-
Devraichya Savalit (देवराईच्या सावलीत)
माणसाच्या शारीरिक व्याधी उपचाराने बऱ्या होतात; पण मानसिक आजार बरे झाले तरी अशा माणसांना सामाज पूर्णपणे स्वीकारत नाही, हे वास्तव आहे. स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात जाण निर्माण करण्याचे काम सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी देवराई या चित्रपटातून केले आहे. या आजाराचे स्वरूप, त्यावरील उपचार, स्किझोफ्रेनिक मांसाकाला समजून घेणे, त्याला भावनिक आधार देणे कसे गरजेचे आहे, याचबरोबर यावरील उपचार याचे चित्रण यात आले आहे. वैद्यकीय, मानसीक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या या चित्रपटाने मोठी उंची गाठली. याचा अनुभव कागदावर उतरवून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 'देवराईच्या सावलीत' मधून वाचकांपुढे ठेवला आहे. चित्रपटाचा रसास्वाद, भावे व सुकथनकर यांचे कथन, केस स्टडी, विज्ञानाच्या नजरेतून चित्रपटाचे विश्लेषण, उपचाराच्या दिशा, रुग्णांचे अनुभव यातून या आजाराविषयी जागृती, रुग्णांची मनोव्यथा, कुटुंबाची वेदना व अशा आजाराशी लढण्याचे सामर्थ्य मिळते.
-
Gulabi Sir - The Pink Headed Duck ( गुलाबी सिर - द
नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा. माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक अस्तित्व कधी वेढून, कधी उजळून, कधी झाकोळून तर कधी भोवंडून, चक्रावून टाकणारी ही वर्षं. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, आवाहनं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव… सगळंच ढवळून काढणारी वर्षं. सोबतीला निसर्गाच्या सतत होणार्या र्हासाची गिरमिटयुक्त जाणीव. पण कुठेतरी, आशेची एक न संपणारी लकेरही. ‘गुलाबी सिर – द पिंक हेडेड डक’मधील कथा म्हणजे ‘अपेक्षाभंग’ आणि ‘भ्रमनिरास’ या जुन्या दोस्तांच्या सोबतीनंच पण आशेच्या त्या लकेरीसह या सगळ्या जाणिवांना, बदलांना एका ताज्या, लिहित्या मनानं दिलेला सकारात्मक प्रतिसाद.
-
Film Makers (फिल्म मेकर्स)
गणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन. -सुमित्रा भावे
-
Gwahi Ani Vegli Nasaleli Gosht (ग्वाही आणि वेगळी न
प्रत्येक बाईला स्वत:चं मन असतं. स्वत:च्या इच्छा असतात. स्वत:चे विचार असतात. बर्याचदा होतं असं की, स्वत:च्या मनानं, इच्छेनं, विचारानं जगू पाहणारी माणसं परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकतात. बाई पण माणूसच असते. तीही दुष्टचक्रात अडकू शकते. पण एकदा ती दुष्टचक्रात अडकली तर बाई म्हणून तिला त्यातून सुटणं मोठं मुश्किल होऊन बसतं. बाई म्हणून तिला दुष्टचक्राचे काही वेगळे भाग भोगावे लागतात. स्वत:च्या जगण्याचे चुकीचे अथवा बरोबर निर्णय घेऊन जगू पाहणा बायकांना अनुभवाव्या लागणार्या परिणामांची कथा-व्यथा व्यक्त करणार्या या दोन कादंबर्या – ‘ग्वाही’ आणि ‘वेगळी नसलेली गोष्ट’. बाई, तिचं कुटुंब आणि समाजस्थिती यांच्या गुंफणीचं विविधांगी बारकाव्यांसह चित्रण या दोन्ही कादंबर्यांमध्ये आहे.
-
Rudraksha (|| रुद्राक्ष ||)
धार्मिक वृत्तीचे लोक मंत्रपठन व जपासाठी अनेक प्रकारच्या माळा वापरतात; परंतु रुद्राक्षमाळ सर्वश्रेष्ठ आहे असे शास्त्र सांगते; व याला वैज्ञानिक आधार आहे. वैदिक वाङ्मयातून रुद्राक्षाची महती वर्णिली आहे. जाबालोपनिषद तर संपूर्णपणे रुद्राक्षाला वाहिलेले उपनिषद आहे. रुद्राक्षाला पदार्थविज्ञान व रसायनविज्ञानाच्या कसोट्या लावून काही चिकित्सा केल्या आहेत त्याचा तपशील या पुस्तकात दिला आहे.रुद्राक्षाला भद्राक्ष म्हणून, बनावट रुद्राक्ष संबोधणारे लोकही आहेत. त्यांच्या व दिशाभूल करणार्या रुद्राक्षांच्या अन्य गोष्टींचीही माहिती या पुस्तकात सांगितली आहे. शिवाय रुद्राक्षाचे धार्मिक स्वरूप, औषधी गुणधर्म, ज्योतिषशास्त्र, मंत्रसामर्थ्य आणि लंबकचिकित्सा याही बाबींचा ऊहापोह याच पुस्तकात केला आहे. रुद्राक्षासंबंधीची चौफेर माहिती असलेले मराठीतील हे पहिलेच पुस्तक होय.
-
Kaddhanyache Vividha Padarth (कडधान्यांचे विविध पद
कडधान्य हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. कडधान्यांत प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. कडधान्यांचे रोजच्या आहारातील महत्त्व लक्षात घेऊन बनविलेले विविध पदार्थ या पुस्तकात दिलेले आहेत. सोबत त्या त्या कडधान्यांचे महत्त्वही सांगितलेले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत. या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैयजंती केळकर ह्यांची आतापर्यंत 18 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. `चैत्रांगण’ या त्यांच्या पुस्तकास `महाराष्ट्र शासना’चा पुरस्कार मिळाला. अनेक ठिकाणी परीक्षक म्हणूनही त्या जात असतात.
-
Puja (पूजा)
मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींचे नातेसंबंध, त्यांचे रितिरिवाज, आणि त्यांचे दैनंदिन जीवन यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब आशा बगे यांच्या कथांतून नेहमीच प्रत्ययास येते. ह्या कुटुंबातील वृद्ध माणसे, तरुण-तरुणी, कोवळी मुले- कोणी विद्यार्थी, कोणी गायक, कोणी आश्रित, कोणी दृष्टिहीन- या सर्वांच्या दैनंदिन जीवनातल्या छोट्यामोठ्या घटनांचे चित्रीकरण प्रस्तुतच्या ‘पूजा’ या कथासंग्रहातून प्रत्ययकारी रित्या आले आहे. छोट्या शहरांमधले शांत वातावरण, लहान-मोठ्या पात्रांची मानसिक आंदोलने, छोट्या-मोठ्या संवादांमधून आणि अल्पाक्षरी वर्णनांमधून डोळ्यांसमोर उभी राहणारी त्यांची व्यक्तिचित्रे... या प्रस्तुतच्या दीर्घकथा संग्रहातील सर्वच गोष्टी वाचकांना एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातात.