मोठा मजेचा काळ होता तो. या हलकांड्या काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला हा समाचार. या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल, मॉल, मिडिआ, मल्टिप्लेक्स, मल्टीनॅशनल अशा अनेक `म’कारांची या काळात एकदमच चलती झाली. त्याच बरोबर शेतकर्यांच्या आत्महत्यांनाही याच काळात मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. मॉलची उंची वाढत गेली आणि सामान्य माणूस छोटा छोटा होत गेला – अगदी उंदराएवढा – तो याच काळात. सामान्य माणसाच्या दृष्टीतून त्या काळाचं केलेलं हे अवलोकन – म्हणूनही `उंदरावलोकन’ !