-
Kardalivan Ek Anubhuti ( कर्दळीवन एक अनुभूती)
“कर्दळीवन : एक अनुभूती” हे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहलेले पुस्तक दि. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी श्री. क्षेत्र त्रंबकेश्वर नाशिक येथे प्रकाशित झाले. आहे. कर्दळीवनावरील हे पहिलेच पुस्तक आहे. गुरूचरित्रामध्ये कथा भाग असा आहे की श्री नृसिंह सरस्वती हे १३ व्या शतकात श्री शैल्य जवळील कर्दळीवनात पाताळगंगेच्या पात्रात बुट्टीत बसून गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप:साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती वारूळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकूडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होवून त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारूळातून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. कर्दळीवनाचा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ.स. २००० हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक रहात आहेत. कर्दळीवनात पहिल्यांदा जाऊन तेथील मूळ स्थानाचा शोध अकोल्याचे श्री दत्त महाराज यांनी इ.स. २००७ साली घेतला. कर्दळीवन यात्रेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जायला अवधुतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १ व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, १० लाखातून १ बद्री केदारनाथला जाते, २५ लाखातून १ नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखातून १ कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून १ च भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवना विषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जून, रत्नाकर इ. सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवन यात्रा कशी करावी, तेथे कसे जावे, महत्वाचे फोन, मोबाईल क्रमांक, ईमेल, राहण्याची व्यवस्था इ. सर्व माहिती या पुस्तकात दिली आहे. कर्दळीवनाचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व याबाबत विवेचन केले आहे. लेखकाने आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून दत्तसंप्रदायाचा अभ्यास केला असून कलियुगातील दत्त अवतारांचे महत्वपूर्ण कार्य आणि अवतार यावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य केले आहे. महावतार बाबाजी, लाहिरी महाशय आणि शिर्डीचे साईबाबा यांचेमधील गुरू शिष्याचे नाते आणि मुस्लीम व ख्रिश्चन धर्माचा दत्तसंप्रदायाशी असणारा संबंध लेखकाने विशद केला आहे. कर्दळीवनाचा इतिहास सांगताना लेखकाने कर्दळीवनातील जैवविविधते विषयीही चर्चा केली आहे. हे पुस्तक वाचल्यावर कर्दळीवनात जावून आल्याची अनुभूती येते.
-
Jay Ho ! ( जय हो !)
जय हो! हा नारा अन्यायविरुद्ध संघर्षाचा. जय हो! न्याय्य मागण्यांचा. जय हो! जीवनातील नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा जय हो! असा नारा घुवत केलेला थाळिनाद, आखलेला लाटणीमोर्चा, केलेला घंटानाद, घातलेले घेराव, हादरवलेले मंत्रालय, भयभीत केलेले साठेबाज आणि स्वत्व निर्माण केलेला समाज... या घटना आहेत चाळीस वर्षांपूर्वीच्या. सामान्य गृहिणी, शिक्षिका, कायकर्ती, समाजकारणी आणि राजकारणी अशा क्रमाने समाजात आदराचे स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे हे आत्मकथन. संयमित तरी परखड शब्दांत उलगडणारा हा महाराष्ट्राचा गेल्या सात दशकांचा सामाजिक-राजकीय इतिहास.
-
Tila Tila Dar Ughad (तिळा तिळा दार उघड)
क्षण-व्यवसायाने डॉक्टर असणार्या ह्या लेखिकेचे कथासंग्रह, कादंबरी, नाटक, काव्य असे सगळे साहित्य दर्जेदार आणि मोजके आहे. ह्या पुस्तकातील प्रवासवर्णने ही साहित्याच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाची क्षणचित्रे आहेत. ज्यातून ती करत असलेला प्रवास आणि तिच्या आवडत्या साहित्यिकाचा खूप जवळून परिचय वाचकाला होतो तिळा तिळा दार उघड.... सुरूवातीचा हा वेचा.... "ब्रॅडफर्डच्या आडवळणी रस्त्यांमधून कधी उजव्या हाताला, तर कधी डाव्या हाताला झुकांड्या घेत बस धिम्या चालीनं नेटाचा मार्ग काढीत राहते तेव्हा तिला काही दिशा असेल, मुक्काम गाठायची निकड नसली तरी इरादा असेल असं वाटतच नाही. गोलगोल फिरून आपण निघाल्या ठिकाणी परतणार असा संशय वाटायला लागतो. इतक्यात समोरच्या खिडकीतून उजव्या बाजूला जाणारा रस्त्याचा फाटा दाखवणारी बी ६१४४ हॉवर्थ अशी पाटी दिसते. आणि बस आपला अवजड देह सांभाळत नेमकी त्याच दिशेला मोहरा फिरवते तेव्हा हायसं वाटतं. मग मी जरा नीट सावध होऊन बसते. दोन्ही बाजूंच्या समोरच्या खिडक्यांतून दिसणार्या धावत्या दृश्याकडे पाहू लागते. माझ्या छातीत धडधड सुरू होते. या प्रवासाची मी फार फार वर्षं वाट पाहिती आहे. आता काही हरवायला नको, निसटायला नको."
-
Gupt Vardan ( गुप्त वरदान)
माणसाचा जीवनकलह व्यक्त करण्यासाठी मराठी साहित्यात लघुकथेचे माध्यम प्रभावी ठरले आहे. याच लघुकथेतून १९४५ च्या सुमारास नवकथेचा जन्म झाला. इंग्रजी अथवा अन्य भाषेतील कसदार, आशयसंपन्न कथांचे मराठीत रूपांतर करण्यासाठी नवकथा उपयुक्त ठरतात.‘द फेबर बुक ऑफ मॉडर्न शॉर्ट स्टोरीज’ या इंग्रजी लघुकथा संग्रहाच्या संपादिका एलिझाबेथ बॉवेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन तारा वनारसे यांनी ‘गुप्त वरदान’ या कथासंग्रहात चेकॉव्ह, मोपँसा, डॉडे, काफ्का यांच्यासारख्या लेखकांच्या कथांचा अनुवाद केला आहे. वास्तवाशी जवळ जाणार्या, विषयाचे नावीन्य असलेल्या या लघुकथा असून, त्यांची मांडणीही वेगळी आहे.
-
Zimma (झिम्मा)
' झिम्मा '. हा आहे कॅलिडोस्कोप ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या आयुष्याचा... बाईंच्या आत्मशोधाचा , कारकिर्दीचा. हे केवळ विजया मेहता यांचं आत्मचरित्र नाही, तर तो मराठी रंगभूमीवरचा मौल्यवान दस्तऐवजही आहे. बाईंच्या आठवणींच्या धाग्यांचा हा गोफ वाचकांना बांधून ठेवील, यात शंका नाही. एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!
-
-
Musafir (मुसाफिर)
अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. गोडबोले यांनी अनेक विषयांचा [...]
-
Suhana Safar (सुहाना सफर)
नूरजहाँ, लता मंगेशकर, सुरैया, मन्नाडे, गीता दत्ता, अनिल विश्वास, मंगेश देसाई, दिनानाथ मंगेशकर, ते थेट आजच्या जमान्याचं संगीत देताना एक आब राखून असलेला रहमान.... अशा अनेकांवर लिहिलेले हे लेख वाचकांनाही एक सुंदर सफर घडवून आणतील.
-
The Rainmaker (द रेनमेकर)
जॉन ग्रिशॅम हा मुळामध्ये अमेरिकेतला एक प्रथितयश असा वकील होता, आणि नंतर तो पूर्ण वेळ लेखनाकडे वळला. त्यामुळे त्याच्या सगळ्या कादंबर्या या कायदा, वकील, गुन्हेगारी यांच्याशीच संबंधित असतात. 'द रेनमेकर' ही त्याची कादंबरीही कायद्याशीच संबंधित आहे. रुडी बेलर हा अगदी पोरसवदा, कायद्याची परीक्षा नुकतीच पास झालेला एक तरूण वकील असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण कायमच असते. अत्यंत हलाखीची परिस्थिती, पाठीमागे कोणाचं आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणाचा खर्च चालूच आहे, आवक मात्र अत्यंत कमी, अशा परिस्थितीत त्याच्यावरची देणी वाढत असतात. जंग जंग पछाडूनही त्याला नोकरी मिळत नाही. कुठूनशी एक केस मिळते, पण त्याची ती क्लाएंटच इतकी गरीब असते, की तिच्याकडून फी मिळण्याचीही आशा करण्यात अर्थ नसतो. डॉट ब्लॅकनं - रुडी बेलरच्या क्लाएंटनं - एका प्रचंड मोठ्या, श्रीमंत इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असतो. डॉनी हा तिचा मुलगा ल्युकेमियामुळे मरणोन्मुख झालेला असतो. त्याच्या ल्युकेमियावर 'बोन-मॅरो ट्रान्स्प्लँट' हा इलाज असतो, पण इन्शुअरन्स कंपनीनं या ऑपरेशनचा खर्च द्यायला नकार दिल्यामुळे त्याला तो इलाज करता आलेला नसतो, आणि आता ती वेळही निघून गेलेली असते. जेमतेम लॉ स्कूल मधून बाहेर पडत असलेल्या रुडी बेलरकडे डॉट ब्लॅक ही केस घेऊन आलेली असते. आणि रुडीनं तर अजूनपर्यंत एकही केस हाताळलेली नसते. इन्शुअरन्स कंपनीच्या अत्यंत प्रसिद्ध वकिलांचा सामना करून, प्रचंड अडचणींना तोंड देऊन रुडी हा खटला चक्क जिंकतो. डॉट ब्लॅकला प्रचंड मोठी रक्कम नुकसान भरपाई मिळणार असते. आता खरं तर रुडी बेलर कोट्याधीश व्हायला हवा. तो आता चुटकीसरशी पाऊस पाडणारा 'रेनमेकर' झालेला असतो,त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असतं.पण आणि या 'पण'मुळेच तो शहर सोडून निघून जातो. ते का, हे समजायला मात्र पुस्तकच वाचायला हवं.या पुस्तकामध्ये जॉन ग्रिशॅम या मूळ लेखकानं एका वेगळ्याच पद्धतीच्या भाषेचा वापर केलाय. एक प्रकारची बोचरी, विषादपूर्ण, ज्याला 'ब्लॅक ह्यूमर' म्हणता येईल अशी ही भाषा आहे, आणि अनुवादकानंही ती मराठीत तशीच्या तशी उतरवली आहे. त्याखेरीज, मूळ लेखकानं या कादंबरीत कथाकथनासाठी जी एक खास शैली वापरली आहे, ती इंग्रजीमध्ये क्वचित वाचनात येते, पण मराठीत मात्र विशेषत: कथालेखनामध्ये ती पुष्कळ ठिकाणी आढळते. ही शैलीसुद्धा अनुवादकानं पूर्णपणे तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे पानांची संख्या मोठी असूनही हे पुस्तक वाचनीय झालं आहे. विशेषत: ज्या वाचकांना 'कोर्टरुम ड्रामा' वाचायला आवडतात, त्यांना तर हे पुस्तक फारच आवडेल.
-
Anolakh (अनोळख)
आपल्या भोवतालचे परिचित जगच परके वाटू लागल्याची भावना व्यक्त करणारी कविता "प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो", अशा ओळीने सुरु होणारी ह्या काव्यसंग्रहातील कविता "चालून आलेल्या अनेक रस्त्यांवर फुटत, सांडत, विखरत आले मी, आता परतीच्या वाटेने पुन्हा येताना शोधणे आहे फुटलेले, विखरलेले अनेक तुकडे माझे..." असे अखेरीस म्हणत आहे न् ह्यातूनच ह्या संग्रहातील कविताही व्यक्त होते आहे आणि ही कवयित्रीही ह्या दीर्घ वाटेत, "वाळूत मांडला खेळ घरकुले केली पाण्याने सारी अलगद धुवुनी नेली क्षितिजात उमटले अज्ञाताचे लेख, कुणी पुसून टाकले एकामागुन एक, स्मरणातच सारी चित्रे विरघळलेली" असे झाले आहे तरी त्याबद्दल मर्यादेपलीकडील खंत नाही कारण "कधी दिसावे, कधी हसावे, कधी लपावे, अनंत रूपांत शाश्वताचा प्रवास आहे" अशी कवियित्रीची धारणा आहे. शान्ताबाईंची 'गोंदण'च्या पुढची वाटचाल ह्या संग्रहात वाचावयास मिळते.