Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.