-
Ajunahi (अजूनही)
तरल प्रेमभावना आणि शिक्षणसम्राटाच्या क्रौर्याच्या पेचात शिक्षण आणि संस्कृतीचा गळा घोटला जात आहे. अनाथ पूनम आणि शोषित अजयची ही प्रेमकथा...! वास्तवातील कुरूपतेची साक्ष देताना विजयाताई मारोतकर यांनी त्यात विविध रंगानुभूतींची उधळण केली आहे. अस्सल प्रेमाचा बळी देऊन तासिका प्राध्यापक असलेल्या अजयला नाइलाजाने संस्थाचालकाच्या साधारण कन्येशी विवाहबद्ध होणे भाग पडते. ज्यामुळे पूनमच्या प्रेमाचा बळी घेतला जातो. विचित्र कोंडी निर्माण होते, ज्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन एक भयाण शोकांतिका पेलत वैफल्यग्रस्त जगणे अजयच्या वाट्याला येते. संस्कृतीच्या पूर्ततेतच शिक्षणाचे सार्थक असते. तीच शिक्षण व्यवस्था विकृतीने आणि क्रौर्याने बरबटलेली असल्याचे भीषण सत्य आहे. तासिका प्राध्यापकांच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या व्यथांचा नेमका वेध घेणारी फार महत्त्वाची ही कादंबरी आहे. काळ पुढे जातो... गुंजन आणि परिमलच्या सफल प्रेमकथेत पूनम आणि अजयच्या शोकात्मक प्रेमाचे अश्रू दडलेत. विजयाताईंनी हळुवारपणे व्यक्ती व प्रवृत्तीच्या विसंगतीसह समाजाचे वास्तव चित्र व चरित्र 'अजूनही...' मध्ये उलगडले आहे. 'अजूनही...' या प्रक्रियेला पूर्णविराम मिळेल की 'अजूनही...' न संपणाऱ्या वास्तवाची करुण कहाणी राहील... ? या प्रश्नाला उत्तर नाही... विजयाताईंच्या वास्तववादी कादंबरी लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा...! --डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे)
-
Tumasa Nahi Dekha - O. P. Nayyar (तुमसा नहीं देखा - ओ. पी. नय्यर)
ओपींना 'ललित' रागाने चांगलीच भुरळ घातली असावी. त्यामुळे 'कल्पना' चित्रपटासाठी त्यांनी मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांना जुगलबंदीच्या रूपाने 'तू है मेरा प्रेमदेवता' हे द्वंद्वगीत गायला लावलं. त्यात रफींच्या आवाजाचा पल्ला आणि मन्ना डेंच्या आवाजातला सच्चेपणा आणि धीरगंभीर भाव यांचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अमीर खाँ यांना नौशाद (बैजू बावरा, शबाब) आणि वसंत देसाई (गूँज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे) या रागदारी संगीतात मुरलेल्या दिग्दर्शकांनी चित्रपट संगीताच्या परिघात आणलं, 'हिदम किंग' म्हणून गणल्या जाणाऱ्या ओपींनाही आणलं, ही गोष्ट विशेषच म्हटली पाहिजे. — अमरेंद्र धनेश्वर
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 1 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग १)
आपल्या अतिपूर्वजांची उत्पत्ती, स्थित्यंतरे, विकसित होत गेलेली जीवनशैली तसेच सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असते. शिवाय पूर्वकालीन घटनाक्रमांच्या संदर्भातून प्रकर्षाने टाळावयाच्या बार्बीचे भान येण्यासाठी तसेच गैरव्यवस्थेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी इतिहासाची माहिती अत्यावश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विश्वात निर्माण झालेली अस्थितरता, संघर्षमय बाबी व विध्वंसकारी स्थिती टाळता येऊ शकते व शांतता राखता येऊ शकते. प्राचीन वारशाद्वारे प्राप्त झालेल्या भूमीचे रक्षण करून देशाच्या सीमा जतन करण्याची जबाबदारी देशवासीयांवर असते. बहाल झालेल्या वारशाबाबतचे भान व वंशपरंपरागत मिळालेल्या हक्काधिकारांचा वापर करण्याची जाण ऐतिहासिक दस्तावेजांतून मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यू धर्मीयांनी त्यांच्या प्राचीन इतिहासाचे स्मरण ठेवून हक्काची 'देवदत्त भूमी' जिद्द व परिश्रमाने मिळवून इस्रायल देशाची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राला आपला भूगोल गमवावा लागतो !' भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकारण्यांना इतिहासाचे विस्मरण झाल्याने आजघडीला पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनच्या निमित्ताने आपल्या देशाचा भूगोल बिघडवून घ्यावा लागलेला आहे हे कटुसत्य आहे.
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 2 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग 2)
संपूर्ण विश्वात प्राचीन कालापासून विविध संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या व अपूर्व असा इतिहास निर्माण करून गेल्या. हजारो वर्षांपासून ठराविक भूप्रदेशाचा व सर्वसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरांचा वारसा सांगणाऱ्या कित्येक संस्कृती आजघडीला काळाच्या उदरात नष्ट झालेल्या आहेत वा स्मृतिबाह्य ठरल्या आहेत. आफ्रिकेतील इजिप्त सभ्यता, मध्य आशियातील सुमेरियन सभ्यता, मेक्सिकोची माया सभ्यता, युक्रेटिस नदीकाठची बॅबिलोनियन सभ्यता, चीनची ह्वांग हो नदी खोऱ्यातील सभ्यता, मोहेंजोदडो येथील सिंधू सभ्यता, हिंदुस्थानातील गंगा-यमुनेच्या तीरावरील 'सनातन' म्हणून ओळखली गेलेली वैदिक संस्कृती या जगभरात विखुरलेल्या महत्त्वाच्या तसेच ठळक सभ्यता व संस्कृती आहेत. ग्रीक, बॅबिलोनियन, सुमेरियन, असिरियन या प्राचीन संस्कृती प्रगत व वेगवान असूनही काळाशी एकरूप न होता आल्याने लयास गेल्या, तर सिंधूसारख्या वैभवशाली संस्कृती निसर्ग व मानवी आक्रमणापुढे नेस्तनाबूत झाल्या. मात्र कित्येक हजारो वर्षांपासूनचा सलग इतिहास लिपीबद्ध करून प्राचीन तसेच अतिप्राचीन काळाचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारी भारताची अतिप्राचीन परंपरा असलेली सनातन वैदिक संस्कृती ही भारताची शान, मान व जान आहे. सनातन संस्कृतीचे आगळेपण हे आहे की ही संस्कृती संशोधकीयदृष्ट्या जरी अतिप्राचीन ठरविण्यात आलेली नसली तरी आर्यांनी रुजविलेला प्राचीन वैदिक धर्म आजतागायत प्रवाहित आहे आणि हेच या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे!
-
Amrutachya Janu Onjali Shridhar Phadake Yancha Sangitik Pravas (अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास)
ज्येष्ठ संगीतकार गायक श्री. श्रीधर फडके यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे. आई- वडिलांकडून मिळालेल्या उत्तम संस्कारांची शिदोरी घेऊन, श्रीधरजींनी स्वतःची स्वतंत्र आणि देखणी संगीत-वाट निर्माण केली. ‘संगीत मनमोही रे’ हे रसिकमनाला प्रत्येक कलाकृतीतून सुकन्या जोशी त्यांनी पटवून दिलं आहे. ‘गाणार, वाजविणार तैसेचि ऐकणार’ यावत् त्यांचं संगीत प्रत्येकाला मोहित करतं. श्रीधरजींची संगीताप्रती असलेली निष्ठा, आणि आजपर्यंत त्यांनी जोडलेली माणसं याचं दर्शन या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून होत राहतं. या पुस्तकात त्यांचं कुठलंही गाणं नेमकं कसं ऐकायला हवं, याची दृष्टी ते आपल्याला देतात. कवीच्या शब्दांवर नितांत प्रेम करणारा हा संगीतकार आहे. कवितांचा भरपूर अभ्यास. त्या शब्दांचा स्वरांशी मेळ घालताना, शब्दांवर कुठेही कुरघोडी न करता, त्या काव्याच्या अर्थाला, भावनेला श्रीधरजी चाल लावतात. चालीवर शब्द लिहून घेतानाही, कुठेही शब्दांची ओढाताण होताना दिसत नाही. म्हणूनच त्यांचं कुठलंही गाणं ‘लय ललित ही रागिणी ‘असंच भासतं. जर एखाद्या अभ्यासकाला श्रीधरजींच्या गाण्यांचा अभ्यास करायचा असेल, किंवा त्यांच्या गाण्यांवर संशोधन करायचं असेल, तर हे पुस्तक त्यांच्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास वाटतो. पुस्तक वाचताना ‘अमृताच्या जणू ओंजळी’ आहेत याचा अनुभव वाचकांना निश्चित मिळेल. त्यांच्या गाण्यांचा कॅनव्हास हिरव्या ऋतूसारखा कायम टवटवीत राहो, हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना!
-
Draupadi Kal Aaj Udya (द्रौपदी काल आज उद्या)
राजा शंतनु आणि स्वर्गीय गंगा यांच्या मीलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या अंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी वस्त्रहरण हा महासंघर्षाचा परमोच्च बिंदू होता नि तिथून द्रौपदीच्या सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची युद्धशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पलित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांडवांची जगनघना पतिव्रता पांचाली होती आणि पुन्हा वस्त्रहरणाच्या वेळी तळपत्या तलवारीसारखी मनोयज्ञयागातून निर्माण झालेली अग्निशिखा होती...! अशी तिची विविधांगी गर्भित रूपे अशोक समेळ यांनी निखालसपणे आपल्या शब्दकुंचल्याने ज्वलंत चितारलेली आहेत...! द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात दिसलेली कालची, आजची आणि उद्याची स्त्री आणि तिची मनोमूर्त किती संवेदनशील आहे, याचे प्रत्यंतर ही कादंबरी वाचताना रसिकांना येते. द्रौपदीची मानसिकता ही अमृतसरोवरात द्विजिभेने दंश करणारी कुंडलिनी होती, तर आजच्या स्त्रीचे भोगणे आणि सोसणे, वेदना आणि संवेदना, जखम आणि जोखीम, शब्दातीत निःशब्दता, प्रश्नातीत विप्रश्नता, मौन आणि कोलाहल, साक्षात्कार आणि निर्वचना... या सर्व परस्परविरोधी; पण तरीही संवादी युगुलांचा सम्यक संसार म्हणजे स्त्रीचे मन आहे. याचा महा शब्दपट नाट्यमयरीत्या अशोक समेळ यांनी मनःपूत विलक्षण संयमाने विणला आहे...! द्रौपदीच्या मनातील सलाचा उगम प्रलयात होतो आणि पंचमहाभूतांच्या ओंकारात विलय होऊन पुन्हा अरूवारीच्या विलसत्या किरणांप्रमाणे तिचे मूलाधार व्यक्तिमत्त्व कादंबरीभर झळकत राहते, ही या कादंबरीची मर्मबंधातली ठेव आहे...!! -- प्रा. अशोक बागवे
-
Shunyaresha (शून्यरेषा)
त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, "मी अजूनही स्वप्न बघतेय." अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...) मी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ? माझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...
-
Umbaratha ...Nav Yug Suru Hotay! (उंबरठा ...नवं युग सुरु होतंय!)
या पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान, धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!
-
Criminal Psychology (क्रिमिनल सायकॉलॉजी)
गुन्हा घडतो तेव्हा तो लगेच सगळ्यांच्या नजरेत येतो. वृत्तपत्रात आणि चॅनेल वर बातम्या भरून जातात, लोक चर्चा करतात, आरोपीचे चेहरे झळकतात. पण त्या गुन्ह्याच्या आधी जे काही मनात घडत असतं, ते कुणाच्याच लक्षात येत नाही. ‘गुन्हेगारी मानसशास्त्र’ या पुस्तकात त्या अदृश्य जगाची दारं उघडली आहेत. प्रत्येक कथा एका खऱ्या गुन्ह्याने सुरू होते, पण ती संपते एका मानवी मनाच्या शोधात. मत्सर, लोभ, अपमान, एकाकीपणा, भीती, विकृती; माणसाच्या आत दडलेली ही सगळी बीजं गुन्ह्याच्या रूपात कशी बदलतात, हे या कथा शांतपणे सांगतात. जॅक द रिपरच्या काळोख्या लंडनच्या गल्लीपासून ते मुंबईतील रामन राघवच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, ऑटो शंकरच्या मद्रासमधल्या राजकीय-सामाजिक जाळ्यापासून ते बिहारच्या अमरजीत सदा या लहान खुनी मुलाच्या निरागस पण थंड मनापर्यंत — प्रत्येक कहाणी मन हादरवते. सुरिंदर कोलीच्या क्रूरतेतून समाजाचं मौन दिसतं, अंद्री चीकातीलोच्या रशियातल्या हत्यांमधून एका तुटलेल्या युगाची निराशा, क्रिस्टा पाइकच्या तरुण मनातून सूडाचं विकृत सौंदर्य, तर जोशी-अभ्यंकर आणि रंगा-बिल्लाच्या भारतीय प्रकरणांतून शहरी गुन्हेगारीचं नागवं रूप समोर येतं. या आणि अश्या तीस गुन्हेगारी प्रकरणांनी हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं. अच्युत गोडबोले यांच्या विचारपूर्ण, पण सहज आणि बोलक्या शैलीत या घटना जिवंत होतात. परेश चिटणीस यांच्या गुन्हेगारी मानसशास्त्रातील अनुभवातून त्या अधिक सखोल बनतात. हे पुस्तक थरारक गुन्ह्यांचं वर्णन करताना ; ते माणसाच्या मनातल्या सावल्यांकडे पाहायला शिकवतं. वाचक गुन्ह्याच्या तपशीलांपेक्षा हळूहळू त्या मनात गुंतत जातो: त्या वेदनेत, रागात, भीतीत, आणि कधी कधी विकृतीत. वाचत राहावंसं वाटणारं, पण प्रत्येक पानानंतर विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची सफर आहे; थक्क करणारी, अस्वस्थ करणारी, आणि म्हणूनच विसरता न येणारी.
-
Shreekrushnaniti Preranacha Akhand Strota - Kal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती प्रेरणेचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या)
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण! त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते. श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते. कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.
-
Shivacharitra Eka Yugapurushachi Jeevangatha (शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा)
'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
-
Sahaj Sope Prompt Engineering (सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनीरिंग)
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. AI कडे प्रश्न विचारणे ही फक्त विनंती नसून, एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. योग्य प्रॉम्प्ट म्हणजे सुरीला स्वर—AI त्यावर अद्भुत संगीत निर्माण करते. चुकीचा प्रॉम्प्ट म्हणजे विसंगत सूर—परिणामही तितकाच विस्कळीत. या सूक्ष्म पण प्रभावी विज्ञानाची सखोल, प्रायोगिक आणि सोपी ओळख करून देणे—यासाठी ‘सहज सोपे Prompt Engineering’ हे महत्वाकांक्षी पुस्तक आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत. या पुस्तकात आपण जाणून घ्याल— प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची नेमकी व्याख्या आणि तत्त्वे, AI च्या कार्यपद्धतीला योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करावे, विविध प्रकारचे प्रॉम्प्ट्स—निर्देशात्मक, संवादात्मक, विश्लेषणात्मक, सर्जनशील ,मार्केटिंग, कोडिंग, कंटेंट, स्टार्टअप, डिझाइन, शिक्षण, HR, संशोधन… अशा अनेक क्षेत्रांती, प्रॉम्प्ट्सचे वास्तविक उपयोग, सूक्ष्म तांत्रिक बाबी, उदाहरणे आणि प्रत्यक्ष वापरातील अचूक टिप्स. या सर्वांचा सामायिक उद्देश— “प्रत्येक वाचकाला AI चा प्रभावी वापरकर्ता नव्हे, तर एक सक्षम प्रॉम्प्ट इंजिनिअर बनवणे.” __________________________________________ अभिप्राय - प्रॉम्ट इंजिनिअरिंगवर इतकं सखोल, सुटसुटीत आणि उदाहरणांनी भरलेलं मराठी पुस्तक पहिल्यांदाच वाचायला मिळालं. सर्व लेखकांनी केवळ AI चे तांत्रिक पैलू उलगडले नाहीत, तर त्यामागची तत्त्वज्ञान, जबाबदारी आणि नैतिकता देखील सहज भाषेत मांडली आहेत. प्रॉम्ट इंजिनिअरिंगच्या गुंतागुंतीला विलक्षण साधेपणाने उलगडणारे हे पुस्तक विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अनिवार्य ठरते. पुस्तकातल्या काही चॅप्टर्समध्ये विविध क्षेत्रातील जसे कि, मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रियल इस्टेट, इ. अशा अनेक क्षेत्रात लागणारे सविस्तर आणि अर्थपूर्ण प्रॉम्ट कसे द्यायचे, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. प्रॉम्ट यातल्या आजच्या डिजिटल युगात AI सोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक दिव्यासारखं आहे. मराठीतल्या तंत्रज्ञान लेखनाला नवी दिशा देणारं हे पुस्तक, प्रत्येक वाचकाच्या हातात नक्की असावं. अच्युत गोडबोले Indian Author & Technocrat _________________________ Prompt Engineering हे लार्ज लैंग्वेज मॉडेल्स (LLMs) आणि इतर जनरेटिव्ह AI साधनांची (Generative Al tools) शक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत कौशल्य आहे. प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे, कारण ते थेट AI आउटपुटची गुणवत्ता, उपयुक्तता आणि अचूकता ठरवते; अन्यथा, LLMs शी संवाद साधताना "garbage in, garbage out" होण्याची शक्यता असते. AI कामाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये समाविष्ट होत असताना, स्पष्ट आणि संदर्भित प्रोम्ट्स तयार करण्याची क्षमता ही उत्पादकता वाढवते, परिणामांना अनुरूप बनवते आणि चुकीच्या किंवा पक्षपाती माहितीचा धोका कमी करते. हे कला आणि विज्ञान दोन्ही आहे कारण, अंतर्निहित मॉडेल माहितीवर कशी प्रक्रिया करते याच्या आधारावर तंत्रांचा (techniques) तार्किक आणि संरचित वापर करण्यात याचे विज्ञान आहे. त्याच वेळी, ही एक कला आहे कारण केवळ तांत्रिक प्रोम्टमुळे चुकणाऱ्या संदर्भित परिणामांकडे AI ला मार्गदर्शन करण्यासाठी यात मानवी भाषा व हेतूची अधिक चांगली समज आवश्यक आहे. हे सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक Prompt Engineering अनेक उदाहरणे वापरून समजावून सांगते आणि ज्या कोणाला LLM चा अधिक चांगला उपयोग करायचा आहे त्यांच्यासाठी हे "must-read" असे आहे. डॉ. मिलिंद सोहोनी Professor of Operations Management and Faculty Director, Center for Supply Chain Analytics, SUNY@Buffalo ____________________________ AI आपल्या रोजच्या आयुष्याला खूप छान पद्धतीने बदलत आहे. ती आपली कामं झटपट करून घेण्यास मदत करते, आपल्यासाठी गोष्टी वैयक्तिक बनवते आणि आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमधल्या अवघड समस्यांवर उपाय शोधायला हातभार लावते. कोणतंही AI टूल वापरताना प्रॉम्ट खूपच महत्त्वाचा असतो, कारण तोच AI ला सांगतो की तुम्हाला नक्की काय हवं आहे. तुमच्या प्रॉम्टची स्पष्टता, किती नीट तपशील दिले आहेत आणि रचना कशी आहे यावरच उत्तर किती अचूक, उपयोगी आणि आपल्याला हवं तसं येणार हे ठरतं. प्रॉम्ट न वापरता AI वापरणं म्हणजे अगदी चमच्याने समुद्रातून पाणी काढण्यासारखं आहे. समुद्र तसाच राहतो, बदलतं ते फक्त तूम्ही त्यातून कसं घेता हे. म्हणूनच प्रॉम्ट इंजिनियरिंगला महत्त्व आहे ते तुम्हाला वरवरच्या उत्तरांऐवजी जास्त खोल, स्पष्ट आणि खरोखर उपयोगी उत्तरं काढून घ्यायला मदत करतं. प्रॉम्ट इंजिनियरिंगवरचं हे पुस्तक खूप वेगळं आहे आणि आपल्या प्रकारचं पहिलंच आहे. या पुस्तकात तुम्हाला सोप्या पद्धतीने समजणाऱ्या तंत्रांचा, पॅटर्न्सचा आणि भरपूर उदाहरणांचा संग्रह मिळेल, ज्यामुळे तुम्ही कुठलंही AI टूल वापरताना अंदाजाने न चालता, नेहमी जास्त चांगली, जलद आणि विश्वासार्ह उत्तरं मिळवू शकाल.
-
Nasha Jagala Vilkha Ghalnari Mahamari (नशा जगाला विळखा घालणारी महामारी)
नशाऽऽऽ" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?... आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......
-
Bramhadeshatale Divas (ब्रह्मदेशातले दिवस)
‘बर्मीज डेज’ ही जॉर्ज ऑर्वेलची पहिली कादंबरी आहे. मानवतावादी ऑर्वेलने या कादंबरीत वसाहतवादावर सामाजिक आणि राजकीय टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर साम्राज्यावादामुळे ‘शासक आणि शासित’ या दोन्ही वर्गांचे होणारे अपपतन त्याने या कादंबरीत रेखाटले आहे. ब्रिटिश अंमलाखालील भारतीय वसाहतीचा भाग असलेल्या ब्रह्मदेशात भारतीय, ब्रिटिश आणि ब्रह्मदेशी पात्रांच्या माध्यमातून या कादंबरीचे कथानक आकार घेते. साहजिकच, या तिन्ही देशांच्या संस्कृती या पात्रांतून झळकतात. वसाहतवाद, वंशभेद, सत्तेचा गैरवापर व अलगतावाद या बाबींवर भाष्य करणारी ही कादंबरी विचारांना चालना देणारी आहे.
-
Ganimi Kava Ajinkya Yudhdaniticha Gudh Mantra (गनिमी कावा अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र)
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत. डॉ. बाळकृष्ण थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.
-
Swarajyacha Chhava Chhatrapati Sambhaji Maharaj (स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज)
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व. 'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते. हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न. ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
-
Guptaher Bahirji Naik Itihasachya Panatil Adnyat Nayak (गुप्तहेर बहिर्जी नाईक इतिहासाच्या पानातील अज्ञात नायक)
मी बहिर्जी नाईक, स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
-
Pani Panyavha Pravas : Itihas, Vidnyan, Upyog Te Pradushanaparyant (पाणी पाण्याचा प्रवास : इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यत)
पाणी - पाण्याचा प्रवास: इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यंत (मराठी) - अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले यांचे 'पाणी' हे एक मनमोहक मराठी पुस्तक आहे, जे वाचकांना एका विलक्षण साहित्यिक प्रवासावर घेऊन जाते. विशाल महासागरांवरून प्रवास करणाऱ्या जहाजाप्रमाणे, ही कलाकृती आकर्षक कथा आणि सखोल विचारांमधून मार्गक्रमण करते. आपल्या प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे अच्युत गोडबोले, मराठी साहित्यप्रेमींना भावेल असा वाचनानुभव निर्माण करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खुल्या पाण्यावर एका भव्य जहाजाचे लक्षवेधी चित्र आहे, जे शोध आणि आविष्काराचे प्रतीक आहे, तसेच एका तराफ्यावर ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीचे चित्र आहे, जे प्रवास, एकांत आणि आत्मचिंतनाच्या संकल्पना सुचवते. ही विचारपूर्वक डिझाइन केलेली आवृत्ती वाचकांना तिच्या पानांमधून स्वतःच्या बौद्धिक आणि भावनिक प्रवासाला सुरुवात करण्याचे आमंत्रण देते. तुम्ही मराठी साहित्याचे जुने चाहते असाल किंवा गोडबोलेंच्या कार्याचा पहिल्यांदाच अनुभव घेत असाल, 'पाणी' हे तुमच्या संग्रहात एक समृद्ध भर ठरेल. हे पुस्तक वाचकांना दर्जेदार मराठी गद्यात रमून जाण्याची संधी देते, त्याचबरोबर भाषेच्या सीमा ओलांडणाऱ्या सार्वत्रिक विषयांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.
-
Tukobanche 51 Preranadayi Jeevansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे)
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'. हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.
-
Zapoorza (Part 4) झपूर्झा (भाग ४)
आपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न! झपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी!
-
-
Radha Bhag 2 (राधा भाग २)
राधा कादंबरीच्या पहिल्या भागात राधा आणि श्रावणीचा संवाद वाचकांनी वाचला आणि अनेक वाचकांनी अगत्याने त्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय पाठवले; पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती... राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे नऊ पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता; पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का? असा प्रश्न अनेक वाचकांच्या मनात होता. '... आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले' असा कथेचा शेवट होऊ शकत नाही, असं मलाही वाटत होतं. कारण आपलं आयुष्य ही अनेक चढ-उतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. हेच उदाहरण पहा : श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं, तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं, तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ-उतार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे...