-
Gutenbargachya Savlya (गुटेनबर्गच्या सावल्या)
'गुटेनबर्गच्या सावल्या या पुस्तकात प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की, ज्ञानप्रसाराचे एक माध्यम म्हणून स्त्रिया जेव्हा प्रकाशन व्यवसायाचा विचार करू लागल्या तेव्हा त्यांना आपल्या दुय्यमत्त्वाची जाणीव होती आणि या जाणिवेतून जगाला समतेचा विचार देण्यासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या हक्काची, अधिकाराची मांडणी करण्यासाठी या व्यवसायात त्या उतरल्या. यातील काही स्त्रियांचे प्रयत्न या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रात चालवलेल्या पाक्षिक सदराचे रूपांतर या पुस्तकात झाले आहे. त्यातून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या विचारविश्वाचा परिचय करून देण्याचा आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी मांडण्याचा प्रयत्न प्रवीण घोडस्वार यांनी केलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करावे लागेल. उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता, कार्तिकी व्हीके, नाझिया खान यासारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या स्त्रिया आहेत. ' --वंदना महाजन प्राध्यापक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई
-
Aamhi Swayampurna (आम्ही स्वयंपूर्णा)
चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. मेधा पुरव सामंत यांनी तीस वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतून 'अन्नपूर्णा परिवारा'ची सुरुवात केली. आज या परिवाराने पुण्या-मुंबईतल्या सव्वा लाख कष्टकरी महिलांना आपल्या कवेत घेतलं आहे. हा परिवार २०० कोटींहून जास्त उलाढाल करणारा सहा सामाजिक संस्थांचा समूह बनला आहे. 'अन्नपूर्णा'च्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारं, एवढंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता पुरवणारं यशस्वी मॉडेल मेधाताईंनी उभं केलं आहे. हे कसं घडलं? रोज भेटणाऱ्या भाजीवाल्या बायकांना सावकारी चक्रातून बाहेर काढण्यासाठी मेधाताईंनी स्वतःच्या खिशातून नऊ महिलांच्या गटाला पहिलं कर्ज दिलं. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर कष्टकरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करायचं पक्कं करत मेधाताईंनी बँकेतली नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कामात वाहून घेतलं. तीस वर्ष जीवाचं रान करत कल्पकता आणि धडाडीने संस्था वाढवली. महिलांच्या गरजा समजून घेत आरोग्यविमा, मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती आणि निवृत्तीनंतरच्या पेन्शनसारख्या अनेक योजना सुरू केल्या. अन्नपूर्णा परिवार हा एकखांबी तंबू होऊ नये यासाठी महिलांमधूनच नेतृत्वही घडवलं. महिलांनाच नव्हे, तर संस्थेलाही स्वतःच्या पायावर उभं केलं. या अफाट प्रवासाची गोष्ट सांगणारं एका सामाजिक उद्योजिकेचं प्रेरणादायी कार्यचरित्र.
-
Nigeria (नायजेरिया)
डॉ. राजेश कापसे ह्यांचे हे पुस्तक नायजेरिया देशावर एक नवा प्रकाशझोत टाकते. एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या दृष्टीकोनातून. ह्यापूर्वी मी मराठीमध्ये, शोभाताई बोंद्रे आणि शेतीतज्ञ धोंडेसर ह्यांची पुस्तके वाचली आहेत. काळाबरोबर देश आणि तिथले वास्तव बदलत असते. व्यवस्थाही बदलत असतात. ह्या सा-याचे यथातथ्य पण ललित शैलीमध्ये वर्णन राजेशच्या लिखाणात आहेच. त्याच्या मिश्कील, परंतु अभ्यासू स्वभावाचा प्रत्ययसुद्धा वारंवार येत रहातो. ह्यापुढे फक्त प्रवासवर्णनच नव्हे तर विविध विषयांवरचे त्याचे लिखाण वाचायला मिळावे अशा शुभेच्छा ! - डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकास तज्ञ)