-
Mahamaya (महामाया)
महामाया' या पुस्तकात मराठी संतांच्या भारुडांतील कैकाय आणि तंजावरी परंपरेत रचल्या गेलेल्या कुरवंजी नाटकांतील कैकाडीण यांचे आत्मरहस्य सामाजिक दृष्टीने उकलले आहे; तसेच, अभिजनांच्या परंपरेने रंजन आणि प्रबोधन यांसाठी जिचे महामाया-रूप गौरविले आहे, त्या स्त्रीच्या आणि तिच्या प्रजेच्या दीर्घकालीन दुरवस्थेचे भेदक दर्शन घडविले आहे. मराठी संतांची कैकायविषयक भारुडे आणि तंजावरच्या मराठी राजपुरुषांची कुरवंजी नाटके यांच्या सर्वांगीण आकलनाच्या निमित्ताने, संपूर्ण दक्षिण भारतातील समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा एक वस्तुपाठच या पुस्तकातील शोधसहयोगातून प्रकट झालेला आहे. दक्षिणेतील धर्मेतिहास आणि नाट्येतिहास यांचे अंतःसंबंध हळुवारपणे उलगडताना डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर या साक्षेपी अभ्यासकांनी, सामाजिक दृष्टीने धर्म-कलादींची समीक्षा करणाऱ्या विचारकांसाठी शोधाच्या कितीतरी नव्या वाटा उजळल्या आहेत; आणि भटक्या-विमुक्तांच्या उत्थानाच्या चळवळीत अग्रेसर होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अस्मितापोषक विचारपाथेय दिले आहे.
-
Bhalchandra Nemade Sahityavichar Aani Kadambarya
भालचंद्र नेमाडे यांच्या प्रातिभ निर्मितीचा आणि साहित्यविचाराचा असलेला अतूट संबंध शोधण्याचा मौलिक प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. नेमाडे यांनी मांडलेल्या वास्तववाद, नैतिकता, बांधिलकी आणि देशीवाद या संकल्पनांचे त्यांच्याच कादंबऱ्यांत उपयोजन आहे. त्यांचा साहित्यविचार व त्यांची कादंबरी सामाजिक वास्तवावर भर देते, वसाहतवादी ज्ञानशाखांना छेद देते; तसेच समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राकडे आणि संस्कृती विडंबनाकडून संस्कृती स्वीकाराकडे जाताना दिसते- असे या संशोधनाचे सार आहे. नेमाडे मानवी लैंगिकता, संस्कृती, इतिहास यांना नैतिक कसोटी लावतात. बांधिलकीच्या भूमिकेतून जाती-पोटजातींच्या अंत:स्तरावरील मूल्यव्यवस्था, सौंदर्यकल्पना साकारतात. भाषिक कृती करत संस्कृती, परंपरा, मूल्ये आणि प्रदेश, परिसरनिष्ठा, मानवी जाणिवा यांचे सांस्कृतिक आकलन मांडतात. व्यक्तीच्या प्रेरणा, त्याचे जगणे, सृष्टी यांचा मानववंशशास्त्रीय शोध घेतात- अशी या संशोधनाची मांडणी आहे. याशिवाय नेमाडे यांच्यातील सर्जनशील लेखकाने आपली निर्मितिप्रक्रिया साहित्यविचाराच्या चौकटीत कशी कोंबली नाही, हे या ग्रंथात उलगडून दाखवताना संशोधकाने नेमाडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या गदारोळात कमालीची तटस्थता दाखवली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या समीक्षेचा आणि त्यांच्या सर्जनशील निर्मितीचा तटस्थपणे शोध घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच आश्वासक ठरणार आहे.
-
Kathasetu (कथासेतू)
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतांची आपापली वेगळी भाषा असली तरी त्यांच्या लोकजीवनात काही अंशी साम्यही आहे आणि म्हणूनच मराठी आणि गुजराती भाषांना 'भाषा-भगिनी' म्हणणे उचित ठरेल. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिसरण होत राहावे, भारतीय संस्कृतीचा सामायिक वारसा जपण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न व्हावेत, त्यासाठी भारतीय भाषांचे आपापसात अनुवाद होऊन भाषा-भगिनींच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळावी, यासाठी 'आंतरभारती' ही संकल्पना अस्तित्वात आली. 'कथासेतू' या कथासंग्रहाद्वारे गुजराती भाषेतील काही ख्यातनाम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने गुजराती भाषेतील जुन्या-नव्या सुप्रसिद्ध एकवीस साहित्यिकांच्या लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वाद मराठी वाचकांना मिळणार आहे.
-
Sahabandha:Eka Dnyanopasakashi (सहबंध : एका ज्ञानो
कंपनीतली सुस्थिर नोकरी सोडून बेभरवशाच्या प्रकाशन-व्यवसायात उतरण्याचा धोका पत्करलेले अरुण जाखडे यांनी साधारण १९९५च्या मध्याला डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याकडे पुस्तकांची प्रकाशनासाठी मागणी केली आणि अण्णांनी ती फार साधेपणानं मान्य केली. तेव्हापासून दोघांमध्ये जो संबंध निर्माण झाला, तो केवळ लेखक-प्रकाशक एवढाच मर्यादित नव्हता. त्याला एक घरगुती गंध होता आणि तो अखेरपर्यंत तसाच राहिला. प्रकाशक म्हणून जाखडे लेखक अण्णांविषयीचा मोठाच आदर मनात बाळगून होते. त्यांनी अण्णांच्या ग्रंथांवर मनापासून प्रेम केलं. अण्णांनी लिहावं आणि जाखड्यांनी प्रसिद्ध करावं, असा सिलसिला वर्षन्वर्षं चालू राहिला. त्यांच्यासाठी प्रकाशक म्हणून हा धन्यतेचा भाग होता, पण त्याहीपलीकडे जाऊन ते माणूस म्हणून अण्णांचे स्नेहभागी झाले होते. अण्णा आणि जाखडे या दोघांमधला स्नेहभाव अकृत्रिम तर होताच, पण सर्जकही होता आणि परस्परांना एका अर्थी प्रेरकही ठरला होता. --- अरुणा ढेरे
-
Dashavatar Kala Aani Abhyas (दशावतार कला आणि अभ्य
दशावतारी खेळाकडे लोककलेचा एक प्रकार म्हणून पाहिले जाते. विशिष्ट प्रदेशातील ते एक लोकनाट्य ! हा प्रकार ग्रामीण लोकसमूहाच्या रंजनासाठी अस्तित्वात आला आणि पुढे लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून त्याचा विस्तारही होत गेला. लोकरंजनाच्या या प्रयत्नात आपल्या सभोवताली जे काही सुंदर, मन मोहित करणारे, गुंगवून ठेवणारे असते, ते सारे दशावतारी कलाकार टिपत असतात. आपले भावविश्व कल्पनारम्य जगाशी जोडण्याचा ते सतत प्रयत्न करतात. त्यात मग विविध प्रकारच्या मानवी भावनाही येतात. आपल्या मनातील बऱ्यावाईट विचारांचे द्वंद्व आणि त्यातून उद्भवणारा भावकल्लोळ लोकनाट्यात परावर्तित कसा करता येईल, हा त्यांचा ध्यास ! आपली यासंदर्भातील अनुभूती लोकसमूहाप्रति कशी पोचवावी या विचारातून विजयकुमार फातर्पेकर यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यातून निर्माण झालेला दशावतारी खेळाचा अभ्यासपूर्ण असा हा विस्तृत आलेख !
-
Asa Ghadlo Mi (असा घडलो मी)*
विदर्भातील एका खेड्यात गरीब महार कुटुंबात तो जन्माला आला. खाण्याची आबाळ आणि उपचारांचा अभाव यामुळे त्या कुटुंबात मुलं जगत नसत. पण तो जगला. कधी मागते मागून मिळालेलं, तर कधी शिळंपाकं अन्न, कधी मेलेल्या गुरांचं मांस यावर तो वाढला. आईबरोबर तो शेतमजूर म्हणून कामाला जायचा. लाजिरवाणं जिणं जगत होता तो आणि त्याच्या वस्तीतील बाकीचेही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वस्तीच्या जीवनात प्रकाश पेरला. आंबेडकरांच्या विचारांनी त्याचंही घर उजळलं. तो शिकू लागला. शिष्यवृत्ती मिळत गेली आणि तो शिकत शिकत दिल्लीतील जेएनयुमध्ये पोचला. हा प्रवासही सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर अडथळे होते. अगणित अडचणींतून वाट काढत तो चालत राहिला आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. देशापरदेशात स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं. विदर्भातील एक दलित मुलगा समाजशास्त्रज्ञ होण्याचा हा रोमांचक प्रवास व्यक्तिगत उरत नाही; तो समाजाच्या खालच्या थरातील माणसांच्या जीवनसंघर्षाचा वर्णनात्मक आलेख बनतो.
-
Takiche Ghav (टाकीचे घाव)*
आयुष्य विलक्षण असतं. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' हा अनुभव कधीही कुणालाही येऊ शकतो. त्यांना तर ऊन-पावसाच्या खेळाप्रमाणे हा अनुभव वाट्याला आला होता. जरा कुठं काही चांगलं घडतं असं वाटत असतानाच अपमानानं सन्मानित होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत होती. कित्येकदा अवहेलना वाट्याला आली. आधी कौतुक करणारी माणसंच त्यांच्या स्वार्थाला अडथळा वाटू लागताच, अचानक नालस्ती करू लागली. अशा परिस्थितीतही ते शांत राहत होते. आयुष्याची अवघी ससेहोलपट होत असतानाही, त्यांना दुःख देणाऱ्यांचेही काही वाईट होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील होते. इतरांना दोष देत नव्हते. कोणावरही राग व्यक्त होऊ नये, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, यासाठी जपत होते. टाकीचे घाव सोसत होते. स्वतःला शांतपणे घडवत होते. टाकीचे घाव सोसतानाच्या या वेदनकळाच येथे लेखनकळा होऊन उतरल्या आहेत.
-
Marathi Natak Ani Natyasamikasha (मराठी नाटक आणि न
गेल्या दहा-बारा वर्षांत लिहिलेले माझे नाट्यविषयक लेख 'मराठी नाटक आणि नाट्यसमीक्षा' ह्या पुस्तकातून येथे सादर करीत आहे. मराठी नाट्यसमीक्षेचा विचार असे यातील बऱ्याच लेखांचे स्वरूप आहे. मराठीतील मान्यवर समीक्षकांनी केलेल्या नाट्यसमीक्षेचा काही लेखांतून परामर्श घेतला आहे. डॉ. रा. शं. वाळिंबे, प्रा. गो. म. कुलकर्णी आणि श्री. मकरंद साठे या समीक्षकांच्या नाट्यविषयक लेखनाचा स्वतंत्र लेखांतून परामर्श घेतला आहे.
-
Mothya Chakachya Khurchitun (मोठ्या चाकाच्या खुर्च
दूर उत्तर आफ्रिकेतील लिबियामधील वाळवंटी रस्त्यावरून एके सायंकाळी तीन गाड्या वेगानं जात होत्या. तेवढ्यात काही कळायच्या आत एका गाडीनं रस्ता सोडला आणि कोलांट्या घ्यायला सुरुवात केली. लेखक समोरच्या दोन्ही सीटच्यामध्ये अडकले होते. या जीवघेण्या अपघातातून लेखक वाचले खरे, पण त्यांच्या कमरेखालचा भाग कायमसाठी संवेदनाहीन झाला. आता प्रवास सुरू झाला मोठ्या चाकाच्या खुर्चीवरून. हे पुस्तक म्हणजे एका उच्चशिक्षित अभियंत्याची, मज्जारज्जूच्या दुखापतीमुळे त्याच्यावर आलेल्या वैयक्तिक अडथळ्यांची आणि आयुष्यात गमावलेल्या सुसंधी परत मिळवण्यासाठी केलेल्या निश्चयपूर्वक प्रयत्नांची गाथा आहे.