-
Nothing Ventured (नथिंग वेंचर्ड)
"जेफ्री आर्चर यांच्या नव्या संडे टाईम्स बेस्ट सेलर्स मालिकेची सुरुवात `नथिंग व्हेंचर्ड` या पुस्तकाने होत आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर विल्यम नवोदित तपास अधिकारी म्हणून स्कॉटलंड यार्डच्या कला आणि प्राचीन कलावस्तू दलात सामील होतो. इथे प्रथमच तो एका मोठ्या प्रकरणाची उकल करतो. फिट्झमोलियन म्यूझिअममधील रेंब्रांच्या एका अमूल्य चित्राच्या चोरीचा तपास तो करत असतो. याच काळात बेथ रेन्सफोर्ड या तिथल्या संशोधन साहाय्यकेशी त्याची भेट होते. तो तिच्या प्रेमात पडतो. बेथकडेही एक गुपित असतं. हरवलेल्या चित्राचा मागोवा घेताना विल्यमची गाठ माइल्स फॉकनर या संभावित चित्रसंग्राहकाशी आणि त्याचा चलाख वकील बूथ वॉट्सन (क्यूसी) यांच्याशी पडते. विल्यमच्या एक पाऊल पुढे राहाण्यासाठी ते दोघे कायदा अगदी मोडेल इतका ताणण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे माइल्स फॉकनरची पत्नी ख्रिस्टिना मात्र विल्यमशी मैत्री करते; पण ती नक्की कुणाच्या बाजूने असते? विल्यम वॉरिक या कुटुंबवत्सल आणि करामती तपास अधिकाऱ्याच्या जीवनाची ही कथा आहे. विल्यम आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शक्तिमान गुन्हेगारी शत्रूंशी चतुरपणे आणि हिकमतीने लढतो. "
-
The Wanted (द वॉन्टेड)
"‘दि वॉन्टेड’या रॉबर्ट क्रेझ यांच्या मूळ कादंबरीचा तितकाच थरारक अनुवाद !एक थरार किंवा चैनीसाठी तीन तरुण मुलं अठरा ठिकाणी चोऱ्या करतात. पैसे, दागिन्यांबरोबर लॅपटॉपही चोरतात. यातल्या एका लॅपटॉपमध्ये असते अतिशय महत्त्वाची माहिती. ती उघड झाली तर काही उच्च पदस्थांना फासावर जावे लागण्याची शक्यता असते. मग तो चोरीला गेलेला लॅपटॉप मिळविण्यासाठी सुरू होतो जीवघेणा, थरारक पाठलाग ..! चोरी करणाऱ्या मुलांच्या मागे दोन गुंड ,त्यांच्यामागे एक सहृदयी गुप्तहेर आणि पाठोपाठ पोलीस ...त्या पाठलागातून कसे खून होतात आणि तीन तरुण मुलं त्यातून वाचतात की नाही प्रत्येक पानागणिक उत्कंठा वाढविणारे ,विलक्षण वेगवान कथानक, वाचक जागीच खिळून राहतो आणि या ‘पाठलागात कधी सामील होतो हे कळतही नाही...! "
-
Reporting Pakistan (रिपोर्टींग पाकिस्तान)
ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन. `हिंदू` वर्तमानपत्राच्या प्रतिनिधि म्हणून त्या ऑगस्ट २०१३ मध्ये इस्लामाबाद, पाकिस्तान इथे गेल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये त्यांचा व्हिसा रिन्यू न करता त्यांना भारतात परत निघून जायला सांगितलं. इस्लामाबादमध्ये सततचे पहारे आणि तणावाचं वातावरण असूनही त्यांनी आपला पत्रकारिता धर्म सोडला नाही. हिंडण्याफिरण्यावर इतके निर्बंध असूनही त्यांनी केवळ बातम्या द्यायचं काम केलं नाही. तर `हिंदू` साठी अनेक लेख लिहिले.फाळणीतून बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला, अहमदी लोकांना भेटल्या, त्या बॉम्बस्फोटातील बळींशी बोलल्या, अफगाण रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन आल्या आणि त्यांनी मुर्रे ब्रेवरी विषयी सुद्धा लिहिलं. मुशर्रफ यांच्या कोर्ट केसला उपस्थित राहून त्याचंही वार्तांकन केलं. पाकिस्तानातून वार्तांकन करणं ही भारतीय पत्रकारांसाठी सगळ्यात अवघड आणि तरीही रोमांचक कामगिरी समजली जाते. मीना मेनन यांनी तटस्थपणे आणि मानवीय पातळीवर पाकिस्तानचे हे वार्तांकन केले आहे. प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानविषयी जाणून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक.
-
Lal Barfache Khore (लाल बर्फाचे खोरे)
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७०, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले. आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. अनेक सामाजिक आणि राजकीय घटनांची पार्श्वभूमी काश्मीरच्या इतिहासातील या महत्वाच्या घटनेला आहे. या निर्णयामागे कोणत्या शक्ती होत्या? जम्मू-काश्मीरच्या लोकांवर याचा काय परिणाम झाला? त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भविष्यात याचे परिणाम काय होतील? ज्येष्ठ अनुभवी पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या `व्हॅली ऑफ द रेड स्नो` या पुस्तकात या प्रश्नांचा पूर्वग्रहविरहित उहापोह केलेला आहे. या स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या निर्णयानंतर काश्मीर मध्ये होणाऱ्या बदलांची कथा सर्वसमावेशक पद्धतीने सांगितली आहे. कलम ३७० रद्द होण्याआधीचे काश्मीर, रद्दबातल झाल्यानंतचे लगेचच काश्मीर आणि आत्ताचे काश्मीर हे विविध मुलाखतींच्या द्वारे समोर आणले आहे. काश्मीर खोऱ्यामधला आंखो देखा हाल लेखकाने लिहिला आहे. जम्मू-काश्मीर विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. लाल बर्फाचे खोरे.
-
Ethe Thabakali Gangamai (इथे थबकली गंगामाई)
"1939 चा भारत. गांधीवादी शांततावादी ग्यान भाऊबंदकीतून खून करतो; प्रखर क्रांतिकारक देबीदयाळ ब्रिटिश विमानाला आग लावली म्हणून पकडला जातो. दोघांना अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये नेलं जातं. तुरुंगातील जीवनात त्यातील एक ब्रिटीश समर्थक आणि एक ब्रिटिश विरोधी अशा विरुद्ध छावण्यांमध्ये काम करतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपानी लोक बेटांचा ताबा घेतात तेव्हा सर्व दोषी अचानक मुक्त होतात. जेल मधून सुटतात आणि फाळणीच्या हिंसाचारात अडकण्यासाठी ग्यान आणि देबी भारतात परत येतात. फाळणीपर्यंतच्या आपत्तीजनक घटना, हिंसा आणि अहिंसेच्या विचारसरणींमध्ये उद्भवलेला संघर्ष यांचे चित्रण या कादंबरीत आहे. मनोहर माळगांवकर यांची अभिजात साहित्यकृती आणि पाच दशकांहून अधिक काळापासून बेस्ट सेलर असणाऱ्या अ बेंड इन गंगा या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इथे थबकली गंगामाई. संक्रमणावस्थेत असलेल्या राष्ट्राची महाकथा.. आता नव्या स्वरूपात उपलब्ध आहे. "
-
Gone Girl (गॉन गर्ल)
२०१२ मध्ये प्रकाशित झालेलं ‘गॉन गर्ल’ हे गिलियन फ्लिन या लेखिकेचं पुस्तक चांगलंच गाजलं. या कादंबरीतील मुख्य रहस्य हे त्याचा नायक निक् आणि त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यात असणारा सहभाग यातून निर्माण होतं. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी निक्ची पत्नी बेपत्ता होते. इथून कथेला सुरुवात होते. अॅमीच्या जाण्याचा निक् वर दिसून येणारा परिणाम हा पोलिसांना निक्वर संशय घ्यायला प्रवृत्त करतो. निक्चा दृष्टिकोन आणि अॅमीची डायरी यातून एक परस्परविरोधी चित्र निर्माण होतं. निक्च्या मते अॅमी ही एक अंतर्मुख, हट्टी, समाजात फटकून वागणारी आणि अतिरेकी काटेकोर अशी बाई आहे, तर अॅमीच्या डायरीतून दिसणारं निक्चं चित्र हे आपलं ते खरं म्हणणारा, मूडी, आळशी आणि जरासा धोकादायक नवरा असं आहे. एकूणच लग्नाबद्दलची, संसाराबद्दलची त्यांची मतं आणि अपेक्षा परस्परविरोधी आहेत. जागतिक मंदीच्या लाटेमध्ये नोकरी गमावलेले निक् आणि अॅमी निक्च्या आईच्या आजारपणात मदत करायला म्हणून निक्च्या मिसुरीमधल्या गावी येतात आणि इथून त्यांच्या संसाराच्या घसरणीला सुरुवात होते. अॅमीला न्यू यॉर्कमधलं जुनं आयुष्य प्रिय आहे. ते सोडावं लागलं म्हणून तिचा निक्वर राग आहे. अॅमी नाहीशी झाल्यावर निक् प्रमुख संशयित आहे. तशातच ती बेपत्ता होते, तेव्हा गरोदर असावी असा पुरावा पुढे येतो. आता निक्ला पोलीस आणि लोकक्षोभ दोन्हीला तोंड द्यायला लागणार आहे. दुसऱ्या भागात काही गोष्टींचा उलगडा होतो, तेव्हा लक्षात येतं की दोन्हीही प्रमुख ‘निवेदक’ बेभरवशी आहेत. निक् त्याच्या पत्नीशी प्रतारणा करतोय आणि अॅमी निक्ला स्वतःच्याच खुनाच्या भानगडीत गुंतवत्येय. हा तिचा सूड आहे. तिच्या डायरीतल्या नोंदी फसव्या आणि गरोदर असणं खोटं आहे. पण ज्या मोटेलमध्ये ती लपूनछपून राहते आहे, तिथं तिला लुटलं जातं आणि तिला आपल्या देसी कॉलिग्ज या मित्राची मदत घेणं भाग पडतं. निक्ला जेव्हा लक्षात येतं की अॅमी त्याला अडकवायचा प्रयत्न करते आहे आणि त्याला ते सिद्ध करता येत नाही, तेव्हा तो टॅनर बोल्ट या नावाजलेल्या वकिलाची मदत घेतो. अॅमीपुढे सपशेल शरणागती पत्करल्याचा आभास निर्माण करून मुलाखत देतो, तिची परत येण्याकरता विनवणी करतो. देसीच्या घरात नजरकैदेत असल्यासारखी अॅमी ही मुलाखत बघते. आता तिला आयताच घरी जायचा रस्ता सापडतो. देसीला भुलवून अॅमी त्याचा खून करते आणि निक्कडे परत येते. देसीनं आपल्याला पळवून नेलं आणि डांबून ठेवलं, असा कांगावा ती करते. निक् ओळखून आहे की अॅमी खोटं बोलते आहे, पण त्याच्याकडे पुरावा नाही. अॅमीच्या गुन्ह्याच्या आणि फसवणुकीच्या तपशिलाचं वर्णन करणारं पुस्तक निक् लिहायला घेतो, पण अॅमी परत एकदा शेराला सव्वाशेर ठरते. ती फर्टिलिटी सेंटरमध्ये सांभाळून ठेवलेलं निक्चं वीर्य वापरून गर्भवती होते. आणि मग त्याला पुस्तक नष्ट करायला भाग पाडते. होणाऱ्या बाळापासून ती आपल्याला तोडेल, या भीतीनं निक् ते पुस्तक नष्ट करतो आणि त्याच बाळाकरता म्हणून तो पुन्हा अॅमीसोबत राहण्याचा निर्णय घेतो. Keywords
-
The Clifton Chronicles -This Was A Man Bhag 7 (द क
क्लिफ्टन क्रॉनिकल्स या सात कादंबर्यांच्या मालिकेतली ही शेवटची कादंबरी. त्यामुळे गाइल्स बॅरिंग्टन, त्याची पत्नी कारीन, हॅरी क्लिफ्टन, त्याची पत्नी एमा, त्यांचा मुलगा सेबॅस्टिअन क्लिफ्टन, सेबॅस्टियनची पत्नी सॅमन्था इ. व्यक्तिरेखा परत एकदा वाचकांना भेटतात. कादंबरीची सुरुवात गोळीबारासारख्या गूढ घटनेने होते. हॅरीचे नवीन कादंबरीचे लेखन, एमाला मार्गारेट थॅचर यांच्याकडून आलेला प्रस्ताव, गाइल्स बॅरिंग्टनला त्याची पत्नी हेर असल्याविषयीचं कळलेलं सत्य, सेबॅस्टिअनला मिळालेलं बँकेचं अध्यक्षपद, कर्जदारांना चुकवण्यासाठी पळून जाऊ पाहणार्या लेडी व्हर्जिनियाला मिळते एक संधी, अनेक व्यक्तिरेखा...अनेक प्रसंग...गूढता आणि भावनाशीलता यांचं मिश्रण असलेली आणि मोहक वळणावर येऊन ठेपलेली कादंबरी.
-
Damn It Ani Barach Kahi (डॅम इट आणि बरंच काही)
मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे, थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे, धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. ‘बालकलाकार’ ते ‘मराठी चित्रपट दिग्दर्शक’ हा त्यांचा प्रवास म्हणजे– ‘मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!’ आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे, भरभक्कम आधार बनणे, हेच महेशजींच्या आयुष्यातील पहिले यशाचे गमक. वादळात स्वत:ला झोकून देऊन ‘कलेची पूजा’ करण्याचं, अस्सल मनोरंजनाचा आनंद रसिकांना देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास व इतिहासाचे साक्षीदार म्हणून महेश कोठारे हे नाव गौरवाने घेतले जाते. सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना, मनाचे हळवेपण, घोर अडचणींवर केलेली मात, एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्या अर्थाने ‘डॅम इट व बरेच काही’ मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास, झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त, दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं, सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट, हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान, जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत, चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते, हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...
-
Bali (बळी)
रामू या तरुणाचं गॅरेज आहे... त्याच्या गॅरेजजवळ राहणार्या रतन या शाळकरी मुलीचं त्याच्यावर प्रेम आहे...पण रामू आणि रतन लग्न करू शकत नाहीत...मात्र त्यांच्यात चिठ्ठ्यांची देवाण-घेवाण सुरू असते...रतनचा मोठा मामा तुक्या तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असतो...त्यामुळे रतन नेहमी आत्महत्येची भाषा करत असते...जेव्हा रामूला ही गोष्ट समजते तेव्हा तो संतापतो आणि तुक्याला बदडून काढतो...तिच्या अन्य कुटुंबीयांना हे माहीत असूनही ते तिकडे दुर्लक्ष करत असतात...त्यांनाही रामू दम भरतो...त्यामुळे तुक्याला काही प्रमाणात पायबंद बसतो...मग रतनचं लग्न ठरतं...पण रामू आणि रतन परस्परांमध्ये मनाने गुंतलेले असतात... रतनचं लग्न होतं का? या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा अंत काय होतो?
-
Ishq @ Mandavi (इश्क एट मांडवी)
"कोकणातल्या सोनगिरी नावाच्या लहानशा गावात कनिष्ठ कर्मचारी म्हणून नेमणूक झालेला कथानायक मकरंद आपल्या समोर येतो. त्याच्या जोडीने आनंद आणि उमाकांत त्याच दिवशी त्याच कार्यालयात रुजू होतात. समवयस्क असल्याने तिघांची दोस्ती होते. अर्थात प्रत्येकाचा काहीतरी वेगळेपणा असतोच. लवकरच ते एकत्र राहू लागतात. आनंद जरा गंभीर तर उमाकांत थोडा फ्लर्ट आहे. मकरंदचं मांडवी गावातल्या एका मुसलमान तरुणीवर -आसमा तिचं नाव- प्रेम जडतं. तिचा मोठं भाऊ परदेशात राहतो. त्याची बायको मांडवीत असते. त्याच्या मित्रांकरवी त्याला जेंव्हा हे समजतं तेंव्हा तो आसमाला सक्त ताकीद देतो. प्रकरण पुढे वाढवायचं नाही अशी तंबी देतो. पुढे होतं असं की उमाकांत आणि ती भाभी यांचं अफेअर सुरू होतं. तो भाऊ अचानक परदेशातून येऊन उमाकांतवर खुनी हल्ला करतो. गोष्टीला विचित्र वळण लागतं. तर अशी ही कथा. मुंबईच्या रेल्वे PLATFORM वर सुरू होते आणि मडगावच्या फलाटावर येऊन थांबते. "
-
Sanjeevan (संजीवन)
‘संजीवन’ ही विख्यात लेखक भा. द. खेर यांची ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारलेली भावरम्य कादंबरी आहे. वारकरी सांप्रदायाने संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ हे वात्सल्यपूर्ण नामाभिधान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांवर अनेक विद्वान साहित्यिकांनी विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती केली आहे. संस्कृत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्ञानेश्वर हा प्रत्यक्ष विष्णूने लोककल्याणासाठी घेतलेला अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिकित्सक संतसाहित्यिकांनी ‘ज्ञानेश्वरी’चा अन्वयार्थ विशद करणारे भाष्यग्रंथ लिहिले आहेत. भा. द. खेर त्यांच्या ‘संजीवन’ कादंबरीत विठ्ठलपंत-रुक्मिणी (ज्ञानेश्वरांचे मातापिता) यांच्या विवाहापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपर्यंतचे घटना-प्रसंग रसाळ भाषेत वर्णिले आहेत. खेर यांची लेखनशैली साधीसोपी पण लालित्यपूर्ण असल्यामुळे आपसूकपणे वाचनात तन्मयता येते. कादंबरीतील भावोत्कट करुण प्रसंगात आपण (वाचक) भारावून जातो. परमेश्वरानं मानवदेह धारण करून अवतारकार्य संपल्यावर आत्मरूपात विलीन व्हावं, तसा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधिसोहळा तर कादंबरीतील उत्कर्षबिंदूच आहे.
-
Karveer Chhatrapati Indumati Ranisaheb (करवीर छत्र
आधुनिक विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या द्वितीय सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे हे जीवनचरित्र आहे. शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्याशी सासवडच्या जगताप घराण्यातील इंदुमतीदेवींचा विवाह झाला. विवाहानंतर एकच वर्षानी प्रिन्स शिवाजी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी इंदुमतीदेवींना आलेलं वैधव्य. शाहू महाराजांनी सुनेच्या शिक्षणाचा केलेला श्रीगणेशा. त्याला झालेला विरोध. सुनेला चारचाकी शिकवणार्या, तिला पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यवहारचातुर्य शिकवणार्या, स्वत:च्या मृत्यूनंतरही सुनेसाठी आर्थिक तरतूद करू पाहणार्या शाहूराजांच्या मृत्युमुळे इंदुमती देवींना डॉक्टर करण्याचं भंगलेलं स्वप्न. स्त्रियांसाठी शैक्षणिक संस्था काढून त्यासाठी झटणार्या, कलासक्त, वत्कृत्वनिपुण, कलाकारांना आश्रय देणार्या, उत्तम वाचक असणार्या, प्रसिद्धिपराङमुख इ. गुण असणार्या इंदुमती राणीसाहेबांचा हा जीवनपट त्यांच्या जीवनातील चढ-उतार तर दर्शवतोच, पण त्यांच्या समाजसेवी वृत्तीचं प्राधान्याने दर्शन घडवतो.
-
Khel Sadetin Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
‘उपरा`कार लक्ष्मण माने चळवळीतील विचारवंत. माने यांनी वेळोवेळी समजत जाणवणारे प्रश्न आणि समस्या यावर भाष्य असणारे स्फुटलेखन प्रसंगानुरूप केलेले आहे. तत्कालीन समस्या आणि प्रश्न यांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडून ते प्रश्न लोकांसमोर आणायचे काम केलेले आहे. `खेळ साडेतीन टक्क्यांचा` या लेखसंग्रहात अशाच स्वरूपातील लेखांचे संकलन केलेले आहे. १९९५ च्या दरम्यान लक्ष्मण माने हे ‘बंद दरवाजा` नावाचे साप्ताहिक चालवत असत. सरकारी धोरणे, सामाजिक प्रश्न, साहित्य-संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी-वंचित घटकांसाठीचे प्रश्न या साप्ताहिकातून त्यांनी मांडले. ते प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम हे या लिखाणातून झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे लिखाण साधारणतः २५ वर्षांपूर्वीचे असले तरीही आजच्या काळातही तेच मुद्दे आणि प्रश्न तसेच असल्याचे जाणवते त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारात मोडते.
-
Shree Gajanan Darshan (श्री गजानन दर्शन)
‘श्री गजानन दर्शन’ हे विख्यात लेखक भा. द. खेर यांनी ओघवत्या भाषेत लिहिलेले संतचरित्र. संतकवी दासगणू यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ या एकवीस अध्यायांच्या पोथीतील गजानन महाराजांच्या चरित्राचे त्यानी संक्षेपाने गद्यरूपात विवरण केले आहे. प्रसंगानुरूप महाराजांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन पोथीत वाचायला मिळते. (स्वत: लेखकांना महाराजांची प्रचिती आली आहे.) अनेक भक्त श्रद्धेने नित्यनियमाने पोथीचे पारायण करतात. महाराजांची उपासना करणार्याच्या संकटकाळी धाव घेऊन संकटमुक्त करतात, असा भाविकांचा अनुभव आहे. अनेकांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन देऊन त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात चमत्कारांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा लेख आहे. त्यात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ-संशोधकांच्या अध्यात्म विषयावरील विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या पुस्तकात भाविकांना महाराजांचे आलेले अनुभव ग्रथित केले आहेत, ते विस्मयचकित करणारे आहेत. मूळ पोथीतील फलश्रुतीवर भाष्य करणारा लेख पुस्तकात समाविष्ट केला असून शेवटी नित्योपासनेसाठी महाराजांचे मंत्र आणि स्तोत्रे दिली आहेत. अशा ग्रंथाच्या वाचनामुळे श्रद्धा दृढ व्हायला मदत तर होतेच, शिवाय भक्तीमुळे शक्ती (आधार) प्राप्त झाल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
-
Pavhna (पाव्हणा)
भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी
-
Saapshidi (सापशिडी)
‘अपने धर्म पर चलो’ या कथेतील बाबासाहेबांना निवृत्तीनंतर जीवनाचा अर्थ कळतो...तर ‘एक केस आहे’मधून सायक्रॅटिस्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता अधोरेखित होते...तुमच्या कुकर्माचे परिणाम तुम्हाला पुढल्या जन्मात भोगावे लागतात, असा संदेश देते ‘नारायण ऽऽ नारायण’ ही कथा...तर ‘मृत्यूतला जन्म’मधून प्रकट होतं जुन्या-नव्याचं िंचतन...‘राग पिलू’मधील संगीत आणि चित्रकलेतील भावबंधाला नजर लागते एका अहंकारी गायकाची...‘वांझ’मधल्या बाईजींना दोन मुलींची आई असूनही वांझ असल्यासारखं वाटतं...‘सापशिडी’तील रंजनाला जीवनाच्या सफलतेचा आनंद होत असतानाच ती परत अस्वस्थतेच्या गर्तेत फेकली जाते... ‘होय सो होय’ ही कथा नियतीच्या अटळतेचं अधोरेखन करते...जीवनाची सापशिडी ही अशीच चालू असते, कधी खाली कधी वर...पण या वर-खालीच्या अवकाशात भोगायला लागतात दु:खं अनेक...दु:खाच्या नाना परी भोगत असतात माणसं...अशाच माणसांचं मनोविश्व आणि जीवन सामोरं आणणार्या कथांचा संग्रह
-
Tuzi Katha-Maze Shabda (तुझी कथा-माझे शब्द)
शेतातील पिकांचं नुकसान करणार्या गायरांनी गावातल्या तरुणांच्या मेहनतीवर फिरवलेला बोळा...गॅरेजमालक वसंत मेस्त्री, त्याच्याच गॅरेजमध्ये काम करणारे शंकर आणि सद्या, मेस्त्रीची ठेवलेली बाई शारी, शारीचा निष्क्रिय नवरा इ. व्यक्तींचं दिशाहीन जीवन...एका विहिरीवर उलगडणारे काही लोकांच्या जीवनाचे तुकडे...त्याच्या आणि तिच्या प्रेमाची रखरखीत, अनिश्चित वाट...नवर्याला सोडून आलेली, दत्तूबरोबर लग्नाशिवाय राहणारी, दत्तूच्या मृत्यूनंतर कुणाचा तरी हात धरून पळून जाणारी काशी...विजूबरोबर प्रेमबंध निर्माण होऊ पाहत असतानाच कमलबरोबरच्या चोरट्या भेटीगाठींचं स्मरण होऊन स्वत:ला सावरणारा तरुण...पाळण्यातच लग्न लागलेलं असल्याने मनाला भावलेल्या तरुणाला नकार देणारी हौसा...दोनदा प्रेमभंग झालेल्या तरुणाला त्याच्या वाग्दत्त वधूच्या संदर्भात एक निनावी पत्र मिळतं...मानवी मन आणि जीवन यांचं वास्तव, तरल चित्रण करणार्या कथांचा भावस्पर्शी संग्रह
-
Kondwada (कोंडवाडा)
माणूस म्हणजे त्याचा समाज. हजारो वर्षे हा माणूस चिरेबंद व चिणलेला जगला. त्याच्या मस्तकात एक भीषण तत्त्वज्ञान होतं, बाहूंमध्ये अत्याचार अन् दमणयंत्रणा. त्याचं धड संपत्तीची असुरी लालसा अन् पाय शरणागतता व अंधकार. दीडदोनशे वर्षांपूर्वी यंत्रानी निर्माण केलेल्या विक्रयवस्तूंचे कुलपी गोळे तटबंदीवर थडकले. अंतर्बाह्य विस्कट सुरू झाली. अंधकाराच्या पाळामुळांपर्यंत एकेक विजेचे लोळ पोचले. वरपासून खालपर्यंत सर्वदूर हत्यारं खणाणली. ठिणग्या उडू लागल्या आजही उडतायत अन् उडतील. अजून माणूस बांधलेला आहे, अमानुष आहे. या विस्कटण्यामध्ये सांस्कृतिक वीणसुद्धा विस्कटली. धागे धागे सुटत गेले. गुंतत गेले, तुटू लागले. आणि आज गेल्या पाचदहा वर्षांत हे सगळं जमिनीतून वर उगवतंय. दलितांचं, श्रमिकांचं, क्रांतीचं साहित्य जन्माला येतंय. या कोलाहलात एक नोंदण्याजोगा आवाज दयाचा. स्पष्ट पण न एकारलेला. साध्या वस्त्रांमधला पण भरजरी माती ल्यायलेला. राजवाड्याच्या खंदकातून अन् रेल्वेच्या खडखडाटातून उमललेला आणि तारे खुडण्यासाठी शस्त्रं परजणारा.
-
Gabru (गब्रू)
‘गब्रू’ हा सात विनोदी कथांचा संग्रह आहे. ‘गब्रू’ कथेत एका ग्रामीण नाटककाराच्या नाटकाच्या लेखन-संपादन-प्रकाशनाचा ‘साद्यंत’ वृत्तान्त खेळकर शैलीत कथन केला आहे...तर ‘टिंबकटू’ कथेत एका लेखकाला शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावतात आणि त्याचा कसा पोपट होतो याची हकिकत येते...‘लावलं क्याळ, आलं रताळ’ कथेत कॉटच्या पैशाची ‘वसुली’ करायला हिराबाईकडे गेलेल्या बोंगार्डेमामाच्या फजितीचं खुसखुसशीत चित्रण आहे...‘दरोडा’ कथेत रात्री गस्त घालणार्या तरुणांचे ‘उद्योग’ आणि चोरांनी त्यांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता याचं खास शैलीतील वर्णन आहे...‘खेळी’ ही चावरेकर मास्तर आणि अन्य मास्तरांना ‘घोळात घेऊन’ ‘लुंगाडणार्या’ अव्वाची कथा आहे...तर ‘आफ्रिकन चुंबन’मध्ये सुंदर पत्नी नवर्याच्या मनसुब्यावर कसं पाणी फिरवते याची हकिकत आहे...‘क्याट’मध्ये एका फसलेल्या साहित्य संमेलनाचं हास्यचित्रात्मक कथन आहे... इरसाल व्यक्तिरेखा असलेल्या, अस्सल ग्रामीण भाषेतील खळखळून हसायला लावणार्या कथा
-
Rait (रैत)
जैसिंग...इनामदारांकडे गडी म्हणून राबणारा एक तरुण...गावातल्या मास्तरांच्या निपाणीजवळच्या गावात असलेल्या मळ्याचा रैत (मळा सांभाळणारा) म्हणून जातो...जैसिंग तसा थोडा रगेल, थोडा रंगेल, पण माणुसकी जपणारा...कधीतरी स्वत:च्या एकटेपणाची जाणीव होणारा...मळ्यातलं काम करता करता गावाशीही त्याचे स्नेहबंध जुळतात...फुली ही बिनधास्त मुलगी आणि अंजी ही गरीब घरातली मुलगी...दोघींबद्दल त्याच्या मनात आकर्षण आहे... गावच्या पाटलाशी त्याची घसट वाढते...पण पाटलाच्या नादाने बाई-बाटली-जुगार याचा त्याला नाद लागतो...पण वेळीच तो त्यातून सावरतो...फुलीचं लग्न होतं, पण काडीमोड होतो...फुली वेड्यासारखी वागायला लागते...अंजीबद्दल जैसिंगाला ओढ आहेच...पण एका प्रसंगाने जैसिंगाच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडतो...अंजीचं लग्न झालंय...पण दादला तिला नांदवत नाही...मात्र एकदा अंजीच्या दादल्याचं पत्र येतं तिला नांदायला येण्याविषयी...हे ऐकल्यावर जैसिंग हादरतो...ग्रामीण पार्श्वभूमीवर फुललेल्या जैसिंगाच्या भावविश्वाचं मन रमवणारं दर्शन
-
The Prodigal Daughter (द प्रॉडिगल डॉटर)
फ्लोरेंटिनानं लहान वयातच स्वप्न पाहिलेलं असतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होण्याचं...त्या दृष्टीने तिची गव्हर्नेस मिस ट्रेडगोल्ड तिला घडवते...फ्लोरेंटिना आणि रिचर्ड परस्परांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध होतात... दोन मुलं होतात त्यांना...फ्लोरेंटिना एक उद्योजिका म्हणून आणि रिचर्ड एक बँकर म्हणून यशाचं शिखर गाठतात...आणि मग फ्लोरेंटिनाचा शाळासोबती एडवर्ड तिला राजकारणात येण्यास प्रवृत्त करतो...ती काँग्रेस सदस्य होते...नंतर सिनेटर होते... तिची लोकप्रियता वाढते...राजकारणातील ओंगळपणाचं दर्शन तिला होतं...तरीही राष्ट्राध्यक्ष पदाच्या दिशेने ती सरकत असते...रिचर्डच्या मृत्यूनंतर थांबते काही काळ...पण परत सक्रिय होते...राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या अटीवर पीट पार्किन तिला आधी उपाध्यक्ष आणि नंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्याचं आश्वासन देतो... काय होतं पुढे? दोन घराण्यांचं वैर, प्रेमाचा वसंत आणि राजकीय पटाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची जबरदस्त कहाणी.
-
The Day Of The Jackal (द डे ऑफ द जॅकल)
आपल्या हाती अनिर्बंध सत्ता असावी या हेतूने सरकारविरोधी ओएएस संघटनेने प्रÂान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांचा वध करण्याचा कट रचला; पण तो असफल झाला. हा प्रयत्न फसल्यामुळे लगेच पुढच्याच वर्षी १९६३ मध्ये ओएएस संघटनेच्या प्रमुखाने एका अज्ञात इंग्लिशमनला द गॉल यांच्या हत्येची सुपारी दिली. ऐशआरामी जीवन आणि पैशासाठी काहीही करणार्या इंग्लिशमनने अर्थात अतुलनीय बुद्धिमत्तेच्या आणि अफाट क्षमतेच्या निष्णात नेमबाजाने हा विडा उचलला. त्याचा सुगावा लागताच अध्यक्षांच्या जीवावर उठलेल्या जकॉल या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणार्या निर्दयी व क्रूर मारेकर्याला रोखणे अत्यावश्यक तर होतेच, परंतु केवळ सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढणेही अवघड आणि अशक्य होते. तरीही जकॉलच्या लक्ष्य साध्य करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रत्येक खेळीवर मात करत फ्रान्स च्या पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणेने जकॉलचीच यमसदनाला पाठवणी केली...
-
Lokmanaya Tilak Darshan (लोकमान्य टिळक दर्शन)
`लो. टिळक दर्शन’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र आहे. प्राधान्याने टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या चरित्रातून घेतला आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या आधारे स्वातंत्र्य मिळविण्याचं आवाहन टिळकांनी जनतेला केलं आणि ती चतु:सूत्री राबवण्यासाठी ते सक्रिय झाले ते शेवटपर्यंत. या पुस्तकात टिळकांनी केलेली होमरूल चळवळ, मवाळ पक्षाशी त्यांचा झालेला सघर्ष, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, विविध सभांमध्ये त्यांनी घेतलेला भाग, त्यांनी वेळोवेळी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे गाजलेले वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, त्यांना वेळोवेळी घडलेले तुरुंगवास, मंडालेची काळ्या पाण्याची शिक्षा, रँडच्या खून खटल्यात त्यांना गोवण्याचा झालेला प्रयत्न, टिळकांनी इंग्रज सरकारवर भरलेला अब्रूनुकसानीचा खटला, त्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप आणि सोसावा लागलेला आर्थिक भुर्दंड, त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केलेली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसनची स्थापना आणि नंतर केवळ तत्त्वासाठी त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, राजकीय जीवनात टिळकांना लाभलेले अनुयायी, टिळकांची लोकप्रियता, त्यांच्या विचारांनी क्रांतिकारकांना पुरविलेलं बळ आणि जनतेत पसरलेलं चैतन्य, मुस्लिम समाजाबद्दल त्यांना वाटणारी आस्था इ. अनेक मुद्दे, घटना, प्रसंग अधोरेखित करण्यात आले आहेत, ज्यातून टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचं यथार्थ दर्शन घडतं. योगी अरविंद, मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्वयंपाक करून जेवायला घालणारा कुलकर्णी इ. लोकांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलं आहे.
-
Palavarcha Jag (पालावरचं जग)
‘पालावरचं जग’ या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडितांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेखांतून अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांचं अमानवी जगणं, अन्याय, दुःख-दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट झालेल्या समाजाचा उद्धार व संघर्षगाथा-‘यल्लपाचा चंग’मधून दिसते. ‘मरण येत नाही, म्हणून जगायचं!’ हे पालावरचं बेभरवशाचं हीन व शोषित जगणं, भटक्या-विमुक्तांचं स्वत्वं-स्वाभिमान हिरावून घेणारं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, भराडी-कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, टकारी भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाजाने हीन व उपरं ठरवलेलं. या समाजाचा वाली कोण? कधी जाग येणार या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठीचा तीव्र संघर्ष, चळवळ व आंदोलने लेखकाने व कार्यकर्त्यांनी छेडलेली, तुरुंगवास पत्करलेला. त्यांच्या स्वातंत्र्याचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. म्हणूनच माणुसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवाल्यांच्या दु:खाचा, मरणानंतरही जात आडवी, फाटलेलं आभाळ या लेखांतून मानवी जीवनातील दारिद्र्य, लाचारी, त्यांच्या समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा फोडतो. गुन्हेगारीचा शाप मागं लेवून जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्याच दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला अनिष्ट चालीरीति-रूढीं-परंपरांचा शाप. त्यामुळे गावगाडा उचकटून लाचारांच्या/बेरोजगारांच्या फौजा तयार झालेल्या. सत्यानास, अन्नानदशा व कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का जगणं नकोसं करतो; शिवाय स्त्री जातीचे धिंडवडे, अन्यायाची परिसीमा-बलात्काराने पोखरलेलं हीन-दीन जगणं, दहशत, अपमान व स्त्री जन्माला मिळालेला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी ‘उपरा`मधूनही या दु:खाला वाचा फोडली आहेच. व्यासपीठावरूनही भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखकाने मांडले ते ‘बंद दरवाजा` या नावाने. लेखकाने सच्च्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हे ‘पालावरचं जग’ आपल्यासमोर मांडलंय, त्यातील धगधगते दाहक सत्य काळजाला पीळ पाडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, लेखकाने त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांची स्थितिगती जाणून घेऊन, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे... मानवी हक्क व न्याय यांपासून भटका-विमुक्त समाज वंचित राहू नये, हीच तळमळ या सर्व लेखनातून स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिककार्यांतून चळवळींना बळ देऊन मानवी उन्नत्ती व माणुसकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत जगणं भटक्या-विमुक्तांचं असावं, अज्ञानाला थारा नसावा, हाच लेखकाला ध्यास आहे. म्हणूनच या अत्याचाराच्या कहाण्या, मसणजोग्यांचं अपरिमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, वहिवाटीसाठीची लढाई, आभाळाएवढ्या छत्रपतींचा आदर्श लेखक लक्ष्मण माने समाजापुढे उभा करतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एके दिवशी आकार प्राप्त होईल, हा दुर्दम्य विश्वास लेखकाला आहे. म्हणूनच ‘पालावरचं जग’ म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी वास्तव म्हणता येईल.