-
Devraichya Savalit (देवराईच्या सावलीत)
माणसाच्या शारीरिक व्याधी उपचाराने बऱ्या होतात; पण मानसिक आजार बरे झाले तरी अशा माणसांना सामाज पूर्णपणे स्वीकारत नाही, हे वास्तव आहे. स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात जाण निर्माण करण्याचे काम सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी देवराई या चित्रपटातून केले आहे. या आजाराचे स्वरूप, त्यावरील उपचार, स्किझोफ्रेनिक मांसाकाला समजून घेणे, त्याला भावनिक आधार देणे कसे गरजेचे आहे, याचबरोबर यावरील उपचार याचे चित्रण यात आले आहे. वैद्यकीय, मानसीक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या या चित्रपटाने मोठी उंची गाठली. याचा अनुभव कागदावर उतरवून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 'देवराईच्या सावलीत' मधून वाचकांपुढे ठेवला आहे. चित्रपटाचा रसास्वाद, भावे व सुकथनकर यांचे कथन, केस स्टडी, विज्ञानाच्या नजरेतून चित्रपटाचे विश्लेषण, उपचाराच्या दिशा, रुग्णांचे अनुभव यातून या आजाराविषयी जागृती, रुग्णांची मनोव्यथा, कुटुंबाची वेदना व अशा आजाराशी लढण्याचे सामर्थ्य मिळते.
-
Harberiyam (हर्बेरियम)
जुनी नाटके प्रेक्षकांच्या दीर्घ काळ स्मरणात असतात. त्यांना ती नाटके पुन्हा पाहता यावीत यासाठी "हर्बेरियम'चा उपक्रम राबवणारे सुनील बर्वे हे अभिनेते वेगळेच आहेत. नाट्यसृष्टीत हा उपक्रम राबवून पाच नाटकांचे केवळ 25 प्रयोग करून आजच्या बिझी कलावंतांना पुन्हा रंगमंचावर आणून प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या या उपक्रमाची सुरवात आणि त्याचा सगळा प्रवास कसा झाला, हे या पुस्तकात सांगितले आहे. रंगभूमीवरच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाने बरेच वादळ उठवले होते. या उपक्रमातील सहभागी मंडळींकडूनच या पुस्तकासाठी लेख घेण्यात आले असून, त्याचे संकलन केले आहे. मंदार जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. "हर्बेरियम' या प्रयोगाची संकल्पना समजावून सांगण्याबरोबरच या उपक्रमाची ऐतिहासिक नोंद लिखित स्वरूपात या पुस्तकामुळे झाली आहे.
-
Jawaharlal Nehruche Netrutva-Ek Sinhavalokan (जवाह
भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.