-
Lakshyavedh (लक्ष्यवेध)
सुलतानी राजवटीविरुद्ध उठाव करून हिंदूंचं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी उभं आयुष्य वेचलं स्वराज्य उभ करताना सुरुवातीला अनेक संकटं उभी राहिली. या संकटापैकी सर्वात पहिलं आणि मोठं संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. प्रचंड सैन्यानिशी खानानं स्वराज्यावर चढाई केली. राजांना जिवंत पकडून नेण्याची त्याची गर्वोक्ती होती. तर खानाला मारल्याशिवाय स्वराज्याबद्दल दबदबा निर्माण होणार नाही हे राजे जाणून होते. शिवाजी अफजल भेटीत जे भीषण नाट्य घडले आणि जी अभूतपूर्व कत्तल मराठ्यांनी केली त्याला इतिहासात तोड नाही. या विलक्षण नाट्याचे चित्रण करणारी ही कादंबरी.
-
Udhan ( उधाण )
श्री. कुंभार गुरुजी यांची कथा प्रामुख्याने ग्रामीण समाजाचे अंतरंग उकलून दाखविणारी आहे. त्यांची कथा वास्तवातील नाट्य हेरणारी आहे. त्यांच्या कथेचा तो गाभाच असतो. ते कथेतील पात्रांना जिवंत करतात. वाचकांसमोर ही पात्रे या संवादांमुळे साकार होतात, त्यांना प्रत्यक्ष समोर घटना घडते आहे, असे वाटू लागते. गुरुजींच्या कथांतील विषयही हलके फुलके, वरवरचे नसतात. या कथा एकूण मानवाच्याच सखोल, सूक्ष्म, तरल मनांचा शोध घेणा-या आहेत. अनेक कथांना शेवटी ज्या कलाटण्या दिलेल्या आहेत; त्यातूनही मानवी मनाची ऐनवेळी आकाराला येणारी वृत्तीच प्रकट होताना दिसते. एकंदरीतच कुंभार गुरुजींच्या कथांचं अनुभवविश्व अंतर्बाह्य विविधतेनं नटलेलं आहे. पात्रांच्या विविधतेमुळे, तिच्यातील कलाटणीमुळे ती वाचकाची उत्सुकता वाढवते, ती वाचकांना गुंगवत ठेवते.
-
Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.
-
Matikhalchi Mati ( मातीखालची माती )
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिर्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनशील मनाने टिपली आहेत. यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही 'माणूसपण’ त्याच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते !
-
Vaishakh ( वैशाख )
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणार्या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
-
Prapaat ( प्रपात )
देसाईंच्या कथा खर्या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अस्सल ग्रामीण ढंगात, परंतु सूक्ष्म निरिक्षणशक्ती आणि अत्यंत संवेदनशील मन यामुळं त्यांना शहरी जीवनातील मर्मभेदी सत्य दर्शनानं अस्वस्थ केलं. यातूनच "प्रपात’ च्या कथांचा जन्म झाला. देसाईंच्या नेहमीच्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या आहेत. जीवनातील विशिष्ट क्षणांविषयी, नाट्याविषयी, शहरीजीवनात हरघडी अनुभवायला येणार्या कठोर, रूक्ष क्षणांविषयी विचार करायला लावणार्या आहेत. या कथा अभिजात, संतुलित रूपात्मक जाणिवेच्या आहेत. "स्पर्श’ या कथेत नोकरी करणार्या शहरातील स्त्रीला ज्या बिभित्स नजरा, ओंगळवाणे स्पर्श व त्याच त्या किळसवाण्या भावनांच्या प्रवाहातून दररोज जावे लागते, यामुळं तिच्या मनावर उठणार्या ओरखड्यांचे चित्रण आहे. तर "मृद्गंध’ मध्ये एका वारांगनेच्या मनाची हळूवार ओळख आहे. कथा जसजशी वाचत जावी तसतसा वाचक त्यात गुंतत जातो आणि कथेचा शेवट त्या विचारांना चालना देतो.
-
Sanket ( संकेत ).
वैजूनं चिमणी पेटवली. ती हातात धरून सारी झोपडी निरखली. सापांच्या पेट्या व्यवस्थित होत्या. नागिणीच्या टोपलीवरचा दगड तसाच होता. मग मुंगसाला घाबरायला काय झालं ? वैजू मुंगसाजवळ गेला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नेहमी जवळ जाताच कुशीत चढणारं ते मुंगूस वैजूच्या हातून सुटण्याची धडपड करीत होतं. भीतीनं त्याचं अंग फुललं होतं. वैजूच्या मनात एक अनामिक भीती तरळून गेली. त्यानं झोपडीचं दार उघडलं आणि मुंगसाला तो शांत करू लागला; पण मुंगसाची धडपड वाढली होती. अशाच धडपडीत एका हिसक्याबरोबर मुंगसाची कडी तुटली आणि सुटलेलं ते मुंगूस झोपडीच्या दरवाजातून पळालं. त्याला हाक मारत वैजू दरवाजापर्यंत गेला. त्याच वेळी त्याच्या कानांत ती दीर्घ शीळ आली. उभ्या जागी वैजू खिळून राहिला. झोपडीतून तशीच शीळ उठत होती. वैजूनं धीर करून मान वळवली. नागिणीच्या टोपलीतूनच तो आवाज येत होता. शीळ थांबताच त्या टोपलीतून भुसकारे उठत होते. वैजूनं गडबडीनं झोपडीचं दार लावलं आणि तो अंथरुणावर जाऊन कुडाला टेकून बसला. शिळेचे साद वाढत होते. जवळ जवळ साद येत होती. वैजूला वाटलं की, जेव्हा आपण दारात होतो तेव्हाच पळून जायला हवं होतं... पळून जायचा विचार पक्का झाला. धीर करून वैजूनं झोपडीचं दार उघडलं आणि एकदम मागे सरला. दारात उभा राहिलेला नागाचा फणा डोलत होता. वैजू मागं वळला. भिंतीचा कूड गाठून तो बसला; पण त्याची नजर दाराशी डुलणार्या त्या आकृतीवर खिळली होती. टोपलीतल्या नागिणीची धडपड वाढली होती. टोपलीवरचा दगड हेलकावे घेत होता. दारातल्या नागानं आपला फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा उभारला. टोपलीवर तो डुलत होता. त्याच्या भुस्कार्याला टोपलीतून प्रतिसाद येत होता. झाकणाला आतून धक्के बसत होते आणि त्या हादर्यांनी डुलणारा वरचा दगड कोलमडला...
-
Mekh Mogri ( मेख मोगरी )
मेखमोगरी, सूरसिंगार आणि शेवट शिवाजी, संस्कार, मोकळं आकाश या पाच कथांचा समावेश असलेला कथासंग्रह. यातील तीन ऐतिहासिक स्वरूपाच्या, एक आध्यात्मिक व एक कौटुंबिक वळणाची आहे. प्रत्येक कथा स्वत:च्या वैशिष्ठ्यानं वाचनीय झाली आहे. "मेखमोगरी’ ही कथा पहिल्या दर्जाची प्रेमकथा होय. ऐतिहासिक पार्श्वभूमी, पात्रानुसार ग्रामीण व नागर भाषा, उत्कंठापूर्ण घटना प्रसंग व रेखीव व्यक्तीरेखा यामुळं ही कथा वाचनीय ठरते. सुरशृगांर ही सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमीची कथा. संस्कार ही अध्यात्मिक वळणाची कथा आहे. एका विख्यात किर्तनकाराचा मुलगा भटकत भटकत विश्वंभरांच्या घरी येतो. त्यांची सून त्याच्यावर सतत संशय घेते. परंतु नंतर त्याच्यावरच्या सुसंस्काराची तिला प्रचिती येते. अशा आशयाची ती भावपूर्ण कथा आहे. या कथा संग्रहातील कथा या भावनिक उंची गाठणार्या, मनाला हेलावून टाकणार्या आहेत.
-
Aalekh ( आलेख )
'आलेख' हा रणजित देसाईंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या ही घटनांची केंद्रस्थळं. गावातली तर्हेवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गांजलेली, देवभोळी, अंधश्रद्धाळू माणसं ! निसर्ग आणि जनावरं यांच्याशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. ही माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरची माया, शहरवासीयांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात. निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.
-
Chicken Soup For The Mother's Soul ( चिकन सूप फॉर
पृथ्वीतलावरच्या आपल्या पहिल्यावाहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे आई... आणि त्यानंतर आयुष्यानं कशीही वळणं घेतली तरी सदैव त्याच भूमिकेत आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोबत करणारी व्यक्ती म्हणजेही आईच. आई या विलक्षण शब्दाभोवती गुंफलेल्या या कथा स्थळ, काळ सार्या भेदांपलीकडं जाऊन आईच्या त्याच वात्सल्याचा स्पर्श घडवतात. फक्त आणि फक्त प्रेम, माया, आस्था, जिव्हाळा, जपणूक या आणि अशाच भावभावनांचे रेशीमधागे गुंफणार्या या कथा साध्या साध्या प्रसंगांतून अतिशय लोभस भावनेचं दर्शन घडवत आपल्याला आपल्या आईची आठवण करून देतात.