-
Warsaw Te Hiroshima
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध. सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट.
-
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
-
Teenagers A Natural History (टीनएजर्स-अ नॅचरल हिस्
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे.‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
-
Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रत
‘साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा’ हा वि.स.खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित; परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.
-
Swapnasrushti (स्वप्नसृष्टी)
‘स्वप्नसृष्टी’ हा वि. स. खांडेकरांच्या सन १९२५ ते १९७६ या पाच दशकांतील निवडक अशा सुमारे ४० भाषणांचा संग्रह असून, त्यात प्रसंग, विषय, औचित्य, शैली यांचं वैविध्य आहे. खांडेकरांची भाषणे प्रकट चिंतन असायची नि आत्मीय हितगुजही! ज्या कुणाला स्वातंत्र्यपूर्व भारताचं वास्तव अन् स्वातंत्र्योत्तर काळात समाजमनात आलेलं स्थित्यंतर आणि परिवर्तन समजून घ्यायचं आहे, त्यांना हा भाषणसंग्रह आरसा ठरेल. माणसाचं सारं जीवन म्हणजे स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर हाती येणारं वास्तव! भौतिक समृद्धीला जर भावनेची किनार अन् समाजहितदर्शी वृत्तीचा स्पर्श नि पूर्वअट असेल, तरच मनुष्यजीवन माणुसकीचं जिणं होतं; अन्यथा ते एक मे-फ्लाय संस्कृती बनतं, लक्तर विकृतीकडे वाटचाल करत राहतं, हे समजावणारी ही भाषणं माणुसकीचा भर चौकात लिलाव करणाऱ्या नि तमाशा मांडणाऱ्या वर्तमान काळानं अंतर्मुख होऊन वाचायला हवीत!
-
Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)
प्रज्ञा आणि प्रतिभा’ (भाग-२) हा वि.स.खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबऱ्यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.