-
Vishwache Aarta (विश्वाचे आर्त)
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे. पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.
-
Punarvichar (पुनर्विचार)
अनेक वेळा जगण्याची निरर्थकता जाणवते. हे सर्व का व कशासाठी? आपले प्रश्नही छळून घेतात. सोलून काढतात. राक्ताबाम्बळ करून जातात. अशाच राक्ताबाम्बळ झालेल्या एका सुप्रसिद्ध लेखिकेने आपल्या निरक्षर आईला प्रश्न केला. 'अखेर जगण्याला 'अर्थ' काय?' त्या निरक्षर आईने उत्तर दिले, 'कसला आलाय अर्थ, आपण देऊ तोच अर्थ.' अखेर जगण्याला ज्याचा त्यानेच अर्थ द्यायचा असतो. हा अर्थ देत आला,शोधता आला तर जगणे 'सार्थकी' लागल्यासारखे वाटते आणि माणूस यात 'फेल' झाला की, त्याला निरर्थक वाटू लागते आणि मग मंदिरही हाउसफुल्ल होऊन जातात आणि तेवढीच गर्दी 'बार' मधेही उसळते. शेवटी प्रत्येकानं आपल्या जगण्याला 'अर्थ' ज्याचा त्यानेच द्यायचा आहे, घ्यायचा आहे, लावायचा आहे आणि शोधायचा आहे.
-
Kharya Shikshanachya Shodhat (ख-या शिक्षणाच्या शोध
शाळा म्हणजे जगाला सामोरी जाणारी शिक्षण देणारी संस्था; पण वास्तवातील सर्व गोष्टींचे शिक्षण येथे मिळतेच असे नाही. बंदिस्त वर्गांमध्ये अनेक विषयांची तोंडओळख, तीही शिस्तीच्या वातावारणात व शिक्षकांच्या आदेशानुसार येथे होते. पारंपरिक शाळेतील मुळे कैदी असतात, असे डेव्हिड ग्रीबल यांचे मत आहे; पण जगात अशाही शाळा आहेत. ज्या मुलांना चाकोरीबाहेरचे शिक्षण देतात. त्यांचे नैसर्गिक व्यक्तिमत्व फुलवतात, प्रत्येक मुलाच्या आत्मसन्मानाला मान देऊन शिक्षण देतात. इंग्लड न्यूझीलंड, अमेरिका, भारत, इक्वेडोर, स्वित्झर्लंड, जपान, इस्राईल या देशांमध्ये असणाऱ्या १४ वेगळ्या शाळांची माहिती ग्रीबल यांनी खऱ्या शिक्षणाच्या शोधातून दिली आहे. यातील काही शाळा गरीब, गुन्हेगारी वृत्तीच्या मुलांना जीवनप्रवाहात आणतात. समस्याग्रस्त मुलांना सामान्य शिक्षण देतात. सामान्य मुलांना परंपरागत धडे न देता रोजच्या प्रसंगातून ज्ञान देतात. या शाळांचे वेगळेपण व त्यातून बाहेर पडणारे आश्वासक विद्यार्थी यांचे अनुभव वाचून भविष्यात त्यांची संख्या वाढण्याची गरज वाटते. याचा मराठी अनुवाद डॉ. वृंदा चापेकर यांनी केला आहे.
-
Mala N Kalalele Baba (मला (न) कळलेले बाबा)
मी व बाबा चोवीस तास सहवासात असे. निदान हजार दिवस तरी असतील. दोन्ही भारत जोडो यात्रा, कसरावदचे दोन महिन्यांचे दोन-तीन मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, मुंबई इथली बाबांची शस्त्रक्रिया व शेवटी बाबा रक्ताच्या कर्करोगानं आजारी असतानाचे सहा महिने, मी बाबांचा निकट सहवास अनुभवला, तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत. बाबा कसे होते, याचा प्रत्येक वेळी वेगळा भास होत असे. नक्की कसे ते ठरवता येत नाही. कदाचित माझ्या सामान्य बुद्धी-क्षमतेनं असेल, बाबांच्या जवळपास राहण्यासाठी येणारे पाहुणे, भक्तगण आम्हाला बाबांची माणसं म्हणून ओळखत. त्यात त्यांचा मोठेपणा होता. तरी बाबांच्या सोबतच्या शेकडो आठवणी आहेत, त्या लिहाव्या का? त्या लोक वाचतील का? माझ्या आयुष्यातली बत्तीस वर्षं मी ह्या मोठ्या, खर्या माणसासोबत घालवली आहेत. मी बाबांना प्रथम भेटलो तेव्हा 31 वर्षांचा होतो. भारावून जाण्याचं वय नव्हतं. मी बाबांकडे कसा आलो? का आलो? ह्याला अनेक कारणं आहेत. ती पुढे कुठं तरी येतील. पण इतक्या वर्षांनंतर नक्की कोणतं कारण हे सांगता येणार नाही. माझ्यासमोर गेल्या तीस वर्षांत अनेक कार्यकर्ते गेले. मी का राहिलो हेही सांगता येणार नाही, कारण बाबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रचंड भोवर्यात मी अनेकसांसारखा गरगर फिरत राहिलो आहे.
-
Lokarhati (लोकरहाटी)
आईने बालपणी माझ्यात रुजवलेलं अनागर संस्कृतीचं बीज माझ्या आत कधी फोफावलं ते कळलंच नाही. मग केवळ माझं खेडेगावच नाही, पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भटकताना प्रत्येक ठिकाणची अनागर संस्कृती खुणावत राहिली. ठिकठिकाणची माणसं, तळी, मंदिरं, रस्त्यात पडलेले दगडगोटे, जुन्या वास्तू, चालीरीती... एवढंच नव्हे, गावोगावच्या खाद्यसंस्कृतीचं वेडही यातूनच लागलं. एकदा पायाला माती लागली की त्या मातीतलं सारं आपलंसं वाटतं; असंच काहीसं झालं. मातीतून उगवणार्या झाडा-झुडपांपासून ते त्या मातीतल्या गाण्याबजावण्यापर्यंत सारंच ‘माझं’ झालं. आता ही अनागर संस्कृती आणि ही संस्कृती स्वत:त नांदवणारी-खेळवणारी लोकरहाटी माझ्यात भिनलीय. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञान संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेऊ पाहत असताना, माझ्यावरचं अनागर, म्हणजेच ग्रामीण संस्कृतीचं गारुड मात्र कायम आहे. या गारुडाचा उत्तम दाखला म्हणजे हे ‘लोकरहाटी’ पुस्तक!