-
Fractured Freedom (फ्रॅक्चर्ड फ्रीडम)
फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक या प्रामाणिक माणसाने आणि त्याच्या जोडीदाराने, अनुराधाने, एक कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीबद्दल आहे. उपेक्षितांसाठी काम करण्याकरिता आयुष्य वेचलेल्या, आणि एका अधिक मानवी, अधिक न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे असे मानणाऱ्या या दोन लोकांची ही कहाणी आहे. गत आयुष्यातील काही आठवणी, काही तुरुंगातील अनुभव सांगताना गांधी यांनी त्यांचे आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकात एक गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहिले आहे. दहा वर्षे भारतातल्या विविध तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास सोसावे लागलेल्या कोबाड यांनी त्यांच्या या दीर्घ तुरुंगवासाबद्दल, त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, काफ्काच्या काल्पनिक जगातले वाटावेत अशा भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. एक अन्याय्य व्यवस्था एका शूर, धैर्यवान माणसालाही कशी दुबळी बनवते त्याचे हे प्रामाणिक आणि आडपडदा न ठेवता लिहिलेले वर्णन यात आहे. ही कहाणी आहे दोन टोकांवरच्या अनुभवांची – उच्चभ्रू जगातल्या संपन्नतेची, आणि आत्यंतिक निराशेची. आपल्या काळातल्या विविध घडामोडींची, आणि बहुसंख्य लोक ज्याच्यापासून दूरच राहतील अशा एका जीवनमार्गाची!
-
Bali (बळी)
रामू या तरुणाचं गॅरेज आहे... त्याच्या गॅरेजजवळ राहणार्या रतन या शाळकरी मुलीचं त्याच्यावर प्रेम आहे...पण रामू आणि रतन लग्न करू शकत नाहीत...मात्र त्यांच्यात चिठ्ठ्यांची देवाण-घेवाण सुरू असते...रतनचा मोठा मामा तुक्या तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असतो...त्यामुळे रतन नेहमी आत्महत्येची भाषा करत असते...जेव्हा रामूला ही गोष्ट समजते तेव्हा तो संतापतो आणि तुक्याला बदडून काढतो...तिच्या अन्य कुटुंबीयांना हे माहीत असूनही ते तिकडे दुर्लक्ष करत असतात...त्यांनाही रामू दम भरतो...त्यामुळे तुक्याला काही प्रमाणात पायबंद बसतो...मग रतनचं लग्न ठरतं...पण रामू आणि रतन परस्परांमध्ये मनाने गुंतलेले असतात... रतनचं लग्न होतं का? या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा अंत काय होतो?
-
Ishq @ Mandavi (इश्क एट मांडवी)
"कोकणातल्या सोनगिरी नावाच्या लहानशा गावात कनिष्ठ कर्मचारी म्हणून नेमणूक झालेला कथानायक मकरंद आपल्या समोर येतो. त्याच्या जोडीने आनंद आणि उमाकांत त्याच दिवशी त्याच कार्यालयात रुजू होतात. समवयस्क असल्याने तिघांची दोस्ती होते. अर्थात प्रत्येकाचा काहीतरी वेगळेपणा असतोच. लवकरच ते एकत्र राहू लागतात. आनंद जरा गंभीर तर उमाकांत थोडा फ्लर्ट आहे. मकरंदचं मांडवी गावातल्या एका मुसलमान तरुणीवर -आसमा तिचं नाव- प्रेम जडतं. तिचा मोठं भाऊ परदेशात राहतो. त्याची बायको मांडवीत असते. त्याच्या मित्रांकरवी त्याला जेंव्हा हे समजतं तेंव्हा तो आसमाला सक्त ताकीद देतो. प्रकरण पुढे वाढवायचं नाही अशी तंबी देतो. पुढे होतं असं की उमाकांत आणि ती भाभी यांचं अफेअर सुरू होतं. तो भाऊ अचानक परदेशातून येऊन उमाकांतवर खुनी हल्ला करतो. गोष्टीला विचित्र वळण लागतं. तर अशी ही कथा. मुंबईच्या रेल्वे PLATFORM वर सुरू होते आणि मडगावच्या फलाटावर येऊन थांबते. "
-
Sanjeevan (संजीवन)
‘संजीवन’ ही विख्यात लेखक भा. द. खेर यांची ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारलेली भावरम्य कादंबरी आहे. वारकरी सांप्रदायाने संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ हे वात्सल्यपूर्ण नामाभिधान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांवर अनेक विद्वान साहित्यिकांनी विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती केली आहे. संस्कृत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्ञानेश्वर हा प्रत्यक्ष विष्णूने लोककल्याणासाठी घेतलेला अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिकित्सक संतसाहित्यिकांनी ‘ज्ञानेश्वरी’चा अन्वयार्थ विशद करणारे भाष्यग्रंथ लिहिले आहेत. भा. द. खेर त्यांच्या ‘संजीवन’ कादंबरीत विठ्ठलपंत-रुक्मिणी (ज्ञानेश्वरांचे मातापिता) यांच्या विवाहापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपर्यंतचे घटना-प्रसंग रसाळ भाषेत वर्णिले आहेत. खेर यांची लेखनशैली साधीसोपी पण लालित्यपूर्ण असल्यामुळे आपसूकपणे वाचनात तन्मयता येते. कादंबरीतील भावोत्कट करुण प्रसंगात आपण (वाचक) भारावून जातो. परमेश्वरानं मानवदेह धारण करून अवतारकार्य संपल्यावर आत्मरूपात विलीन व्हावं, तसा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधिसोहळा तर कादंबरीतील उत्कर्षबिंदूच आहे.
-
Karveer Chhatrapati Indumati Ranisaheb (करवीर छत्र
आधुनिक विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या द्वितीय सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे हे जीवनचरित्र आहे. शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्याशी सासवडच्या जगताप घराण्यातील इंदुमतीदेवींचा विवाह झाला. विवाहानंतर एकच वर्षानी प्रिन्स शिवाजी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी इंदुमतीदेवींना आलेलं वैधव्य. शाहू महाराजांनी सुनेच्या शिक्षणाचा केलेला श्रीगणेशा. त्याला झालेला विरोध. सुनेला चारचाकी शिकवणार्या, तिला पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यवहारचातुर्य शिकवणार्या, स्वत:च्या मृत्यूनंतरही सुनेसाठी आर्थिक तरतूद करू पाहणार्या शाहूराजांच्या मृत्युमुळे इंदुमती देवींना डॉक्टर करण्याचं भंगलेलं स्वप्न. स्त्रियांसाठी शैक्षणिक संस्था काढून त्यासाठी झटणार्या, कलासक्त, वत्कृत्वनिपुण, कलाकारांना आश्रय देणार्या, उत्तम वाचक असणार्या, प्रसिद्धिपराङमुख इ. गुण असणार्या इंदुमती राणीसाहेबांचा हा जीवनपट त्यांच्या जीवनातील चढ-उतार तर दर्शवतोच, पण त्यांच्या समाजसेवी वृत्तीचं प्राधान्याने दर्शन घडवतो.
-
Khel Sadetin Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
‘उपरा`कार लक्ष्मण माने चळवळीतील विचारवंत. माने यांनी वेळोवेळी समजत जाणवणारे प्रश्न आणि समस्या यावर भाष्य असणारे स्फुटलेखन प्रसंगानुरूप केलेले आहे. तत्कालीन समस्या आणि प्रश्न यांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडून ते प्रश्न लोकांसमोर आणायचे काम केलेले आहे. `खेळ साडेतीन टक्क्यांचा` या लेखसंग्रहात अशाच स्वरूपातील लेखांचे संकलन केलेले आहे. १९९५ च्या दरम्यान लक्ष्मण माने हे ‘बंद दरवाजा` नावाचे साप्ताहिक चालवत असत. सरकारी धोरणे, सामाजिक प्रश्न, साहित्य-संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी-वंचित घटकांसाठीचे प्रश्न या साप्ताहिकातून त्यांनी मांडले. ते प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम हे या लिखाणातून झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे लिखाण साधारणतः २५ वर्षांपूर्वीचे असले तरीही आजच्या काळातही तेच मुद्दे आणि प्रश्न तसेच असल्याचे जाणवते त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारात मोडते.
-
Shree Gajanan Darshan (श्री गजानन दर्शन)
‘श्री गजानन दर्शन’ हे विख्यात लेखक भा. द. खेर यांनी ओघवत्या भाषेत लिहिलेले संतचरित्र. संतकवी दासगणू यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ या एकवीस अध्यायांच्या पोथीतील गजानन महाराजांच्या चरित्राचे त्यानी संक्षेपाने गद्यरूपात विवरण केले आहे. प्रसंगानुरूप महाराजांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन पोथीत वाचायला मिळते. (स्वत: लेखकांना महाराजांची प्रचिती आली आहे.) अनेक भक्त श्रद्धेने नित्यनियमाने पोथीचे पारायण करतात. महाराजांची उपासना करणार्याच्या संकटकाळी धाव घेऊन संकटमुक्त करतात, असा भाविकांचा अनुभव आहे. अनेकांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन देऊन त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात चमत्कारांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा लेख आहे. त्यात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ-संशोधकांच्या अध्यात्म विषयावरील विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या पुस्तकात भाविकांना महाराजांचे आलेले अनुभव ग्रथित केले आहेत, ते विस्मयचकित करणारे आहेत. मूळ पोथीतील फलश्रुतीवर भाष्य करणारा लेख पुस्तकात समाविष्ट केला असून शेवटी नित्योपासनेसाठी महाराजांचे मंत्र आणि स्तोत्रे दिली आहेत. अशा ग्रंथाच्या वाचनामुळे श्रद्धा दृढ व्हायला मदत तर होतेच, शिवाय भक्तीमुळे शक्ती (आधार) प्राप्त झाल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
-
Pavhna (पाव्हणा)
भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी
-
Saapshidi (सापशिडी)
‘अपने धर्म पर चलो’ या कथेतील बाबासाहेबांना निवृत्तीनंतर जीवनाचा अर्थ कळतो...तर ‘एक केस आहे’मधून सायक्रॅटिस्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता अधोरेखित होते...तुमच्या कुकर्माचे परिणाम तुम्हाला पुढल्या जन्मात भोगावे लागतात, असा संदेश देते ‘नारायण ऽऽ नारायण’ ही कथा...तर ‘मृत्यूतला जन्म’मधून प्रकट होतं जुन्या-नव्याचं िंचतन...‘राग पिलू’मधील संगीत आणि चित्रकलेतील भावबंधाला नजर लागते एका अहंकारी गायकाची...‘वांझ’मधल्या बाईजींना दोन मुलींची आई असूनही वांझ असल्यासारखं वाटतं...‘सापशिडी’तील रंजनाला जीवनाच्या सफलतेचा आनंद होत असतानाच ती परत अस्वस्थतेच्या गर्तेत फेकली जाते... ‘होय सो होय’ ही कथा नियतीच्या अटळतेचं अधोरेखन करते...जीवनाची सापशिडी ही अशीच चालू असते, कधी खाली कधी वर...पण या वर-खालीच्या अवकाशात भोगायला लागतात दु:खं अनेक...दु:खाच्या नाना परी भोगत असतात माणसं...अशाच माणसांचं मनोविश्व आणि जीवन सामोरं आणणार्या कथांचा संग्रह
-
Tuzi Katha-Maze Shabda (तुझी कथा-माझे शब्द)
शेतातील पिकांचं नुकसान करणार्या गायरांनी गावातल्या तरुणांच्या मेहनतीवर फिरवलेला बोळा...गॅरेजमालक वसंत मेस्त्री, त्याच्याच गॅरेजमध्ये काम करणारे शंकर आणि सद्या, मेस्त्रीची ठेवलेली बाई शारी, शारीचा निष्क्रिय नवरा इ. व्यक्तींचं दिशाहीन जीवन...एका विहिरीवर उलगडणारे काही लोकांच्या जीवनाचे तुकडे...त्याच्या आणि तिच्या प्रेमाची रखरखीत, अनिश्चित वाट...नवर्याला सोडून आलेली, दत्तूबरोबर लग्नाशिवाय राहणारी, दत्तूच्या मृत्यूनंतर कुणाचा तरी हात धरून पळून जाणारी काशी...विजूबरोबर प्रेमबंध निर्माण होऊ पाहत असतानाच कमलबरोबरच्या चोरट्या भेटीगाठींचं स्मरण होऊन स्वत:ला सावरणारा तरुण...पाळण्यातच लग्न लागलेलं असल्याने मनाला भावलेल्या तरुणाला नकार देणारी हौसा...दोनदा प्रेमभंग झालेल्या तरुणाला त्याच्या वाग्दत्त वधूच्या संदर्भात एक निनावी पत्र मिळतं...मानवी मन आणि जीवन यांचं वास्तव, तरल चित्रण करणार्या कथांचा भावस्पर्शी संग्रह
-
Kondwada (कोंडवाडा)
माणूस म्हणजे त्याचा समाज. हजारो वर्षे हा माणूस चिरेबंद व चिणलेला जगला. त्याच्या मस्तकात एक भीषण तत्त्वज्ञान होतं, बाहूंमध्ये अत्याचार अन् दमणयंत्रणा. त्याचं धड संपत्तीची असुरी लालसा अन् पाय शरणागतता व अंधकार. दीडदोनशे वर्षांपूर्वी यंत्रानी निर्माण केलेल्या विक्रयवस्तूंचे कुलपी गोळे तटबंदीवर थडकले. अंतर्बाह्य विस्कट सुरू झाली. अंधकाराच्या पाळामुळांपर्यंत एकेक विजेचे लोळ पोचले. वरपासून खालपर्यंत सर्वदूर हत्यारं खणाणली. ठिणग्या उडू लागल्या आजही उडतायत अन् उडतील. अजून माणूस बांधलेला आहे, अमानुष आहे. या विस्कटण्यामध्ये सांस्कृतिक वीणसुद्धा विस्कटली. धागे धागे सुटत गेले. गुंतत गेले, तुटू लागले. आणि आज गेल्या पाचदहा वर्षांत हे सगळं जमिनीतून वर उगवतंय. दलितांचं, श्रमिकांचं, क्रांतीचं साहित्य जन्माला येतंय. या कोलाहलात एक नोंदण्याजोगा आवाज दयाचा. स्पष्ट पण न एकारलेला. साध्या वस्त्रांमधला पण भरजरी माती ल्यायलेला. राजवाड्याच्या खंदकातून अन् रेल्वेच्या खडखडाटातून उमललेला आणि तारे खुडण्यासाठी शस्त्रं परजणारा.
-
Gabru (गब्रू)
‘गब्रू’ हा सात विनोदी कथांचा संग्रह आहे. ‘गब्रू’ कथेत एका ग्रामीण नाटककाराच्या नाटकाच्या लेखन-संपादन-प्रकाशनाचा ‘साद्यंत’ वृत्तान्त खेळकर शैलीत कथन केला आहे...तर ‘टिंबकटू’ कथेत एका लेखकाला शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावतात आणि त्याचा कसा पोपट होतो याची हकिकत येते...‘लावलं क्याळ, आलं रताळ’ कथेत कॉटच्या पैशाची ‘वसुली’ करायला हिराबाईकडे गेलेल्या बोंगार्डेमामाच्या फजितीचं खुसखुसशीत चित्रण आहे...‘दरोडा’ कथेत रात्री गस्त घालणार्या तरुणांचे ‘उद्योग’ आणि चोरांनी त्यांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता याचं खास शैलीतील वर्णन आहे...‘खेळी’ ही चावरेकर मास्तर आणि अन्य मास्तरांना ‘घोळात घेऊन’ ‘लुंगाडणार्या’ अव्वाची कथा आहे...तर ‘आफ्रिकन चुंबन’मध्ये सुंदर पत्नी नवर्याच्या मनसुब्यावर कसं पाणी फिरवते याची हकिकत आहे...‘क्याट’मध्ये एका फसलेल्या साहित्य संमेलनाचं हास्यचित्रात्मक कथन आहे... इरसाल व्यक्तिरेखा असलेल्या, अस्सल ग्रामीण भाषेतील खळखळून हसायला लावणार्या कथा
-
Rait (रैत)
जैसिंग...इनामदारांकडे गडी म्हणून राबणारा एक तरुण...गावातल्या मास्तरांच्या निपाणीजवळच्या गावात असलेल्या मळ्याचा रैत (मळा सांभाळणारा) म्हणून जातो...जैसिंग तसा थोडा रगेल, थोडा रंगेल, पण माणुसकी जपणारा...कधीतरी स्वत:च्या एकटेपणाची जाणीव होणारा...मळ्यातलं काम करता करता गावाशीही त्याचे स्नेहबंध जुळतात...फुली ही बिनधास्त मुलगी आणि अंजी ही गरीब घरातली मुलगी...दोघींबद्दल त्याच्या मनात आकर्षण आहे... गावच्या पाटलाशी त्याची घसट वाढते...पण पाटलाच्या नादाने बाई-बाटली-जुगार याचा त्याला नाद लागतो...पण वेळीच तो त्यातून सावरतो...फुलीचं लग्न होतं, पण काडीमोड होतो...फुली वेड्यासारखी वागायला लागते...अंजीबद्दल जैसिंगाला ओढ आहेच...पण एका प्रसंगाने जैसिंगाच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडतो...अंजीचं लग्न झालंय...पण दादला तिला नांदवत नाही...मात्र एकदा अंजीच्या दादल्याचं पत्र येतं तिला नांदायला येण्याविषयी...हे ऐकल्यावर जैसिंग हादरतो...ग्रामीण पार्श्वभूमीवर फुललेल्या जैसिंगाच्या भावविश्वाचं मन रमवणारं दर्शन
-
The Prodigal Daughter (द प्रॉडिगल डॉटर)
फ्लोरेंटिनानं लहान वयातच स्वप्न पाहिलेलं असतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होण्याचं...त्या दृष्टीने तिची गव्हर्नेस मिस ट्रेडगोल्ड तिला घडवते...फ्लोरेंटिना आणि रिचर्ड परस्परांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध होतात... दोन मुलं होतात त्यांना...फ्लोरेंटिना एक उद्योजिका म्हणून आणि रिचर्ड एक बँकर म्हणून यशाचं शिखर गाठतात...आणि मग फ्लोरेंटिनाचा शाळासोबती एडवर्ड तिला राजकारणात येण्यास प्रवृत्त करतो...ती काँग्रेस सदस्य होते...नंतर सिनेटर होते... तिची लोकप्रियता वाढते...राजकारणातील ओंगळपणाचं दर्शन तिला होतं...तरीही राष्ट्राध्यक्ष पदाच्या दिशेने ती सरकत असते...रिचर्डच्या मृत्यूनंतर थांबते काही काळ...पण परत सक्रिय होते...राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या अटीवर पीट पार्किन तिला आधी उपाध्यक्ष आणि नंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्याचं आश्वासन देतो... काय होतं पुढे? दोन घराण्यांचं वैर, प्रेमाचा वसंत आणि राजकीय पटाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची जबरदस्त कहाणी.
-
The Day Of The Jackal (द डे ऑफ द जॅकल)
आपल्या हाती अनिर्बंध सत्ता असावी या हेतूने सरकारविरोधी ओएएस संघटनेने प्रÂान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांचा वध करण्याचा कट रचला; पण तो असफल झाला. हा प्रयत्न फसल्यामुळे लगेच पुढच्याच वर्षी १९६३ मध्ये ओएएस संघटनेच्या प्रमुखाने एका अज्ञात इंग्लिशमनला द गॉल यांच्या हत्येची सुपारी दिली. ऐशआरामी जीवन आणि पैशासाठी काहीही करणार्या इंग्लिशमनने अर्थात अतुलनीय बुद्धिमत्तेच्या आणि अफाट क्षमतेच्या निष्णात नेमबाजाने हा विडा उचलला. त्याचा सुगावा लागताच अध्यक्षांच्या जीवावर उठलेल्या जकॉल या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणार्या निर्दयी व क्रूर मारेकर्याला रोखणे अत्यावश्यक तर होतेच, परंतु केवळ सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढणेही अवघड आणि अशक्य होते. तरीही जकॉलच्या लक्ष्य साध्य करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रत्येक खेळीवर मात करत फ्रान्स च्या पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणेने जकॉलचीच यमसदनाला पाठवणी केली...