-
The Scam (द स्कॅम)
भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे. लहानपणी फारकत झालेल्या दोन जुळ्या भावंडांची पुन्हा भेट व्हावी असे दोन एकसारखे घोटाळे नऊ वर्षांच्या फरकानं घडले. १९९२ साली हर्षद मेहता होता तर २००१ साली केतन पारेख दोन्ही वेळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) झोपा काढत असल्यामुळे अनेक बँका कोसळल्या. १९९१-१९९२ आणि १९९९-२००० या दोन्ही काळांमध्ये अत्यंत धोकादायक व्यवहार करून लोक शेअर बाजारात मोठी कमाई करत होते. 'श्रीमंतांसारखा विचार करा हा हितेन दलालचा १९९९ सालचा मंत्र होता. १९९२ सालाप्रमाणेच २००१ सालीसुद्धा एक शेअर दलाल न्यू यॉर्कच्या शेअर बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठीचं सदस्यत्व मिळवण्याची धडपड करत होता. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळणं, नियंत्रकांनी डोळेझाक करणं, आपला आत्मसन्मान राखण्यासाठी टोकाला जाणं, प्रचंड नुकसान होणं आणि शेअर बाजार कोलमडून पडणं अशा अनेक बाबतींमध्ये साम्य दिसून येतं. यातच एकूण व्यवस्थेमधल्या दोषांची करुण कहाणीसुद्धा गुंफलेली आहे... मान्यवर समजल्या जाणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीनं व्यावसायिक नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवत एका सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवर्तकानं अत्यंत सहजपणे कसा दिवसाढवळ्या दरोडा घातला... सगळ्या मोठ्या घोटाळेबाजांना मदत करणाऱ्या मान्यवर ग्लोबल ट्रस्ट बँकेचा धुव्वा कसा उडला... हर्षदला झालेल्या विलक्षण नुकसानामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या एका बँकेला RBI नं अत्यंत तत्परतेनं कसं अडचणीतून बाहेर काढलं.
-
Surya Girnari Mi (सूर्य गिळणारी मी)
एका कार्यकर्तीचं आत्मकथन “लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असते? जर ती दोन जिवांची एकरूपता असेल, तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतं? मी माझ्या 'स्व' लाच वजा करायचं? नाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःख, आनंद याच्यापलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहीत, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती. ओठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला भूक लागत नव्हती. ओठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या, की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हते? मी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला असं वाटलं आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडलं लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथून जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला; मला भिकारीण समजून तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला.” अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! वाचायलाच हवं असं एका कार्यकर्तीचं प्रेरणादायी आत्मकथन!!
-
Vladimir Putin (व्लादिमिर पुतिन)
सोव्हिएत युनियन आणि रशिया हा प्रकार जरा गूढच आहे. अलीकडच्या काळात व्लादिमिर पुतिन या रशियाच्या राष्ट्रपतीनं रशियाला त्याचं गतवैभव मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले असल्याची चर्चा सुरू असते. अमेरिका ही जगामधली एकमेव महासत्ता नसून तिला आव्हान देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पुतिननं निरनिराळ्या मार्गांनी दाखवून दिलं आहे. 2016 सालची अमेरिकी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूनं वळवण्यातसुद्धा पुतिनचा मोठा हात असल्याचं मानलं जातं. हा पुतिन नक्की आहे तरी कसा? त्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्या खर्या आहेत का? तो हुकूमशहा आहे का? रशियासारख्या महाकाय देशावर त्याची एकहाती सत्ता कशी काय प्रस्थापित झाली? रशियामध्ये खरोखर लोकशाही आहे का? पुतिननं एवढी मोठी मजल कशी काय मारली? पुतिनविषयीचं सगळं रहस्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे.
-
Swatantryasoudamini Maharani Tarabai (स्वातंत्र्यस
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हे मोठे युगकार्यच होते. मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता निर्माण झाली खरी, पण महाराजांच्या निधनानंतर लगेचच दिल्लीपती औरंगजेब हा मराठा सत्तेचा घास घेण्यासाठी दक्षिणेत लाखो सैन्यानिशी व प्रचंड साधनसामग्रीनिशी चालून आला आणि मग त्यातून सुरू झाले मराठ्यांचे जीवन-मरणाचे युद्ध, ज्याला इतिहासकार 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध' असे गौरवाने संबोधतात. या स्वातंत्र्ययुद्धात मराठ्यांचे नेतृत्व शिवपुत्र संभाजी छत्रपती, शिवपुत्र राजाराम छत्रपती व शिवस्नुषा महाराणी ताराबाई या तीन राज्यकर्त्यांनी केले. आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील एका बलाढ्य सत्ताधीशाशी-मोगल सम्राट औरंगजेब बादशहाशी मराठ्यांनी आपल्या या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली २५-२६ वर्षे लढून त्याला हतबल करून टाकले आणि शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीतच त्याला आपली दफनभूमी शोधावयास लावले. हा हा म्हणता आपण मराठा सत्ता नष्ट करू अशी जी बादशहास घमेंड होती, ती अस्तास जाऊन त्याच्याच हयातीत मराठ्यांचे सैन्य नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या त्याच्या सुभ्यांत धामधूम करताना त्याला पाहावे लागले. मराठ्यांच्या उपरोक्त तीन राज्यकर्त्यांमध्ये महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचे एक वेगळेपण आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी, ऐन तारुण्यात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली असताना या तरुण राणीने आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. राज्यकारभारच नव्हे तर लष्करी मोहिमांचे संयोजन ती करू लागली. खाफीखान हा औरंगजेबाचा चरित्रकार, पण त्याने मराठ्यांच्या या राणीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. माझ्या या चरित्रग्रंथात महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धाचा शेवटी धावता आढावा घेतला असला तरी या राणीची स्वातंत्र्ययुद्धातील (सन १७०० ते १७०७) कामगिरी मांडणे, हा माझा प्रमुख उद्देश आहे. ताराबाईंना ८६-८७ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले असले तरी त्यांची खरी तेजस्वी कारकीर्द म्हणजे त्यांनी औरंगजेब बादशहाशी दिलेला सात वर्षांचा लष्करी व राजकीय लढा. या लढ्यातील तिच्या कामगिरीमुळेच तिचा ‘स्वातंत्र्यसौदामिनी' म्हणून गौरव केला जातो. अशा या स्वातंत्र्यसौदामिनीचे चरित्र गावागावांतून, घराघरांतून, शाळाशाळांतून वाचले जावे, अशी माझी अंतरीची इच्छा आहे.
-
Rajmata Jijausaheb (राजमाता जिजाऊसाहेब)
जिजाऊसाहेबांच्या अंगी कार्यक्षम व कणखर प्रशासकाचेही गुण होते. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेवली; शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. शत्रूच्या अत्याचारांनी भयभीत व निराश्रित झालेल्या रयतेस त्यांनी मायेने दिलासा दिला आणि शिवरायांचे भावी स्वराज्य कसे असेल याचे वास्तव दर्शन त्यांनी सर्वांना घडवले. शिवराय वयाने व अनुभवाने मोठे झाल्यावरही जिजाऊसाहेब त्यांच्या प्रमुख सल्लागार होत्या. अत्यंत कठीण संकटाच्या प्रसंगी त्यांना आपल्या मातेचाच आधार वाटत असे. आपल्या गैरहजेरीत मातोश्रींच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून ते जात असत. आग्राभेटीच्या वेळी त्यांच्या मागे जिजाऊसाहेबांनी स्वराज्य सुरक्षित राखले. एकही किल्ला अथवा ठाणे शत्रूला घेऊ दिले नाही. उलट शत्रूचाच एक किल्ला त्यांनी स्वराज्यात आणला. अशा या थोर राजमातेचे हे चरित्र शक्य तितक्या सोप्या भाषेत, कागदपत्रांचे अवडंबर न माजवता मी सादर करत आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे प्रकाशक, मनोविकास प्रकाशनाचे संचालक श्री. अरविंद पाटकर यांनी जिजाऊचरित्राचा माझ्याकडे आग्रह धरल्याने हे एक प्रकारचे पवित्र कार्य माझ्या हातून पार पडले, असे मी मानते. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
-
Bazar... (बाजार)
हे शतक उजाडताना मात्र सॅम्युएल्सन असंबद्ध वाटू लागला. सेन्सेक्स-निफ्टी, GDP-GNP वेगवेगळे महागाई निर्देशांक वगैरे समजून घ्यायला गेलं की फारदा निष्कारण तपशिलानं मुद्दे धूसर केले जात आहेत, दडवले जात आहेत, obfuscate केले जाताहेत, असं वाटायचं. मग फापटपसारा हटवणारी रासवट-मराठी cut the crap वृत्ती वापरून आकलन सोपं करायला धडपडू लागलो. थोडं जमायचं, खूपसं सुटून जायचं. अशातच 2008 ची मंदी आली. मी निवृत्त झालोच होतो, त्यामुळे त्या गोंधळावरची हलकी, लोकप्रिय पुस्तकं वाचायला वेळ होता. आणि अशी पाश्चात्त्य अर्थशास्त्राची कमकुवत, कधीकधी बदमाश अंगं उघड करणारी पुस्तकं, वृत्तपट, चित्रपट वगैरेंचा सौम्यसा ‘पाऊस’ गेलं दशकभर पडतोच आहे! त्या सार्यातून जे चित्र दिसायला लागलं ते म्हणजे हा ‘बाजार’. भोवताली जे दिसतं ते, स्वतःचे अनुभव, चित्रपटांमधली गाणी आणि कवनं, इतर मार्गांनी पीडितांनी साधलेली अभिव्यक्ती, अशा सार्यांचं हे मिश्रण आहे. एक ढोबळ रचना, structure आहेही; पण मुळात हा गप्पा, किस्से-कहाण्या, ‘गीतों भरी कहानी’ वगैरे अनौपचारिक पद्धतींनी माझं आकलन मांडायचा प्रयत्न आहे.
-
Fakiriche Vaibhav (फकिरीचे वैभव)
लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते. तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात. शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात. कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वतःला झोकून देत दुःखीतांचं दुःख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो खर्या अर्थाने उपेक्षित-पीडितांच्या वेदनांनी होरपळून निघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो... स्वतःला फकीर बनवत... कारण ही फकिरी त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन... त्याच्यातल्या वैभवसंपन्न फकिराचं दर्शन घडवणारं... एकदा वाचायलाच हवं असं सत्यकथन!
-
Bhangar (भंगार)
मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकिरडा हेच जीवन होतं. मी उकिरड्याशेजारीच जन्मलो, तिथंच वाढलो, त्यातलं उष्टं, शिळं, इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत, भंगार गोळा करून, ते विकून त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो. ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच. अंधश्रद्धा, रूढी-परंपरांशी, जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहोचलो. भंगार गोळा करून शिक्षण घेतलेला गोसावी समाजातला मी पहिला शिक्षक. आपली कहाणी एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. बाबांना आपला अभिमान वाटतो तो, समाजाने वाळीत टाकले असतानाही आपल्यातील ‘विद्यार्थी’ लुप्त न होता सदैव सजग राहिला, बहिष्काराची तमा न बाळगता प्राप्त परिस्थितीवर जिद्दीने मात करत आपण आपले शिक्षण पूर्ण केलेत, याचा. विशेष म्हणजे, शिक्षकी पेशा स्वीकारून शिक्षणाच्या प्रसारासाठी आपण जे प्रयत्न केलेत, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. - डॉ. विकास आमटे ‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं. - डॉ. सुनीलकुमार लवटे
-
Pahila Numberkari (पहिला नंबरकारी)
खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया? 16-17 वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात. सामान्य सोडा पण कायदे यंत्रणा, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, मुलांना ज्या सरकारी निरीक्षण गृहात ठेवलं जातं तिथली यंत्रणा...कसा असतो सगळ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन? ज्या कृतीमुळे या मुलांचं सगळं आयुष्य बदलून जातं ती खरंतर त्यांच्याकडून का होते? काय असतं या मागचं वास्तव? त्यांना या वाटेवर जायला प्रवृत्त करणारे कोण आहेत? या आणि अशा काही प्रश्नांना थेट आणि परखडपणे भिडून लिहिलेलं हे पुस्तक मराठीतलं किंबहुना भारतीय भाषेतलं पहिलंच पुस्तक आहे. मुलांना या अंधार्या जगात ढकलणार्या वास्तवाचा या मुलांशी बोलून, त्यांना समजून घेतलेला हा वेध प्रत्येकानं वाचलाच पाहिजे तरच या पुस्तकात असलेल्या कुणाल, गोट्या, जयेश, पराग, अनिल, अमर, रोहन, जयदीप, शरद व अन्य मुलांच्या जगण्यातल्या भीषणतेची कल्पना येऊ शकेल. ’प्लॅटफॉर्म नं झीरो’ च्या लेखिकेचं विधीसंघर्षग्रस्त मुलांचं आयुष्य उलगडून दाखवणारं हे पुढचं पुस्तक! प्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारं आहे!! म्हणून ते विकत घेऊन वाचायलाच हवं!!!
-
Me Deshala Kay Deu Shakto (मी देशाला काय देऊ शकतो)
देशातील सर्वांत लाडक्या शिक्षकाच्या स्मृत्यर्थ ‘याचि सम हा’ असे अत्युत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. कलाम ओळखले जातात. त्यांचे बोल, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली अनेक दृष्टींनी स्वतंत्र वस्तुपाठ आहेत. त्यांचा जवळून सहवास लाभलेले आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे. आपल्या गुरूच्या नीतिमूल्यांची, त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची, त्यांनी तरुणांना दिलेल्या संदेशांची लेखक या पुस्तकातून उजळणी करतात. लेखकाने वर्गाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन डॉ. कलाम यांचे विचारधन गोळा केले, ते या पुस्तकातून ते वाचकांना वाटतात. डॉक्टरांची दिनचर्या, त्यांचे दौरे, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांचे विचार, काही आख्यायिका, काही कोपरखळ्या अशा विविधांगी विषयांची ‘उत्कंठा वाढवणारी जादूची पोतडी’ लेखकमहाशय वाचकांसमोर खुली करतात आणि त्यात वाचक इतके समरसून जातात, की हा समकालीन भारताचा थोर सुपुत्र जणू काही आपला दोस्त आहे, अशी त्यांची भावना होते. डॉ. कलाम यांच्याविषयीच्या आजवर अपरिचित असलेल्या अनेक किश्श्यांनी, त्यांच्या दुर्मिळ फोटोंनी, काही नमुनेदार मजेशीर ‘कलामी’ पदबंधांनी सजलेल्या त्यांच्या या आठवणी वाचकांसाठी स्फूर्तिदायक आणि उद्बोधक ठरतील.
-
Propganda (प्रोपगंडा)
आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? हे सारे करणारे असते तरी कोण? अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार! ही कहाणी आहे या सगळ्याची. अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.