-
Antarangatil Pravas (अंतरंगातील प्रवास)
निरोप, पुनर्भेट आणि नवा जन्म मिळाला या तीन विषयांची सुंदर गुंफण यांच्याविषयी ललितलेख
-
Master Your Emotions (मास्टर युवर इमोशंस)
तुमच्या नकारात्मक भावनांवर मात करायची आहे का? तुम्ही फारसे चांगेल नाही आहात असे वाटते का? तणाव हाताळण्यात मदत हवी आहे का? नकारात्मकता दूर करण्यासाठी तुमच्या भावना तुमच्यावर काय परिणाम करतात हे समजून घेणे आणि त्यांना शक्य तितक्या प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी विशिष्ट उपायांचा वापर करणे हा एक उत्तम मार्ग ठरतो. मास्टर यूवर इमोशन्स हे ‘हाऊ-टू’ म्हणजेच कसे हाताळावे हे सांगणारी पुस्तिका असून ती तुमच्या पालकांनी तुम्हाला फार अगोदर द्यायला हवी होती. हे वाचून, तुम्ही नकारात्मक भावनांचा सामना कसा करावा हे शिकाल, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगू शकाल. या पुस्तकातून तुम्ही हे जाणाल: यात तुमच्या मनास पुनःसक्रीय करण्यासाठी एक साधे सूत्र आहे, ज्यातून तुम्हाला अधिक सकारात्मक भावनांचा अनुभव येईल; नकारात्मक भावना हाताळण्यासाठी ३१ सोप्या पद्धती; तुमच्या जीवनावरील नियंत्रण सुधारण्यासाठी, तुमच्या कथेत कसा बदल करावा; तणाव, सुरक्षितता, मत्सर, भीती आणि इतर नकारात्मक भावनांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक बाबींची अंमलबजावणी; तुमच्या वाढीस चालना देण्यासाठी भावनांचा उपयोग कसा करावा; आणि बरेच काही. मास्टर यूवर इमोशन्स व्यावहारिक उदाहरणांनी भरलेले आहे, ज्यामुळे तुमच्या भावनिक स्वास्थ्यावर त्वरित सकारात्मक प्रभाव पडेल. म्हणून, जर तुम्हाला नकारात्मक भावनांवर मात करायची असेल, तुमच्या भावनांच्या परिणामांवर नियंत्रण मिळवायचे असेल, आणि अधिक सकारात्मक आणि शांत जीवन जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा
-
Dopamine Detox (डोपामिन डिटॉक्स)
48 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तुमचा लक्ष्यबिंदू परत मिळवा. तुम्ही कामे लांबणीवर टाकत राहता का? तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही का? तुम्हाला महत्त्वाच्या कामांबद्दल उत्साह टिकविण्यात अडचण येत आहे का? आजच्या जगात सर्वत्र विचलित करणाऱ्या गोष्टी असल्याने, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता राखणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. आपण नेहमी उत्तेजित होत असतो, अस्वस्थ असतो, अनेकदा त्याचे कारण देखील आपल्याला माहित नसते. तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत पहात असाल, तर काळजी करू नका. डोपामीन डिटॉक्समध्ये, तुम्हाला निदर्शनास येईल: डोपामीन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते; पुढील 48 तासांत यशस्वीपणे डिटॉक्स अंमलात आणण्यासाठी 3 सोप्या पायऱ्या; विचलने दूर करण्यासाठी आणि तुमचा लक्ष्यबिंदू वाढवण्यासाठी काही क्रियाकलाप.
-
Shivnetra Bahirji Naik Khand - 5 (शिवनेत्र बहिर्जी नाईक - खंड ५ )
आपण आजवर शिवाजी राजांची अग्र्यातून सुटका हि एक घटना वाचत आलो आहोत. त्या घटनेत राजे आग्र्याला गेले कसे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आपले राजे क्रूर बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून निसटले कसे आणि ते अतिशय गुप्तपणे प्रवास करत राजगडावर कसे पोहोचले? तसेच शिवाजी राजांना शंभू राजांच्या निधनाची बातमी पोहोचवण्याची कल्पना नेमकी कशी सुचली? आपले राजे तर बादशाहाच्या कैदेत होते पण तरीही ते आपल्या सुटकेचे नियोजन इतक्या अचूकपणे कसे आखू शकले? कारण राजांचा हुकमी एक्का ‘बहिर्जी नाईक’ बाहेर होते. ते आग्र्यातच कायम राजांच्या जवळपास असायचे. राजांनी आणि बहिर्जीनी अतिशय चोखपणे आखलेली ती सुटकेची योजना नेमकी कशी साकार झाली? तसेच शिवाजी राजे स्वराज्यात परतल्यावर त्यांनी पहिली स्वारी कुठे केली? आणि बहिर्जी नाईकांनी त्या स्वारीची योजना कशी आखली? आणि त्याकाळात राजांच्या सगळ्यात गाजलेल्या मोहिमांपैकी एक मोहीम म्हणजे गोवा मोहीम. दोन महिन्यात सगळ्या हिंदुनी गोवा सोडून निघून जाण्याचा हुकुमनामा गोव्याच्या व्हाईसरॉयने काढला होता. त्याचे उत्तर म्हणून शिवाजी राजांनी गोव्यावर वादळी हल्ला केला. पण त्या हल्ल्याच्या आधी शिवरायांच्या गुप्तहेरांनी नेमकी काय आणि कशी कामगिरी बजावली?
-
Hi Chandrachuryachi Nakshi (ही चंद्रचुऱ्याची नक्षी)
ही चंद्रचुऱ्याची नक्षी लेखक : अनंत सामंत शेवटचं पान उलटल्यावरही मन लगेच परततं पहिल्या पानाव परत परत. उलाघालीत, की आपल्याला जसं जगावसं वाटलं होतं, परंतु जे जगलो त्यातलं अंतरच कसं उमटलंय या पानांत नेमकं? आणि भेटू शकतात एकमेकाला असे स्त्री, पुरुष? ज्या दोघांच्याही जगात हे अंतर अस्तित्वातच नसतं! सापशिडीचा खेळ तेही खेळतात आपल्यासारखेच. पण त्यांच्या खेळात दोघांसाठी एकच पट, एकच फासा, एकच दान आणि एकच सोंगटी असते. स्वप्नांची शिडी चढताना किंवा सर्पाच्या पोटात शिरतानाही दोघे ‘एक’च असू शकतात त्यामुळे इट इज नॉट फेअर. वाचकासाठी कहाणी असली, तरी जे दोघे जगले त्यांच्यासाठी वास्तवच आहे ना हे! एव्हढं सहज एवढं खरं, दाट, गर्द येतं जगता एकजीव होऊन यावर विश्वास नाही बसत. पण मी होते ना साक्षीला ! व्यवहाराच्या बांधाबाहेरून बिनदिक्कत, बेभान वाहणाऱ्या अनोख्या नितळ नात्याच्या मुक्त खळाळात चिंब भिजून हा चंद्रचुरा वेचता, वाचता आपल्यालाही लख्ख उमजेल, जमेल वाटतं सारं! सापडेल एकच पट, एकच फासा, एकच दान, एकच सोंगटी घेऊन खेळायचा डाव मांडून वाट पाहत उभा जोडीदार! आपलाच पार्टनर कदाचित. It’s Never Too Late! अनामिका
-
Apala Manus (आपलं माणूस)
आपलं माणूस माणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुत-हांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी… माझे उजवे हात / गुलजार वामनराव कुबेर / गिरीश कुबेर पवनारचे गौतमभाई / सुप्रिया सुळे नवाब ऑफ पतौडी / प्रदीप चंपानेरकर पद्मश्री यमुनाबाई वाईकर / अरुण शेवते जलऋषी राजेंद्रसिंह / श्रीराम पवार भाऊसाहेब बांदोडकर / दिलीप माजगावकर रुम पार्टनर जितेंद्र बांदे / श्रीकांत बोजेवार डॉ. पी. डी. पाटील / सुशीलकुमार शिंदे तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… आपलं माणूस !
-
Mantra (मंत्र)
पितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं. आश्रम सोडल्यानंतर जिच्या घरी त्याला आसरा मिळतो, त्या अनसूयेला उत्तरणच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचंय. संसार करावा की व्रतस्थ आयुष्य जगावं अशा संभ्रमावस्थेत असतानाच उत्तरण विचारांच्या एका वळणावर अनुसूयेसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतो. हे नातं पुढील आयुष्यात कोणतं वळण घेतं? उत्तरणपुढे कोणते पेच निर्माण होतात? या व इतर पेच प्रसंगांची उकल कशी होत जाते? लेखक बिनायक बंद्योपाध्याय त्यांच्या संवादी शैलीत ही कथा या कादंबरीत समर्थपणे रंगवत जातात. ईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ‘संसारी संन्याशाची’ अध्यात्मिक धाटणीची कादंबरी… मंत्र !
-
Disha Gharachya (दिशा घराच्या)
दिशा घराच्या लेखक : सानिया गेली पाच दशके सातत्याने सरस व सकस साहित्यनिर्मिती सानिया करीत आहेत. ‘शोध’, ‘प्रतीती’, ‘खिडक्या’, ‘दिशा घराच्या’, ‘ओळख’ ‘भूमिका’, ‘वलय’, ‘परिमाण’, ‘प्रयाण’, ‘ओमियागे’ आणि ‘अशी वेळ’ यांसारखे कथासंग्रह, ‘स्थलांतर’, ‘आवर्तन’ व ‘अवकाश’ यांसारख्या कादंबऱ्या आणि ‘काही आत्मिक काही सामाजिक’ हा ललित लेखांचा संग्रह, हे सारेच लेखन वाचकाला आत्मभान व विश्वभान देणारे आहे. कदाचित म्हणूनच ‘दिशा घरांच्या’च नव्हे तर स्वतःच्यादेखील कसून शोधण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, वैचारिकता व प्रतिमात्मकता यांची सांगड घालणाऱ्या एकंदर चार दीर्घकथांचा हा संग्रह वर्तमानात चौतीस वर्षांनी पुनर्मुद्रित होतो आहे ही घटना निश्चितपणे स्वागतार्ह म्हटली पाहिजे. कारण लिंग, जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा व विचारसरणी यांना ओलांडून जाणाऱ्या मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला भिडण्याची प्रेरणा येथे प्रबळ आहे. व्यवस्था बदलली तरी माणसांमधील परस्परसंबंध, त्यातील निरगाठी सहजपणे सुटत नाहीत. मूल्यांचे टकराव कधी सौम्य तर कधी तीव्र पण ते होत राहतात. म्हणून समकालीन आणि सार्वत्रिक, विशिष्ट आणि व्यापक व कलात्मकता आणि कौशल्यपूर्णता यांची उत्तम सांगड घालणाऱ्या या दीर्घकथा आजही वाचनीय व प्रस्तुत ठरतात, यात शंका नाही.
-
Veer Yoddha Arjun (वीर योद्धा अर्जुन)
अखेर महायुद्ध संपलं… भीषण संहार… रक्ताचे पाट… प्रेतांचे ढीग… “महायुद्धानंतर माझी आंतरिक जडणघडण पार बदलून गेली, कोलमडून पडली आणि अनेक आंतरिक उलथापालथींमधून नवाच मी निर्माण झालो. आता सिंहावलोकन करताना, मला माझे, माझ्या व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग झालेले दिसतात. पहिला भाग महत्वाकांक्षी, सर्वश्रेष्ठ होण्याची तीव्र आस असलेल्या राजपुत्राचा तर दुसरा भाग वास्तवाच्या दर्शनाने स्तिमित झालेल्या मानवप्राण्याचा. हो, मी असेन दैवीपुत्र परंतुः महायुद्ध दर्शनानंतर मी उरलो तो केवळ एक मानव…” श्रीकृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, युधिष्ठिर, दुर्योधन, द्रौपदी, अग्ग्री, अश्वसेन, एकलव्य, सात्यकी, बृहन्त्रडा, शिखंडी आणि अर्जुन यांच्या मनोगतांमधून उलगडलेली एका महायोद्ध्याच्या वीरत्वाची आणि मानसिक आंदोलनांची कहाणी… वीर योद्धा अर्जुन !
-
1965 : Bharat-Pakistan Yuddhakatha (१९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा)
१ सप्टेंबर १९६५… पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील चुंब जिल्ह्यामध्ये हल्ला चढवला. शांतताप्रिय भारत देश युद्ध छेडणार नाही, अशी पाकिस्तान्यांची समजूत होती. पण ती चुकीची ठरली. त्या आक्रमणामुळे रक्तपाती युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाडा-युद्ध म्हणून ओळखलं गेलं, ज्यात पाकिस्तानकडील अमेरिकी पॅटन रणगाड्यांना भारतीय सैनिकांनी नामोहरम केलं. लष्करी नोंदी आणि युद्धात सर्व जागी झालेल्या सैनिकांच्या तसंच हुतात्म्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतींच्या आधारे लेखिका रचना बिश्त यांनी हाजी पीर, असल उत्तर, फिलोरा यांसारख्या लढायांची माहिती, त्यांमधले डावपेच, अचानक उभी ठाकलेली आव्हानं आणि त्यांवर केलेली मात यांबद्दलचं विश्वासार्ह कथन या पुस्तकात केलं आहे. तसंच वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या हृद्य स्मृतींना उजाळाही दिला आहे. भारतीय सैनिकांच्या अतुल्य धैर्याच्या, वीरश्रीच्या आणि शौर्याच्या कथा म्हणजेच १९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा !
-
Muktartha (मुक्तार्थ)
मुक्तार्थ साहित्य आणि संस्कृती यांच्या दरम्यान... नीतीन रिंढे लेखकाचं साहित्य, त्यामागं असलेलं त्या लेखकाचं चरित्र अन् या दोहोंच्याच मागं नव्हे, तर एकंदर साहित्यव्यवहारामागं असलेलं सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण अशा तीनही प्रतलांना स्पर्शणारे साहित्यविषयक लेख 'मुक्तार्थ मध्ये वाचायला मिळतात. साहित्याची निर्मिती, आस्वाद आणि प्रत्यक्ष साहित्य यांना सांस्कृतिक अंगाने भिडणारे हे लेख आहेत. लेखकांची भौतिक चरित्रं आणि त्यांची कल्पनाशक्ती, साहित्याच्या निर्मितीची भौतिक साधनं आणि तात्त्विक आयुधं, वाङ्मयीन क्षेत्रांतल्या घडामोडी आणि जाणीवपूर्वक आकाराला आलेल्या वाङ्मयीन चळवळी या सर्वांमधले आंतरिक संदर्भ तपासत साहित्याकडं संस्कृती-अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न 'मुक्तार्थ' मधल्या लेखांतून केला आहे. 'मुक्तार्थ 'मधल्या लेखांतून इंग्रज वसाहतकाळातल्या साहित्यव्यवहारापासून, साठोत्तर काळातल्या साहित्यचळवळींपर्यंत अनेक दुर्लक्षित जागांना उजाळा मिळाला आहे.
-
Spy Stories-Laxmi Panda (स्पाय स्टोरीज-लक्ष्मी पांडा)
लक्ष्मी पांडा नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा लेखक : सॅवी कार्नेल अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…! ही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते… महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…! या मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते… या प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते… काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची… लक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…
-
Uttar Pradeshachi Khidki (उत्तर प्रदेशाची खिडकी)
उत्तर प्रदेशची खिडकी विमलचंद्र पाण्ड्ये अनुवाद चिन्मय पाटणकर 'विमलचंद्र यांच्या कथा लेखकाचा हात लिहिता असण्याच्या काळात मराठीत येणे मला महत्त्वाचे वाटते. कारण आपल्याकडे हिंदी सोपे या जाणिवेतून भरताड अनुवाद भरपूर झाले. जे चांगले आले, त्यात प्रेमचंदांपासून उदय प्रकाश यांच्यापर्यंतच्या क्लासिक कहाण्या खूपच उशिराने मराठी वाचकांना वाचायला मिळाल्या. चिन्मय पाटणकर आणि रोहन प्रकाशन यांनी विमलचंद्र यांच्या या कहाण्यांना त्या हिंदीत गाजत असतानाच मराठीत आणण्याची वाट सुकर करून दिली. या कथा मराठीत येताना बिघडल्या अथवा बिथरल्या नाहीत. तर, मूळ हिंदीतल्या काही कथा आज एक तपानंतर मराठीत वाचतानाही पहिल्या वाचनासारखे त्यांत अडकून राहता आले. ...हा लेखक आपल्याला पारावर बसून गोष्ट सांगण्याच्या थाटात सुरू होतो. आपण त्याच्या सांगण्याच्या शैलीने भारावून जातो कारण असा किस्सानिष्णात प्रकार खूप लेखक वाचूनदेखील आपल्यापर्यंत पोहोचलेला नसतो. " पंकज भोसले (प्रस्तावनेतून)
-
Earphones (इअरफोन्स)
टीनएजर मुलांनो, तुमच्या परिघातील विषय, तुमची भाषा, तुमचे विचारचक्र आणि भावविश्व असं सर्व, या पुस्तकांतील कथांमधून लेखक गणेश मतकरी यांनी चितारलं आहे. तुमच्या अडनिड्या वयात तुमच्या मनात चाललेली खळबळ लेखकाने यात अलवारपणे चितारली आहे. एखादा आर्किटेक्ट ज्या बारकाईने हरेक तपशीलाचे रेखाटन करतो, तशा रीतीने या गोष्टींतील घटनांची आणि व्यक्तींची सूक्ष्म वर्णने लेखकाने केली आहेत. त्यामुळे या कथा वाचताना कित्येक गोष्टी, त्यातील प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात आणि मनात ठसतात; दीर्घकाळ रेंगाळतात. गोष्टींतील नायक व नायिकांचा चांगुलपणा मनाला भिडतो. मुलांनो, तुम्हाला या कथा ‘आपल्या’ गोष्टी वाटतील. आणि पालकांनो, तुमच्या पिढीला या कथा तुमच्या स्वतःच्या ‘त्या’ वयात पुन्हा नेऊन आणतील आणि आपल्या मुलांकडे बघण्याचा योग्य चष्मा देतील. एकंदर आजच्या समाजाला या मुलांच्या विलक्षण विश्वाकडे बघण्याचा जरा समंजस दृष्टिकोन देतील. -शुभदा चौकर
-
Sujit Karlekrancha Swapnabhang Ani Itar Katha (सुजीत कार्लेकरचा स्वप्नभंग आणि इतर कथा)
सुजीत कार्लेकरचा स्वप्नभंग आणि इतर कथा लेखिका : डॉ. लिली जोशी पन्नास वर्ष वैद्यक व्यवसायात असल्याने लेखिका डॉ. लिली जोशी यांना असंख्य पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, नात्यांमधील गुंतागुंत, मानसिक आंदोलनं आणि आर्थिक ताण हे सर्व अगदी जवळून पाहता आलं. रोजचे तेच ते पेशंट आणि तेच ते आजार असा सरधोपट दृष्टिकोन न ठेवता संवेदनशील मनाची ही लेखिका त्यांच्या अंतर्मनात शिरून, कल्पित शब्दांच्या दुनियेतून त्यांना बघू लागली. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना आलेले दाहक, भेदक आणि अंतःस्पर्शी अनुभव यांतून मग भावपूर्ण कथा त्यांच्या मनात आकार घेऊ लागल्या… थांग न लागणारी अनेकविध पात्रं, नाट्यमय प्रसंग आणि समाजाची वास्तवचित्रणं करतानाही त्यातून निघू शकणारा सकारात्मक दृष्टिकोन या कथांमध्ये डोकावू लागला… आणि मग अनुभव व कल्पकता यांची गुंफण होऊन साकार झाल्या या चौदा कथा ! या कथांमधून डॉ. लिली जोशी यांच्या प्रगल्भ लेखणीचा जागोजागी प्रत्यय येत राहतो. मानवी स्वभावाची आणि समाजाची विविध रूपं टिपणाऱ्या कथांचा संग्रह… सुजीत कार्लेकरचा स्वप्नभंग
-
Hari - Har Yuddha (हरी-हर युद्ध)
हरी – हर युद्ध श्री कृष्ण आणि शिवशंकर यांच्यातील महासंग्रामाची कथा लेखक : अंतर आत्रेया अनुवाद : प्रणव सखदेव आर्यावर्त साम्राज्याचा हेर संजन गिरोह या बंडखोर संघटनेत गुपचूप प्रवेश करतो. तिथे त्याची मेट होते, धाडर्स मधूरी. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा ते आपापली रहस्यं एकमेकांना सांगतात, तेव्हा समजतं की, संजम हा प्रत्यक्षात द्वारकाधीश श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे, तर मधू ही प्रत्यक्षात प्राग्ज्योतिषपूर राज्याचा असुर राजा बाणासुराची कन्या उषा आहे. आर्यावर्त साम्राज्य खिळखिळं करण्यासाठी बाणासुराने गिरोहला पाठिंबा दिला, असा आरोप श्रीकृष्णाने केलेला असतो. त्याबद्दलचं सत्य जाणून घेण्यासाठी उषा आणि अनिरुद्ध प्राग्ज्योतिषपूरची राजधानी सोनितपूरला जातात. परंतु तिथे अनिरुद्धला कैद होते आणि युद्धाचे बिगूल वाजतात हे युद्ध असनं दोन देवांमधलं… श्रीकृष्ण आणि शिवशंकर यांच्यातलं… बाणासुराला दिलेल्या वरदानामुळे शिवशंकराला युद्धात भाग घ्यावा लागतो, तर नातवंडासाठी, त्याच्यावरील प्रेमापोटी, आपल्या कुटुंबासाठी श्रीकृष्णाला युद्ध करणं अनिवार्य असतं… आणि मग अख्खी सृष्टीच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोचते…. भारतीय पुराणकथांमधल्या एका रक्तपाती युद्धाची थरारक कथा… हरी-हर युद्ध !
-
Itranama (इत्रनामा)
ही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही ! जगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही ! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच. प्रेमात सबकुछ करायला तयार असणारी मंडळी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गोंधळून जातात, अशावेळी उमगलेली आस्था आणि न उमगलेली आस्था यांच्यातलं घर्षण अटळ होऊन जातं. या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत. लहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला… तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही… पण प्रेम असं सोयीने करता येतं का? अनेक पेच, अनेक प्रश्न… प्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक आंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची धर्मापलीकडे जाणारी कादंबरी…
-
Akashvani (आकाशवाणी)
आकाशवाणी गावं-शहरं-मनं जोडणाऱ्या ध्वनिलहरी ९० वर्षाचा जिव्हाळ्याचा प्रवास नीलेश कुलकर्णी विक्रांत पांडे अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी आधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे 'रेडिओ प्रसारण', सरोजिनी नायडू गेल्या नऊ दशकांपासून 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात, 'आकाशवाणी' भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते 'रेडिओ'शी जिव्हाळ्याने जोडून आहेत. या पुस्तकात 'आकाशवाणी'ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षाच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर 'शेअर' करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक... आकाशवाणी
-
Rooh (रूह)
माझी नजर तिथे खिळून आहे... जिथून तुझा परिमळ दरवळतो आहे... जिथून तू दिलेली हाक मला साद घालते आहे त्याच त्या सफेद भिंतीतल्या निळ्या दरवाजाकडे !
-
Ghodmunje (घोडमुंजे)
घोडमुंजे रवींद्र पांढरे ग्रामीण भागातील एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब... खाऊन, पिऊन सुखी. मुलगा सुशिक्षित... पण नोकरी नाही, मग अधूनमधून घरच्या शेतावर जाणार. शेतावर काम करणाऱ्या या देखण्या, उमद्या मुलाची लग्नाच्या बाजारात पत राहत नाही. त्याला मुलगी देण्यास कुणी उत्सुक नाही... मग लग्नासाठी तडजोड कशावर होते? आज ग्रामीण भागातील शेतकरी मुलांची लग्रं जमणं कठीण होत चाललं आहे. मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या बदलल्या आहेत असं म्हणणं जास्त योग्य... मग आल्या तडजोडी ! त्या कशा होतात? तडजोड करायला तयार नसलेल्या मुलांचं, त्यांच्या संसाराच्या स्वप्नांचं काय होतं? गावाकडच्या शेतीप्रधान व्यवस्थेतील या ज्वलंत समस्येवरची कादंबरी... घोडमुंजे
-
Spy Stories-Chitrantun Ulgadnara Rahasya (स्पाय स्टोरीज-चित्रातून उलगडणार रहस्य)
लेखक : तरुण मेहर्षी अनुवाद : विजय तरवडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कमल यांना कृषी संशोधन केंद्रातील दोन चित्रं चोरीला गेल्याचं आणि त्या चित्रांची किंमत ४०० कोटी रुपये असल्याचं समजतं… आणि त्याच वेळी भारतीय गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांना ‘आयएसआय’मध्ये पेरलेल्या एका हेराकडून माहिती मिळते की, एका दहशतवादी गटाकडून मोठा आण्विक हल्ला करण्याची योजना आखली जाते आहे. एकीकडे कमल चोरीचा माग काढू लागतात… तर दुसरीकडे गुप्तचर संस्था प्रमुखांना समजतं की, त्या चित्रांच्या विक्रीतून उभा राहणारा निधी आण्विक हल्ल्याकरता वापरला जाणार आहे! त्यात भर म्हणजे या प्रकरणात अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’देखील गुंतलेली असते… कमलना ती चित्रं परत मिळवता येतात का? भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना चित्रांचा लिलाव थांबवता येतो का? अखेरीस, त्यांना दहशतवादी हल्ला रोखता येतो का? सत्य घटनांवर आधारलेलं, वेगवान आणि खिळवून ठेवणारं थ्रिलर… चित्रांतून उलगडणारं रहस्य