-
Kabul Kandaharkadil Katha (काबूल कंदाहारकडील कथा)
अफगाणिस्तानसारख्या अत्यंत मागासलेल्या देशाचा अगदी वास्तव इतिहास मांडण्याचा लेखिकेने केलेला प्रयत्न म्हणजे 'काबूल कंदाहारकडील कथा' हा संग्रह होय. हजारो वर्षांपासूनचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य असा आहे. या देशावर आजपर्यंत सत्ता गाजवलेल्या सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे राज्य केलं याचं चित्रण या कथांमधून केलेलं आहे. अगदी सुलतान मोहम्मदापासून ते आजच्या हमीद करझाई यांच्यापर्यंतचा घडलेला इतिहास मांडून अफगाणिस्तानच्या जनतेची झालेली ससेहोलपट यातून स्पष्ट केली आहे. रशियाने सत्ता ताब्यात घेऊन अमानुषपणे केलेले हत्याकांड, जनतेला वेठीस धरून केलेला छळ याचं भीषण चित्र यामधून उभं केलेलं आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रवाह, इतिहासाची मोडतोड, समाजाची जडण- घडण यासारख्या गोष्टी तर सतत होतच राहतात; मात्र त्यामध्ये होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेची, माणसांची सुख-दु:खं ही मात्र चिरंतन असतात. तोच खऱ्या अर्थाने मानवी इतिहास असतो- शाश्वत टिकणारा. म्हणूनच याला जास्त महत्त्व आहे. यातील सर्व कथां या एका वेगळ्याच दुःखाच्या कथा आहेत. या दुःखाची जातच वेगळी आहे. या दुःखितांच्या मनात शिरून त्यांचा कानोसा घेऊन या कथा उत्कृष्टरीत्या लेखिकेनं मांडल्या आहेत. यातील सर्व पात्रं हाडामांसाची, खरीखुरी माणसं आहेत. ज्यांनी हे दुःख भोगलं त्यांची दुःखं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य लेखिकेनं अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे. चिकित्सक पध्दतीने अफगाणिस्तानचा मानवी इतिहास मांडून लेखिकेनं खरं म्हणजे वाचकवर्गावर उपकारच केले आहेत, असं म्हणणंच योग्य ठरेल.
-
Cadbury Eka God Udyogacha Khadatar Jagpravas (कॅडबरी एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास)
आज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास. कॅडबरी- एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास
-
Devanchya Raajyaat (देवांच्या राज्यात)
'देव' म्हणजे कोण - एक कल्पना की वास्तव? देव म्हणजे परग्रहावरील मानव? देव आणि अध्यात्म यांचा संबंध काय? या साऱ्या प्रश्नांचा शोध घेतला आहे... 'देवांच्या राज्यात' या पुस्तकामध्ये.
-
Nenchim (नेनचिम)
नेनचिमवर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो... सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते... वाढते... विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो... आणखी जवळ येतो... पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी...
-
Dnyantapaswi Rudra (ज्ञानतपस्वी रुद्र)
नरहर रघुनाथ फाटक पत्रकार व प्राध्यापक होतेच; पण तितकेच चांगले चरित्रकारही होते. त्यामुळेच आज त्यांची ओळख ही मुख्यत: त्यांच्या चरित्रलेखनामुळेच आहे. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेले न्या. रानडे यांचे चरित्र आजही महत्त्वाचे मानले जाते. रानडे यांच्याविषयी आजवर बरेच लिहिले गेले आहे; परंतु त्यांच्याविषयी जाणून घेताना वा लिहिताना फाटकांचे चरित्र वगळून पुढे जाता येत नाही.अशा चरित्रकार फाटकांचे चरित्र त्यांच्या विद्यार्थिनी अचला जोशी यांनी लिहिले आहे. त्यामुळे 'चरित्रकाराचे चरित्र' असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल. अचला जोशी यांना आधी विद्यार्थिनी म्हणून आणि नंतर स्नेही म्हणून फाटकांचा सहवास लाभला. शिवाय त्यांचे फाटकांच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होते. त्यामुळे या चरित्राला एक आपलेपणाचा आणि आदराचा स्पर्श झालेला आहे.
-
Sanskrutichya Pranadhara (संस्कृतीच्या प्राणधारा)
या पुस्तकात समाविष्ट असलेले लेख भारतीय संदर्भात नद्यांचे विविध पैलू उजळणारे आहेत. सांस्कृतिक इतिहास, पुरातत्त्वविद्या, संस्कृत आणि प्रादेशिक वाङ्मयीन परंपरा, लोकसाहित्य आणि संतसाहित्य, भारतविद्या आणि पर्यावरणशास्त्र अशा विविध विद्याशाखांमधल्या अभ्यासकांनी भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीला आकार देणार्या नद्यांचे गतिशील रूप इथे उलगडले आहे. नद्यांनी भूगोलाच्या शुचितेला कशी प्रेरणा दिली आहे, काठावरच्या मानवी वसाहतींचे जगणे त्यांनी शतकानुशतके कसे तोलून धरले आहे, सृष्टिचक्राला त्यांनी कशी गती दिली आहे, कलावंतांच्या प्रतिभेला त्यांनी कसे स्फुरण दिले आहे, वेगवेगळ्या प्रदेशांत राहणार्या निरनिराळ्या समुदायांमध्ये पिढ्यान् पिढ्या गुंजत राहणार्या कथा-गीतांची निर्मिती त्या कशा करत राहिल्या आहेत, आणि आधुनिक काळात नद्यांचा विचार करताना, नद्यांची परिसंस्था सृष्टीच्या संतुलनाकरता कशी आवश्यक आहे, हे या पुस्तकातून उलगडत जाते. यामुळे नद्यांचा सामग्र्याने विचार करण्यासाठी एक उत्तम साधन अभ्यासकांच्या हातात येऊ शकेल.
-
Lokmanyancha Granthawedh (लोकमान्यांचा ग्रंथवेध)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाचे योद्धे, युगप्रवर्तक नेते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा अखंड ग्रंथवेध. समकालीन लेखकांची पुस्तके केवळ वाचून न थांबता त्यांची चिकित्सक परीक्षणे लिहिणारे, अग्रलेखांतून पुस्तकातील विचारांना राष्ट्रीय चर्चेचे व्यासपीठ देणारे आणि ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून त्या ग्रंथांना नवी उंची देणारे असे वाचक-लेखक-चिंतक म्हणून लोकमान्यांचे कार्य अद्वितीय आहे. लोकमान्यांचे चरित्रकार अरविंद व्यंकटेश गोखले यांनी ‘लोकमान्यांचा ग्रंथवेध’ या पुस्तकात लोकमान्यांच्या विविध विषयांतील व्यासंगाचा, वाचनसंस्कृतीचा, समीक्षादृष्टीचा आणि साहित्यविषयक योगदानाचा सखोल मागोवा घेतला आहे. लोकमान्य कोणती पुस्तके वाचत, त्यावर काय भाष्य करत आणि त्यातून समाजाला कोणता विचार देत, याचे अभ्यासपूर्ण विवेचन येथे वाचायला मिळते. स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या वाङ्मयीन प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणारा हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.
-
Uttarparvaat Ekdaa Ani Itar Mithak Katha (उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा)
मिथक म्हणजे नद्यांसारखी जुनी, खोल पात्रं. शेकडो वर्षे त्यात नवीन अर्थ भरत राहतात. कधी अखंड वाहतात, कधी कोरड्या पडतात, आणि कधी सामूहिक स्मृतींच्या पावसाने पुन्हा तुडुंब भरून फेसाळतात. ‘उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा’ या संग्रहात अरुणा ढेरे यांनी भारतीय मिथकांना समकालीन संवेदनेतून नव्याने पाहिले आहे. पुरातत्त्व, मानसशास्त्र आणि साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मिथकांचा अनुभव रसाळ कथांमध्ये साकार केला आहे. अरुणा ढेरे या कथासंग्रहात भारतीय मिथकांचे बोट पकडून आपल्याला त्या अंधार्या पात्रात खोलवर घेऊन जातात. इथे मिथक हा केवळ संशोधनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत, स्पंदनशील अनुभव आहे. कलावंताच्या संवेदनशील प्रतिभेतून समकालाचे प्रतिबिंब त्या रत्नमण्यासारखे लखलखते. प्राचीन आणि आधुनिक यांच्या सीमेवर उभ्या असलेल्या या कथा वाचताना आपल्याला मानवी जीवनाचे सुख-दुःखमय रहस्य नव्या अर्थाने उलगडत जाते.
-
Vivekayatree (विवेकयात्री)
मानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
-
Sobat Sanjvelchi (सोबत सांजवेळची)
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते.