-
Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघ
अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात भरडल्या गेलेल्या अफगाणिस्तानची घडी आजही व्यवस्थितपणे बसलेली नाही. पत्रकार निळू दामले यांनी २००३ मध्ये या देशात फिरून त्याचे रिपोर्ताज ‘अवघड अफगाणिस्तान’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले होते. याच सुमारास तालिबान्यांचा पाडाव झाल्याने तेथे शांतता नांदेल, अशी अटकळ जगभरात व्यक्त होत होती. मात्र, अनेक जमातींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि सांस्कृतिक-धार्मिक कल्पनांमध्ये रूतलेल्या अफगाणिस्तानवर आजही तालिबान्यांचा प्रभाव आहे, हे दामले यांना त्यांनी २००७ साली केलेल्या या देशाच्या दुसर्या यात्रेत आढळले. या यात्रेदरम्यानचे अनुभव आणि अफगाणिस्तानवरील अन्य मजकुराचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तालिबानींच्या अस्तित्वामुळे अमेरिकी फौजांना तेथून पूर्णपणे माघारी जाणे अशक्य असल्याने अफगाणिस्तानचे आणि तालिबान्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानचे भवितव्य काय, हे सांगणे कठीण आहे, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अस्वस्थ करतो.
-
Touching the Void (टचिंग द व्हाईड)
गिर्यारोहण करताना अपघात होत असतात. या पुस्तकात अशा अपघाताचे आणि त्यात सापडलेल्या ज्यो सिंप्सन या गिर्यारोहकाचा जो अनुभव आहे, तो चित्तथरारक आहे. अँडीज पर्वत रांगांतील 21,000 फूट उंचीच्या हिमशिखरावरून ज्यो खाली कोसळला. तो मृत्युमुखी पडलाय असेच सगळ्यांनी गृहीत धरले होते, मात्र पर्वताच्या एका कपारीत पडलेला ज्यो जिवंत होता. प्रचंड अडचणींना तोंड देऊन ते सायमन थेट्सच्या तळावर परतला. मूळ इंग्रजीत असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणले आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
-
Bharatratna
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये सात महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. या पुरस्कारावर या सात मंडळींनी आपल्या कर्तृत्वाने नाव कोरले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून ते पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंतच्या सात व्यक्तींच्या कारकिर्दीचा आढावा नयन सरस्वते यांनी या पुस्तकात घेतला आहे. या सात मंडळींनी किती वेगवेगळ्या संघर्षाला तोंड दिले आणि आपले ध्येय कसे साध्य केले, ते सारे या पुस्तकातून एकत्रितपणे समोर येते.
-
Vikram Vetal Ani Kala Nirnay Ghenyachi (विक्रम-वेत
विक्रम-वेताळच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र या कथांचा उपयोग एखादे व्यवस्थापनाचे तत्त्व शिकण्यासाठी कसा करता येईल, असा विचार केला गेला नव्हता. इथे याच कथांचा आधार घेत व्यवस्थापन तत्त्व अत्यंत सोपेपणाने समजावून सांगितले आहे. रंजक शैलीत कथा सांगून एखादा निर्णय हुषारीने कसा घ्यायचा याबाबतचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.
-
Manat ( मनात )
अच्युत गोडबोले लिखित "मनात' हे मानसशास्त्रावरचं पुस्तक अलीकडंच प्रसिद्ध झालं. केवळ सात आठवड्यांत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात "मनाचे श्लोक' बहुधा प्रत्येकानंच वाचलेले असतात. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या "मन' नावाचं प्रकरण लेखकाच्या मध्ये येतच असे. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या "मनाच्या' दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखकाला मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ दिलेलं दिसतं. अर्थात हे पुस्तक जाणत्या पण सर्वसामान्य वाचकांना कळेल, अशा भाषेत समजवायचं या विचारानं जन्माला आलं. सर्वसामान्य माणसानं ठिकठिकाणी मनाविषयी ऐकलेल्या कथा, संकल्पना, शास्त्रज्ञांची नावं, त्यांचं जे कुतूहल चाळवलं जातं, त्याला शास्त्रीय ज्ञानाचा पाया या ग्रंथाच्या वाचनातून जरूर लाभतो. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच वाचक त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. यातल्या प्रकरणांची नावं वाचल्यावरच आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर ज्ञानाची किल्ली सापडल्याचा आनंद होतो. मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट संकल्पना किंवा शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी नामसूचीही दिलेली आहे. सर्वसामान्य वाचकांच्या हाती हा ग्रंथ देताना या विविध विभागांची केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती न देता तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे, पण तरीही अत्यंत उत्कटतेनं लेखकानं केलेला जाणवल्याशिवाय राहत नाही. अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचा आधार घेतानाचा पौर्वात्य ज्ञानशाखा आणि तत्त्वज्ञान यांचाही सुरेख मेळ लेखकानं साधला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाचा समर्पक संदर्भ देताना लेखकानं आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला शोधून दिली आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना मधल्या प्रवासातील, प्रक्रियेतील आनंदही तितक्याच उत्कटतेनं उपभोगला पाहिजे. अंतिम साध्य शेवटी लाभत नाही, तर ते प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं सापडत जातं. त्याचं "सेलिब्रेशन' करतच ही सफर पुढं चालली पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी "मनात' या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. तसंच त्यांच्या प्रतिक्रियांमधूनग्रंथाची उंची आणि खोलीही अधोरेखित झाली आहे.