-
Hey Ram Gandhi Hatyakandacha Pramanik Dhandola (हे
गांधीहत्येचे सत्य केवळ इतकेच नव्हे की, ३० जानेवारी १९४८ दिनी संध्याकाळी गोडसेने बिर्ला भवनात येऊन गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. किंबहुना, गांधीहत्येला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, त्याच्या पार्श्वभूमीचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकात गांधीहत्येशी संबंधित संपूर्ण कालखंडाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा, मुस्लिम लीगकडून पाकिस्तानची मागणी, जातीय दंगली, देशाची विनाशकारी फाळणी, लुटलेल्या निर्वासितांची समस्या, मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक, पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा गांधींचा हट्ट, बहुसंख्या हिंदूंच्या मनात निर्माण झालेली उपेक्षेची भावना आणि क्षोभ! सत्ता आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वात पडलेली फूट ... अशा अनेक कारणांनी गांधीहत्येची पार्श्वभूमी आधीच तयार झाली होती. गोडसेने झाडलेल्या तीन गोळ्यांप्रमाणे हे सर्व मुद्दे सुद्धा गांधीहत्येला तितकेच जबाबदार आहेत. पण दुर्दैवाने गांधी हत्येची चर्चा होते तेव्हा या मुद्द्यांवर मौन पाळले जाते. ‘माझ्या मृतदेहावर पाकिस्तान बनेल’ असे म्हणणाऱ्या गांधींनी आमरण उपोषण का केले नाही, फाळणीविरुद्ध कोणतेही आंदोलन का केले नाही, या मुद्द्यावर कधीच गंभीर चर्चा होत नाही? कटाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सदर पुस्तकाच्या लेखकाने हजारो पानांचा पोलीस तपास अहवाल, केस डायरी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण न्यायालयीन कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला आहे. एकंदरीत, प्रमाणित इतिहासलेखनाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर लेखक प्रखर श्रीवास्तव यांनी प्राथमिक स्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने आणि समंजसपणाने केल्याचे जाणवते.
-
Athak (अथक)
पुनर्वसन केंद्रातील अपंग जवानांच्या वास्तव कहाण्यांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली कादंबरी आहे ‘अथक.’ कर्नल मुखर्जी या पुनर्वसन केंद्राचे प्रमुख आहेत. नायक सुरेश कार्की यांचं छातीपासून खालचं शरीर एका अपघातामुळे लुळं झालं. पुण्यातील खडकीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल झाले. आता त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य प्राप्त करून जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. मृदुल घोष हा जवान विमानांची देखभाल-दुरुस्ती करणारा. अपघातात त्याचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडलं; पण आता तो तोंडात ब्रश घेऊन उत्तम चित्र काढतो. अशा आणखी काही जवानांच्या कहाण्या यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेफाली आणि क्षितिज हे तरुण-तरुणी सर्वसामान्य अपंगांसाठी कन्नू मेहता सेंटर सुरू करतात. जवानांच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य अपंगासाठी सेंटर सुरू करणार्या शेफाली आणि क्षितिजची ही प्रेरणादायक कहाणी.
-
Maharani Bayajabai Shinde (महाराणी बायजाबाई शिंदे)
बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
-
Indias Railwayman (इंडियाज रेल्वेमॅन)
भारताचे रेल्वेमॅन डॉ.श्रीधरन यांचं हे चरित्र आहे. त्यांचं बालपणीचं जीवन, त्यांची बहीण-भावंडं, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचं विवाहोत्तर कुटुंब, रेल्वेतील नोकरी, पाम्बनच्या पुलाचं काम, जहाजबांधणीच्या कामाच्या वेळचा अनुभव, निवृत्तीनंतर कोकण रेल्वेच्या कामाची आलेली जबाबदारी, कोकण रेल्वेचं काम करताना अध्यक्ष असूनही मिळणारं नियमबाह्य वेतन, त्यासाठी त्यांना द्यावा लागलेला लढा आणि त्यांचा झालेला विजय, कोलकाता मेट्रोचं काम, भारतात मेट्रो सुरू करण्याचं श्रेय, चेन्नई आणि मुंबईत केलेली कामं, दिल्ली मेट्रोचं आव्हानात्मक काम, त्या कामादरम्यान झालेला अपघात, राजीनाम्याची केलेली घोषणा आणि नंतर मागे घेतला राजीनामा, त्या कामाच्या दरम्यान आलेला हृदयविकाराचा झटका, मेट्रो रेल कायदा, ब्रॉड गेज-स्टॅन्डर्ड गेज वाद, त्यांच्यावर झालेली टीका आणि त्याला श्रीधरन यांनी दिलेली उत्तरं इ. बाबींवर आणि त्यांच्या शिस्तप्रियता, कार्यतत्परता, ऋजुता इ. गुणांवर या चरित्रातून प्रकाश पडतो. यशस्वी व्यक्तिमत्त्वाचं प्रेरणादायक चरित्र.
-
The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
-
Nisargaputra (निसर्गपुत्र)
‘निसर्गपुत्र’ ही अॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.
-
Dangerous Minds (डेंजरस माइंड्स)**
‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.
-
Deserter(डेझर्टर)
आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’
-
The Stories We Tell (द स्टोरीज वी टेल)
‘द स्टोरीज वी टेल : पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधताना’ या पुस्तकात प्रख्यात पुराणकथा अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील व जगभरातील पुराणकथांच्या खजिन्यातून ७२ रत्ने निवडली आहेत. `टी टाईम टेल्स’ या त्यांच्या वेबकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचकाला काळाच्या प्रदीर्घ टप्प्याची अनोखी सफर घडवते.
-
Khulbhar Dudhachi Kahani (खुलभर दुधाची कहाणी)
अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...