-
Shetkari Jevha Jaga Hoto (शेतकरी जेव्हा जागा होतो)
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतकरयांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं. की पुंजाबाबांचं नेतृत्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू असं होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी खेडेगावातील अशिक्षित शेतकऱ्याची होती,तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे!
-
Vishwache Aarta (विश्वाचे आर्त)
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे. पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.
-
Punarvichar (पुनर्विचार)
अनेक वेळा जगण्याची निरर्थकता जाणवते. हे सर्व का व कशासाठी? आपले प्रश्नही छळून घेतात. सोलून काढतात. राक्ताबाम्बळ करून जातात. अशाच राक्ताबाम्बळ झालेल्या एका सुप्रसिद्ध लेखिकेने आपल्या निरक्षर आईला प्रश्न केला. 'अखेर जगण्याला 'अर्थ' काय?' त्या निरक्षर आईने उत्तर दिले, 'कसला आलाय अर्थ, आपण देऊ तोच अर्थ.' अखेर जगण्याला ज्याचा त्यानेच अर्थ द्यायचा असतो. हा अर्थ देत आला,शोधता आला तर जगणे 'सार्थकी' लागल्यासारखे वाटते आणि माणूस यात 'फेल' झाला की, त्याला निरर्थक वाटू लागते आणि मग मंदिरही हाउसफुल्ल होऊन जातात आणि तेवढीच गर्दी 'बार' मधेही उसळते. शेवटी प्रत्येकानं आपल्या जगण्याला 'अर्थ' ज्याचा त्यानेच द्यायचा आहे, घ्यायचा आहे, लावायचा आहे आणि शोधायचा आहे.
-
Vedhak Vijaya Wad (वेधक विजया वाड)
आपल्या लेखनाचा विशिष्ट दर्जा सांभाळून सातत्याने कथालेखन करणाऱ्यांमध्ये विजया वाड यांचा उल्लेख करायला पाहिजे. दर्जा सांभाळणे आणि लेखनाचे सातत्य टिकवणे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. सातत्यामुळे एक प्रकारची लेखनमग्नता येते. लेखनाच्या, अभिव्यक्तीच्या, आविष्काराच्या व्यापात मन व्यग्र राहाते. त्याच्याच जोडीला सर्जनवृत्तीला गांभीर्यही येते. विजयाबाईंच्या बऱ्याच कथा स्त्रियांच्या मानसिकतेवर लिहिल्या गेल्या आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजात जीवन व्यतीत करताना स्त्रीच्या मनात कोणती स्पंदने, आंदोलने, चालू असतात याचे सुरेख चित्रण विजयाबाईंनी आपल्या अनेक कथांतून केले आहे.
-
Thaki Ani Maryadit Purushottam (ठकी आणि मर्यादित प
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आईच नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणारया अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटत की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते चापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुसरयाच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधली धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?
-
Shyamini (श्यामिनी)
'श्यामिनी'ही शूर्पणखेच्या उध्वस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनावश होणारया-व्यथेचीही. मिथकरुपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे 'श्यामिनी'मध्ये पुनर्निर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत,त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत,तिच्या मूलस्वरुपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत,तिला स्वतःची अशी तर्कसंगत दिशा देत,तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात. तसेच 'अर्यमा'सारख्या नव्या मिथकाला जन्म देतात. मिथकाचा विस्तार करणारे लेखन आढळत असते; मात्र मिथकाच्या पुनर्निर्मितीचा योग सर्जनशील लेखकाच्या लेखनात भेटतो. तसा दुर्मिळ,आनंददायक अनुभव 'श्यामिनी' वाचताना येत राहतो.
-
Valut Umalalela Phul (वाळूत उमललेलं फूल)
वारिस डियरी या सोमालियाच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या, रखरखीत वाळवंटात वाढलेल्या कृष्णवर्यीय मुलीची ही गोष्ट. तिच्या वाटय़ाला आलेल्या भीषण नरकयातनांची, हालअपेष्टांची ही कहाणी अंगावर शहारा आणते. एकेदिवशी पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्रं छापून येतं आणि तिचं विश्व बदलतं. ती सुपर मॉडेल होते. नामांकित फॅशन मॅगझिन्समधून तिची छायाचित्रं छापून यायला लागतात. जाहिराती मिळायला लागतात. त्यातून तिला न कळणाऱ्या, मोजता येणाऱ्या आकडय़ांचे चेक मिळू लागतात. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहात न अडकता वारिस 'फिमेल जेनायटल म्युटिलेशन'सारख्या क्रूर प्रथेविरुद्ध चळवळ सुरू करते. त्यामुळे तिला यूनोच्या व्यासपीठापासून जगातली सगळी व्यासपीठं बोलावू लागतात. वारिस जगप्रसिद्ध होते. त्या वारिसची ही कहाणी मुंदरगी यांनी रसाळपणे पण नेमक्या शब्दांत मांडली आहे. सत्यघटना असली तरी ती कादंबरी वाटावी, परीकथेत शोभून दिसावी अशी आहे. वाळूत उमललेल्या एका फुलाची ही जीवनकहाणी प्रेरणादायी आहे, हे नक्की.
-
Nad Sanvad (नाद संवाद)
प्रिय श्री. सुभाष डोंगरे ह्यांना सस्नेह, '… तुमची संगीतविषयक आस्था अतिशय प्रामाणिक आहे. शिवाय तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सांगीतिक आस्वादाला शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावगीत, चित्रपटसंगीत, गायन, वादन हि सर्व क्षेत्रं मोकळी आहेत. त्याला कुठल्याही वैचारिक सोवळेपणाची कुंपणं नाहीत. तुम्ही निवडलेल्या व्यक्ती पाहताना हि गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती सगळी कलाकार मंडळी तुम्हांला वेळोवेळी भेटली, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकलात या सर्वच गोष्टी नि:संशय अभिनंदनिय आहेत. संगीतकार खय्याम, रवि, नौशाद, रसिकप्रिय संगीतकार-जोडीतले प्यारेलालजी, हृदयनाथ मंगेशकर, हरिप्रसाद चौरासिया, जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास खळे, जी. एन, जोशी ही नामावली नुसती वाचली तरी या पुस्तकाच्या अभिप्रेत आशयाची आणि आवाक्याची कल्पना येइल. पखवाजवादक अर्जुन शेजवळ, भावगीतगायक रतिलाल भावसार आणि विशेषतः तबलावादक उस्ताद निजामुद्दीन खां या तिघांचा या पुस्तकात झालेला समावेश तर फार अपूर्वाईचा आणि म्हणून प्रशंसनीय वाटतो. तुमच्या पुस्तकात सामावलेल्या या सर्व व्यक्ती या मुळात एकेक स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहेत. तो संपूर्ण अनुभव इथे एका लेखात देणे अशक्य आहे. - सुधीर मोघे.
-
Lopamudra (लोपामुद्रा)
एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी अल्पावधीत नावारूपास आली. रंगभूमी, चित्रपट, आणि टी.व्ही. अशा तीनही माध्यमातून स्पृहाची कारकीर्द बहरलीय. 'गमभन', 'युग्मक', 'एक अशी व्यक्ती', 'अनन्या' सारख्या एकांकिका, 'लहानपण देगा देवा', 'नेव्हर माइंड', 'नांदी' आदी नाटके, 'मायबाप', 'मोरया', 'सूर राहू दे', 'बायोस्कोप', 'एक होता काऊ', या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चमक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. कारकीर्दीच्या सुरुवातीला 'दे धमाल', 'एक हा असा धागा सुखाचा', 'आभाळमाया', 'अग्निहोत्र', या मालिकांमधून ती झळकली 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकांमधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. अभिनयाबरोबरच लेखनाचीही विशेष आवड. 'सकाळ', 'दिव्य मराठी' या वृत्तपत्रांमध्ये उत्कृष्ठ सदर लेखन. 'चांदणचुरा' या पहिल्याच काव्यसंग्रहाच विशेष कौतुक. वर्षा भावे, कमलेश भडकमकर, स्वप्निल बांदोडकर, हृषीकेश कामेरकर, अजय नाईक, ओंकार घैसास, अभिजित सावंत, आणि मयुरेश माडगावकर यांसारख्या नावाजलेल्या संगीतकारांसाठी गीतलेखन. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००३ मध्ये 'बालश्री' या पुरस्काराने सन्मानित. सवाई अभिनेत्री, कुसुमाग्रज पुरस्कार, श्री अक्षरग्रंथ प्रकाशन, चित्रपदार्पण पुरस्कार २०११ ( मोरया-सर्वोत्कृष्ट्र सहाय्यक अभिनेत्री), झी मराठी अवार्ड २०१२ (सर्वोत्कृष्ट्र व्यक्तिरेखा - रमाबाई, सर्वोत्कृष्ट जोडी- रमा-माधव), इचलकरंजी पत्रकार संघ - विशेष कलागौरव पुरस्कार २०१२, आचार्य अत्रे पुरस्कार २०१३.... आदी पुरस्कारांची मानकरी असलेल्या स्पृहाचा 'लोपामुद्रा' हा दुसरा काव्यसंग्रह आहे.
-
Durgabhramangatha (दुर्गभ्रमणगाथा)
एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही. दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला. पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.