-
Me Saayuri
एक कोळ्याची पोर अंगभूत सौंदर्य, हुशारीने बनली सुप्रसिद्ध जपानी गेशा! तिची ही आगळी वेगळी मोहमयी दुनिया! समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ - बागडणारी कोळ्याची पोर चियोचान.... दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपर्यंत ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणां च्या कहाण्या सायूरी सांगत राहते.हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा ३१ वर्षांनी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, -दददुसर्या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं!
-
Vaastu Ajit
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणार्या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉइग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉईग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वौदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बौठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वौदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
-
Yayaati (ययाति)
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
-
Pratispardhi (प्रतिस्पर्धी)
कादंबरी सोळाव्या शतकातील; परंतू तिची स्पंदनं मात्र कालातीत. याचं कारण तिचे अनेक पैलू आणि मनुष्य स्वभावाचा नागरिकांनी अतिशय खोलवर घेतलेला शोध. त्या काळातील वास्तव जिवंत करत असतानाच मेवाडच्या राजघराण्यातील अंतर्गत कलह आणि मानसिकता याचं चित्रण हा कादंबरीचा मुख्य गाभा. नगरकरांची पारदर्शक, नितळ आणि जिवंत भाषा मनाची पकड घेणारी. मग विषय कुठाचाही असो, राजकीय महत्वकांक्षा, हेवेदावे, युद्ध, जय-पराजय, भक्ती आणि धर्म तसेच विविध काला या सर्वांचाच आपल्या जीवनाशी संबंध जोडणारी ही कादंबरी आहे आणि मुख्य म्हणजे कादंबरीची गतिमानता वाचकाला पूर्णतः खिळवून ठेवते!
-
Chaugheejani (चौघीजणी)
लुइसा मे अल्कॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची 'लिटल् वुईमेन’ ही कादंबरी १८६८ साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. 'लिटल् वुईमेन’ ही अमेरिकेतल्या 'मार्च’ कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते..."
-
Sahajtechya Traasachi Suruvaat
मला बघणा-याला मी थिजल्यासारखा दिसेनही कदाचित. बायका आणि सिगारेट... त्यात पुन्हा माझीच बायको !... पुन्हा शिव्याच... पुढं काय करू ! शिव्या किती वेळ घालणार ? मी तसाच बसतो. बायको माझ्याकडं बघून सिगारेट विझवते आणि स्वयंपाकघरात निघून जाते... मी शिव्या थांबवतो आणि थिजलेल्या अवस्थेतून बाहेर येऊन आरामखुर्चीत नीट बसून स्वत:लाच विचारतो, की एवढं मनाला का लावून घ्यायचं ? माझी बायको गॅसवर कुकर ठेवताना बघून मला प्रेम दाटून आलं, कारण नकळतपणे तिनं माझं मनातलं ठामपण गोंजारलं... तीच बायको सिगारेट ओढते... आणि... मला माझ्या मनातल्या ठामपणाला प्रश्न विचारायला लावते. आता आला ना त्रास ! आता जमलं बघा त्रासाचं बरोबर आणि सहजपणे !
-
Aaplya Purvjanche Vidnyan
आजच्या विज्ञानयुगाची किमया केवळ अफाट आणि पावलोपावली अचंबित करणारी... या सा-यांची मुळं जरा खणून पाहिली, हजारो-शेकडो वर्षांच्या इतिहासाची पानं खोलवर चाळून पाहिली आणि भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पाहिलं तर समजून येतं की, पूर्वजांच्या ज्ञानार्जनाचं आणि सखोल संशोधनाचंच फलित मिरवतोय आपण... एकंदरीतच, आजच्या विज्ञानयुगाची अलौकिक बीजं पूर्वजांनीच खोलवर रुजवलीत. याच अद्भुत शोधांचा कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना!
-
Aandhala Nyaay
काही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही खूण मागे उरतेच, जी त्याला पकडून देऊ शकते. पण पोलीस जर निरलस आणि कर्तव्यबुद्धीने तपास करतील तर समाजासाठी ती प्रगतीशील गोष्ट होईल. ए.सी.पी. निखील साने आणि त्यांचे सहकारी ज्या तडफदारपणे आणि चिकाटीने गुन्ह्याच्या आणि गुन्हेगारांच्या मुळाशी पोहोचतात, ते वाचताना वाचक रंगून जाईल. अशाच काही गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या तपासाच्या या मनोवेधक कथा.
-
State Of Fear
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायआॅक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारं जगाला पटवण्यासाठी NERF या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. NERF कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी समर्थक पॅसिफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
-
Aasud
या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यांच्या भीषण जगण्याचे सशक्तपणे चित्रण करणारी त्यांची कथा तिच्या आविष्कारशील बोली भाषेमुळे ग्रामीण कथेचे नवे वळण किती समृद्ध आहे, त्याचे दर्शन घडविणारी आहे. एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या मराठी ग्रामीण कथेतील 'शेती' आणि 'बळीराजा' यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेल्या अशोक कोळी यांचा हा कथासंग्रह. यातील कथा शेतीच्या प्रश्नांची उकल करताना संघर्षाला आंदोलनाचे नवे परिमाण देतात. शोषणव्यवस्थेवर 'आसूड' फटकारतात. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या छायेतून आलेल्या शोषणाच्या नवनव्या रूपांना छेद देत कथाकाराची लेखणी सामाजिक वास्तवाचा जळजळीत आविष्कार करते आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कष्टकरी माणसाला अंतर्बाह्य हलवून सोडते. शेतकर्याच्या दुबळ्या मनोवृत्तीला आत्मशोधातून संघर्षाचे आत्मभान देण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे. शेतकर्याला स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविता आले पाहिजेत, याची ओढ या कथाकाराला आहे. या कथांची शीर्षके, व्यक्तिरेखा, त्यांचा नैसर्गिक रांगडेपणा, अंतरंगाची प्रांजळता हे सर्व विविध वृत्ती-प्रवृत्तींनी प्रकट होणारे आहे. कथाकाराने ते मुद्दाम जीवनानुभूतीतून जसेच्या तसे ठसकेबाजपणे टिपलेले आहे. कथेला वास्तव रूप देण्याची हातोटी, बोलीतील रांगडे संवाद, शब्द व त्याचे अर्थवैभव, मातीशी नातं सांगणारी भाषाशैली ! हा सारा आविष्कार लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेची साक्ष देणारा आहे.