-
Jhadajhadti
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊस मळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.
-
Life And Death In Shanghai
'सामान्य माणसांना सतत जागृत ठेवण्यासाठी क्रांतीचे धक्कातंत्र अनुसरले पाहिजे’, या माओच्या वचनाचा आधार घेऊन १९६६ साली चीनमध्ये ’सांस्कृतिक क्रांती’ नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली गेली. चिआंग चिंगने म्हणजे माओच्या पाताळयंत्री बायकोने घडवून आणलेल्या त्या ’क्रांती’मध्ये जिचे जीवन पार उद्ध्वस्त झाले, अशा एका अभागी चिनी मातेचे हे चित्तथरारक आत्मकथन आहे. निएन चंग हे तिचे नाव. ही कथा जशी तिच्या हालअपेष्टांची, तशीच तिच्या हरपलेल्या मुलीचीही. विध्वंसक रेड गार्ड्स, मतलबी पक्षनेते आणि बापुडवाणे जनसामान्य या सर्वांचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण यांमुळे जगभर गाजलेले पुस्तक.
-
Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.
-
Panipath
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.
-
Meena
१९५५ नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला. यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची. या बलाढ्य षड्यंत्राविरुद्ध उभी राहिली विशीतली तरुणी - ’मीना’! तिनं या बलाढ्य सत्तांविरुद्ध जागृतीचं भूमिगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी ’मीना’चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा - जिवाला चटका लावणारी!
-
Manashree
ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वांत मठं- दृष्टिहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणार्या गांधारीइतकंच तिचं काळखं विश्व समजावून घेणारी खबीर आई. आणि तिच्या अथक साथीन मनश्रीनं घेतलेेली उत्तुंग भरारी- ती कहाणी आहे ’मनश्री अनिता सोमण’ या ’दृष्टिहीन’ मुलीच्या ’नेत्रदीपक’ यशाची