-
Shivrayancha Chhava (शिवरायांचा छावा)
कट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते. परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती? शिवरायांचा छावा म्हणूनच मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. त्यांचे जीवन हे धाडस, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वातंत्र्यासाठीचा अमर लढा यांची शौर्यगाथा आहे.
-
Papyrus (पपायरस)
कागदाचा शोध लागला नसताना लेखन कसं केलं जायचं ? मौखिक शब्द अक्षररूपात कसे आले? पुस्तकांनी मानवी जगण्याला आकार कसा दिला ? प्राचीन काळी नाइल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायरस वनस्पतीपासून गुंडाळ्या अर्थात भूर्जपत्रं तयार केली जायची. त्यांपासून तेव्हाची पुस्तकं तयार व्हायची. या मौलिक उत्पादनाकरता भांडणं, लढाया व्हायच्या. पुस्तक-निर्मिती आणि जतन करण्याची कहाणी जितकी अस्पष्ट आहे तितकीच ती नाट्यमय आहे. या कहाणीत रक्तपात आहे. राजकारण आहे. संघर्ष आहेत आणि पछाडलेपणही आहे. ती आपल्याला अॅलेक्झँडर द ग्रेटच्या युद्धसंग्रामात नेते. ३८पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तकांची, पुस्तकवेडाची, पुस्तकाच्या उत्क्रांतीची रंजक आणि कल्पक कहाणी!
-
Market Wizards (मार्केट विझार्ड्स)
ब्रूस कोव्हनेर, रिचर्ड डेनिस, पॉल ट्यूडर जोन्स, मायकेल स्टाईनहार्थ, एड सिकोटा, मार्टी श्वार्ट्स अशा मार्केटवर मात करणाऱ्या एकूण सतरा महान ट्रेडर्सच्या मुलाखती असलेल्या ह्या पुस्तकात ट्रेडिंग विश्वामध्ये त्यांनी जगलेले व भोगलेले अनेक किस्से व कहाण्या आहेत. ह्यातील एका एमआयटीच्या विद्युत अभियंत्याने संगणीकृत ट्रेडिंगच्या साहाय्याने सोळा वर्षात आपल्या गुंतवणूकीवर अविश्वसनीय असा २,५०,००० टक्के परतावा मिळवला तर अनेकवेळा बाजारात भांडवल गमावलेल्या एका ट्रेडरने अखेर ३०,००० डॉलर्सच्या गुंतवणूकीतून ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ह्या सर्व जादूगारांच्या ट्रेडिंगची वैशिष्ठ्ये श्वागरने अतिशय नेमकेपणाने या पुस्तकात मांडली आहेत.
-
The Creative Act (द क्रिएटिव्ह ॲक्ट)
कलाक्षेत्र आणि कलाकार अशी काही वेगळी माणसं नसतात. प्रत्येक जण कलाकार असतो हा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात पहिल्यापासून समोर येतो. “एखादी अस्तित्वात नसलेली गोष्ट प्रत्यक्षात आणणं म्हणजे सर्जनशीलता..! एखादं सुसंवादी संभाषण, समस्येवर उत्तर शोधण्याची प्रक्रिया, मित्राला पत्र लिहिण्याची क्रिया, दिवाणखान्यातल्या फर्निचरची रचना बदलणं, ट्रॅफिक जाम टाळून वेगळ्या रस्त्यानं कौशल्यानं गाडी चालवत घरापर्यंत पोहोचणं यापैकी प्रत्येक गोष्ट सर्जनशीलतेत मोडते”, असं रिक रुबिन म्हणतो.
-
Atmachi Diary (आत्माची डायरी)
एखादा माणूस डायरी का लिहितो तर त्याला आपल्या आयुष्यातील बऱ्या-वाईट आठवणींची नोंद करून ठेवायची असते. अशा नोंदी मुख्यतः स्वतःसाठी असतात. पण त्या इतरांपर्यंत पोहोचाव्यात अशी एक सुप्त इच्छाही त्यामागे असते. म्हणजेच एखादी डायरी ही एकाच वेळी खाजगी आणि त्याचवेळी सार्वजनिक रूपाचा दस्तऐवज ठरत असते. आपली सुख-दुःखे, आपले यशापयश, आपली स्वप्ने, आपल्या जगण्याची सूत्रे आप्तेष्ट-मित्रांसमोर व्यक्त करावीत, त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करावे असा आत्माराम यांचा प्रांजळ हेतू या लेखनामागे दिसतो. A man is known by the company he keeps, असे म्हटले जाते. आत्माराम यांच्या या डायरीतील त्यांचा गोतावळा पाहिला की त्यांची संवेदनशीलता आणि सर्वसंचारी वृत्ती लक्षात येते. प्रज्ञा, प्रतिभा,ओज, विजिगीषु वृत्ती याबरोबरच माणुसकी, सहवेदना, करूणा या साऱ्या भावनांचा उत्स्फूर्त आणि प्रसन्न आविष्कार या डायरीत जागोजागी होताना दिसतो. अशा तऱ्हेने एकत्र आलेल्या विविध व्यक्तिमत्त्वांच्या रंगीबेरंगी फुलांचा हा गुच्छ त्याच्या रंग-रूपामुळे आणि त्यातील अमृत-तत्वामुळे वाचकाचे मन प्रसन्न आणि तृप्त करून टाकणारा झाला आहे.
-
Gaulan (गौळण)
गोकुळातील श्रीकृष्णाच्या लीला काव्यातून सांगणारा गौळण हा लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. लोकसाहित्यातील गौळणींचे दालन भक्तिभाव व शृंगाररसाने सजलेले आहे. संतांच्या गौळणींमध्ये गोपिकांचे श्रीकृष्णावरील प्रेमाचे आध्यात्मिक रूप दिसते, तर शाहिरांच्या गौळणींमध्ये लौकिक शृंगारभाव व्यक्त झाला आहे. 'कशी जाऊ मी वृंदावना/ मुरली वाजवितो कान्हा' (संत एकनाथ) अशा भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या गौळणी संतांनी लिहिल्या; तर 'सोळा हजारात देखणी/ चांद दिसे जणू दर्पणी/ मीच एक राधा गवळ्याची/ आगे साजणी...(पठ्ठे बापूराव) अशा शृंगार व प्रेमरसांनी युक्त गौळणी शाहिरांनी लिहिल्या. दोन्ही प्रकार वाङ्मयात अमर ठरले आहेत, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्यानपिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर आणले आहे.
-
Chanakya (चाणक्य)
इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. आपापसात सतत संघर्ष होत होती. मगध हे त्यांपौकीच एक ! त्या राज्याचा राजा धनानंद हा विलासी राजा होता. अतोनात कर लावून तो प्रजेची पिळवणूक करीत असे. त्याच्या अनियंत्रित कारभाराला प्रजा कंटाळली होती. चाणक्य विष्णुगुपत हा त्या राज्यातील एक तेजस्वी ब्राह्मण. तक्षाशिलेला जाऊन विद्यासंपन्न झालेल ! राजाचा दानाध्यक्ष या नात्यानं काम करताना धनानंद राजानं त्याचा अपमान केला. ते पाहून चाणक्यनं शपथ घेतली की, उन्मत्त धनानंद राजाचं सिंहासन मी यथावकाश उलथून टाकीन.' त्याच वेळी जगज्जेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रीक सेनानी सिकंदर यानं भारतावर आक्रमण केलं. चाणक्यानं अपार परिश्रम करून सिकंदराचं आक्रमण थोपविण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्याचीच परिणीती म्हणून सिकंदराला भारतविजेता न होता परतावं लागलं. चंद्रगुप्ताला हाताशी धरून चाणक्यानं त्याला उत्तम शिक्षण दिलं. अनेक तेजस्वी तरुणांची एक मळी उभी केली आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजून त्यानं धनानंद राजाला पदच्युत केलं. त्याच्या सिंहासनावर चंद्रगुप्त मौर्याला अधिष्ठित करून त्याच्याच सहाय्यानं चाणक्यानं एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारत निर्माण केला. आपल्या आयुष्याच्या उतरार्धात "कौटिलीय अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहून भारतीय साहित्यात अनमोल भर घातली. अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही ललितरम्य कादंबरी अनेक नाट्यपूर्ण, रहस्यमय प्रसंगांनी सजलेली ! प्रचलित असलेल्या 'चाणक्यनीती'च्या आणि प्रसिद्ध असलेल्या 'कौटिल्याचे अर्थशास्त्र'च्या 'चाणक्य'वर संदर्भांचा छडा लावून लिहिली गेलेली ही कादंबरी. स्वत: सत्तेपासून अलिप्त राहायचे पण सत्ता परकीयांच्या हातातून दिसणार नाही म्हणून डावपेच रचायचे, त्यासाठी एखाद्या चंद्रगुप्ताला अगदी श्रीगणेशापासून तयार करायचे न् प्रजाहित साधण्याचा प्रयत्न करायचा हे सारेच अजब आहे म्हणूनच अशी व्यक्तिरेखा लेखकालाही आव्हानात्मक आहे, असे मूळचेच जबरदस्त कथानक लेखकाचीही परिक्षा घेणारे आहे अर्थात भा. द. खेर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकाला हे शिवधनुष्य न पेलवते तरच नवल ! खेर ह्यांनी ते कसे समर्थपणे पेलले आहे हे एकदा वाचलेच पाहिजे असे आहे.