-
His Day (हिज डे)
समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’
-
The Dance of Intimacy (द डान्स ऑफ इंटिमसी)
सर्वाधिक खप असणाऱ्या ‘द डान्स ऑफ अँगर’च्या लेखिकेनं ‘द डान्स ऑफ इंटीमसी’ या पुस्तकात चांगले नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि बिघडलेल्या नातेसंबंधांत सुधारणा व्हावी यासाठी कोणती छोटी छोटी पावले उचलावीत याचे विवेचन केले आहे. सख्यत्वाचे नातेसंबंध, ज्यात काही कारणामुळे दुरावा, तीव्रता किंवा दु:ख यामुळे बाधा येत असते. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून, त्या आपल्याला ‘स्व’ची दृढ जाणीव प्राप्त करण्यासाठी आणि इतरांशी सख्यत्वाची जवळीक साधण्यासाठी नेमके कोणते बदल करावेत, याची माहिती देतात. स्पष्ट सल्ला आणि उपचारार्थींची ठळक उदाहरणे यांच्या साहाय्याने डॉ. लर्नरनी सख्यत्वाच्या नातेसंबंधांविषयीचे एक भरीव आणि उपयोगी असे पुस्तक स्त्री-पुरुषांच्या हाती ठेवले आहे. याहून चांगले पुस्तक असू शकणार नाही.
-
Adolf Hitler (अॅडॉल्फ हिटलर)
विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल!
-
Bear Island....(बेअर आयलॅन्ड)
पृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!
-
The Dance of Anger (द डान्स ऑफ अंगार)
‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे. स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. तसेच राग आलेला असतानाही शांत राहण्यामुळे, ‘स्व’ची जाणीव कशी बोथट होत जाते, याबद्दलही लेखिकेने लिहिलं आहे. राग व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे तोटेही लेखिका लक्षात आणून देते. रागाला जर विधायक वळण लावायचं असेल तर काय करायचं, याचं मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. स्त्रीची रागाची भावना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कशी दाबली जाते आणि त्यामुळे तिची क्षमता कशी झाकली जाते, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. ज्या गोष्टीसाठी राग व्यक्त केला जातो, त्या गोष्टीसाठी अन्य पर्यायांचा विचार कसा करता येऊ शकतो, याचंही मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. स्वची स्पष्टता, नवरा-बायकोंमधील भांडणं हे मुद्दे सोदाहरण पटवून दिले आहेत. थोडक्यात, राग या नैसर्गिक भावनेला विधायक वळण देऊन, त्याचा सकारात्मक उपयोग करून आपल्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवून आणायचा, याचं नेमकं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. त्यामुळे हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरावं.
-
The Case of the Crooked Candle (द केस ऑफ द क्रुकेड
रस्त्यावर एक अपघात घडतो. हा अपघात दाबून टाकण्याच्या प्रयत्नांत एक खून उघडकीस येतो. स्किनर हिल्स काराकुल या मेंढ्यांपासून फर बनविणाऱ्या कंपनीचा मालक फ्रेड मिलफिल्ड याचा खून होतो. संशयाची सुई त्याची पत्नी डाफनेबरोबरच त्याचा पार्टनर रॉजर बरबॅन्क यांच्याभोवती फिरू लागते. कारण रॉजर बरबॅन्कच्या बोटीवरच फ्रेड मिलफिल्डचे प्रेत सापडते. रॉजर बरबॅन्कची मुलगी कॅरोड आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. चतुर पेरी मेसन आणि त्याची धाडसी सेक्रेटरी डेला स्ट्रीट केसच्या मुळाशी पोहोचतात. छोटे-छोटे धागेदोरे मिळवत असतानाच एक थोडीशी कललेली मेणबत्ती केसला कशी योग्य दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. वेगवान कथानक, अचानक आलेली वळणे व शेवटपर्यंत ताणलेली उत्सुकता यामुळे कादंबरी मनोरंजक झाली आहे. खुनाचे रहस्य आणि प्रेमकथा अशा या कथेचा शेवट वाचकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल यात शंका नाही.
-
The Case of the Lucky Looser (द केस ऑफ द लकी लूझर)
अॅडिसन बाल्फोरचा ‘बाल्फोर अलाईड असोसिएट्स’ हा उद्योग व प्रॉपर्टी त्याच्या पुतण्याच्या नावे टेड बाल्फोरच्या नावे करण्याचे त्याने ठरवले आहे. टेडच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गुथ्री व त्याची बायको डोर्लाने टेडला वाढविले आहे. अॅडिसनला असे कळते, की टेडकडून गाडीच्या बाबतीत काही भानगड झाली आहे. टेडने मोटारच्या धडकेने कुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे टेडचा वारसाहक्क अॅडिसनकडून रद्द केला जाण्याची शक्यता असते. नंतर असं कळतं, की ती कार कोणी स्त्री चालवत होती. तिनेच टेडला त्याच्या घरी सोडलं व त्याचे कपडे वगैरे बदलले व गाडीची चावी त्याच्या पायजम्याच्या खिशात ठेवली. टेडच्या गाडीच्या धडकेमुळे जो माणूस मेलेला असतो, त्याच्या शवाची तपासणी केली असता, एका छोट्या कॅलिबरच्या ताकदवान गोळीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. म्हणजे ही अपघाताची घटना कुणीतरी घडवून आणल्याची दाट शक्यता असते. या शक्यतेला वस्तुस्थितीत बदलण्यासाठी पेरी मेसन कशा युक्त्या लढवतो, त्याचं मनोरंजक चित्रण म्हणजे ‘द केस ऑफ द लकी लूजर.’
-
The Case of the Careless Cupid (द केस ऑफ द केअरलेस
सेल्मा अॅन्सन ही पन्नास वर्षाची महिला असते. डीलेन आर्लीग्टन हा एक श्रीमंत विधूर सेल्माच्या प्रेमात पडलेला असतो. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा असते; पण डीलेनची पुतणी मिल्ड्रेड आणि तिचा प्रियकर जॉर्ज फिन्डले यांना डीलेन आणि सेल्माचं लग्न होऊ नये असं वाटत असतं; कारण लग्नानंतर डीलेन त्याची सगळी संपत्ती सेल्माच्या नावावर करेल, अशी त्यांना भीती असते. आतड्यांचा विकार आणि अन्नामधून विषबाधा झाल्यामुळे सेल्माच्या नवऱ्याचा बिल अॅन्सनचा मृत्यू झालेला असतो. एका विमा कंपनीकडे बिलचा एक लाखाचा विमा उतरवलेला असतो. ते विम्याचे पैसे सेल्माला मिळालेले असतात; पण ‘सेल्माने विम्याच्या पैशांसाठी नवऱ्याचा विष देऊन खून केला,’ असं म्हणून विमा कंपनीचा एक माणूस तिच्यावर दडपण आणायला लागतो. जॉर्ज आणि मिल्ड्रेड सेल्मानेच तिच्या नवऱ्याचा खून केला होता, हे सिद्ध करण्यासाठी बनावट पुरावे तयार करतात. सगळ्या बाजूंनी सापळ्यात अडकू पाहणाऱ्या सेल्माला पेरी मेसन अनेक डावपेच लढवून कसा वाचवतो, याची मनोरंजक कहाणी जाणून घेण्यासाठी ‘द केस ऑफ द केअरलेस क्यूपिड’ आवर्जून वाचलं पाहिजे
-
The Case of the Counterfit Eye (द केस ऑफ द कॉउंटरफ
सावकार हार्टली बॅसेटच्या गूढ मृत्यूभोवती ही कथा फिरते. ती आत्महत्या आहे की खून, असा प्रश्न आहे. बॅसेटच्या दत्तक मुलाची पत्नी म्हणून आलेली तरुणी, काचेचा डोळा असणारा आणि मिसेस बॅसेटचा लग्नापूर्वीचा प्रियकर ब्रुनॉल्ड, बॅसेटकडे नोकरीवर असताना अफरातफर करणारा तरुण हॅरी, खुद्द मिसेस बॅसेट आणि त्यांचा मुलगा या सगळ्यांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस मिसेस बॅसेट आणि ब्रुनॉल्ड यांना अटक करतात. अशातच हॅरीचाही खून होतो. जेव्हा प्रकरण कोर्टात पोचतं, साक्षी-पुरावे तपासले जातात तेव्हा पेरी मेसन त्याच्या नेहमीच्या पद्धतीने खटल्याची सगळी दिशाच बदलून टाकतो आणि खरा खुनी कोण आहे, त्याची वाच्यता करतो. एका काचेच्या डोळ्यामुळे पेरी मेसन खऱ्या खुन्यापर्यंत कसा पोचतो, त्यासाठी त्याला काय काय हिकमती लढवाव्या लागतात, हे जाणून घ्यायचं असेल तर ‘द केस ऑफ काउंटरफिट आय’ वाचलंच पाहिजे
-
Majhe Talibani Diwas (माझे तालिबानी दिवस)
मुल्ला झैफ यांचा जन्म १९६८ मध्ये झांगियाबाद येथे झाला. दुष्काळ व राजकीय अस्थिरता यामुळे तो कुटुंबासह मुशान, रंग्रेझान, चारशाखा अशा ठिकाणी भटकत होता. याच दरम्यान त्याची लहान बहीण आणि वडील यांचा मृत्यू झाला. झैफच्या जन्मानंतर सातच महिन्यांनी त्याची आई देवाघरी गेली होती. राज्यक्रांती झाली आणि साम्यवादी राजवट उदयास आली. केवळ पंधराव्या वर्षीच त्याने शस्त्र हाती घेतले. सोव्हिएत फौजांविरुद्ध तो लढाईत उतरला. १९८५च्या दरम्यान त्याने पाकिस्तानात आयएसआयकडून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले. सोव्हिएत फौजांनी माघार घेतल्यावर तो घराकडे परतला; परंतु अफगाणिस्तानातील यादवी युद्धामुळे तो पाकिस्तानला गेला. कंदाहार येथील एका मशिदीत तो ‘इमाम’ म्हणून राहू लागला. १९९४ मध्ये तो तालिबान चळवळीत सहभागी झाला. झैफ मुळात धार्मिक प्रवृत्तीचा होता. तालिबानने हेरात, काबूल काबीज केल्यावर तेथील बँकांचे प्रमुखपद झैफला देण्यात आले. ओसामा-बिन लादेन याचे अफगाणिस्तानात आगमन झाल्यावर प्रभारी संरक्षणमंत्री हे पद झैफला देण्यात आले. तालिबानी राजवटीत झैफने संरक्षणमंत्री तसेच पाकिस्तानातील तालिबानचा वकील म्हणूनही काम केले. सदर पुस्तकात झैफच्या दृष्टिकोनातून अमेरिका व पाकिस्तान यांचे अफगाणिस्तानाविषयी असणारे धोरण, राजकीय स्वार्थ त्याने स्पष्टपणे मांडले आहेत. ९/११च्या हल्ल्यानंतर निर्दोष असतानाही अमेरिकेने त्याला तुरुंगात टाकून पाच वर्षं त्याचा छळ केला. त्याचे ग्वान्टानामो तुरुंगातले अनुभव त्याने सांगितले आहेत. सदर पुस्तक म्हणजे एके काळच्या तालिबान नेत्याची सत्य कहाणीच आहे.